उदगीर : महाराष्ट्रातील पत्रकारांच्या प्रश्नांसाठी पत्रकारांची मातृसंस्था असलेल्या मराठी पत्रकार परिषदेने सातत्याने लढे दिले आहेत. या प्रश्नांच्

उदगीर : महाराष्ट्रातील पत्रकारांच्या प्रश्नांसाठी पत्रकारांची मातृसंस्था असलेल्या मराठी पत्रकार परिषदेने सातत्याने लढे दिले आहेत. या प्रश्नांच्या सोडवणुकीसाठी आपण स्वतः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे पाठपुरावा करेन, अशी ग्वाही राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री व लातूरचे पालकमंत्री तथा मराठी पत्रकार परिषदेच्या उदगीर येथील राष्ट्रीय अधिवेशनाचे स्वागताध्यक्ष ना. शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी दिली.
महाराष्ट्रातील पत्रकारांची मातृसंस्था म्हणून ओळखल्या जाणार्या मराठी पत्रकार परिषदेचे 44 वे राष्ट्रीय अधिवेशन लातूर जिल्ह्यातील उदगीर येथे अधिवेशनाचे उद्घाटन स्वागताध्यक्ष शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या हस्ते झाले. याप्रसंगी ते बोलत होते. व्यासपीठावर सहकार मंत्री बाबासाहेब पाटील, संपादक राजेंद्र दर्डा, आ. संजय बनसोडे, मराठी पत्रकार परिषदेचे मुख्य विश्वस्त एस. एम. देशमुख, किरण नाईक, परिषदेचे अध्यक्ष मिलिंद आष्टीवकर, विश्वस्त शरद पाबळे, पुणे विभागीय अधिस्वीकृती समितीचे अध्यक्ष हरीश पाटणे, सदस्य चंद्रसेन जाधव, कार्याध्यक्ष शिवराज काटकर, महिला आघाडीच्या अध्यक्ष शोभा जयपूरकर, डिजिटल मीडियाचे प्रदेशाध्यक्ष अनिल वाघमारे, जिल्हाधिकारी भारत बस्तेवाड, जिल्हा पोलीस प्रमुख अमोल तांबे, उदगीरच्या नगराध्यक्ष स्वाती हुडे, प्राचार्य डॉ. सुधीर जगताप उपस्थित होते.
ना. शिवेंद्रसिंहराजे भोसले म्हणाले, एस. एम. देशमुख, किरण नाईक यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्रातील पत्रकारांसाठी मराठी पत्रकार परिषदेने अनेक महत्त्वपूर्ण निर्णय घेतले. पत्रकारांच्या आरोग्याची काळजी वाहणारी संघटना म्हणून मराठी पत्रकार परिषदेची ओळख आहे. पत्रकारांच्या संरक्षणाचा कायदा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कारकिर्दीत आला. कायद्याची अंमलबजावणी करण्याची मागणी एस. एम. देशमुख यांनी केली आहे. याबाबत आपण स्वतः मुख्यमंत्र्यांकडे पाठपुरावा करु. या अधिवेशनात पत्रकारांच्या प्रश्नांवर चर्चा होईल ती सगळी निवेदने माझ्याकडे द्या आपण मुख्यमंत्र्यांकडे याबाबतची बैठक लावून हे प्रश्न मार्गी लावू, असेही ना. शिवेंद्रसिंहराजे यांनी सांगितले.
ना. बाबासाहेब पाटील म्हणाले, मुद्रित माध्यमांचे महत्त्व कधी कमी होणार नाही. लोकांचा आजही वर्तमानपत्रावरील विश्वास आढळ आहे. महाराष्ट्रातील पत्रकारांचे महाराष्ट्राच्या जडणघडणीत फार मोठे योगदान आहे. त्यामुळे आम्ही मंत्रीमंडळाच्या माध्यमातून पत्रकारांचे प्रश्न मार्गी लावू.
राजेंद्र दर्डा म्हणाले, पत्रकार म्हणून बातमी वेगाने दिलीच पाहिजे. मात्र प्राधान्य वेगाला द्यायच की सत्याला हे लक्षात ठेवले पाहिजे. सोशल मीडिया ही एक मोठी संधी आहे. त्याचवेळी अनेक वेळा ते मोठे आव्हान ठरत आहे. अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषदेने मांडलेल्या पत्रकारांच्या निवृत्तीवेतन व आरोग्य विषयक प्रश्नांची दखल शासनाने घ्यावी, असे दर्डा म्हणाले.
आ. संजय बनसोडे म्हणाले, उदगीर येथे होत असलेले अधिवेशन आमच्यासाठी सन्मानाची बाब आहे.
एस. एम. देशमुख म्हणाले, राज्य सरकारने पत्रकार संरक्षण कायदा मंजूर केला मात्र त्याची अंमलबजावणी होत नाही. ज्येष्ठ पत्रकारांना सुलभपणे पेन्शन मिळाली पाहिजे, यासाठी सरकारने पावले उचलावी. अधीस्वीकृतीचे नियम व जाचक अटी शिथिल कराव्यात.
याप्रसंगी हरीश पाटणे, मिलिंद आष्टीवकर, सुरेश नाईकवाडे, सुधीर जगताप यांनी मनोगत व्यक्त केले. अनिता येलमट्टे, रसूल पठाण यांनी सूत्रसंचालन केले. स्वागत सचिन शिवशेट्टे यांनी केले.
उदगीर : दीप प्रज्वलन करताना पालकमंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले, ना. बाबासाहेब पाटील, आ. संजय बनसोडे, राजेंद्र दर्डा, एस. एम. देशमुख, किरण नाईक, शरद पाबळे, मिलिंद आष्टीवकर, हरीश पाटणे, स्वाती हुडे व मान्यवर.

COMMENTS