Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

नांदेड जिल्ह्यात अल्पवयीन मुले गुन्हेगारीच्या जाळ्यात; खून, चोर्‍या, बनावट नोटा प्रकरणात वाढता सहभाग

नांदेड : एकेकाळी शिक्षणनगरी म्हणून ओळख असलेले नांदेड शहर सध्या चिंताजनक सामाजिक वास्तवाला सामोरे जात आहे. वैद्यकीय, अभियांत्रिकी तसेच विविध स्पर्

महाराष्ट्राला ड्रग्जचा विळखा!
जुन्या वादातून जीवघेणा हल्ला; एक गंभीर; नान्नज येथील घटना; लोखंडी रॉड व कोयत्याने मारहाण, चौघांविरुद्ध गुन्हा
ऑपरेशन क्रॅकडाउन : नांदेड पोलिसांची विशेष मोहीम
बाल गुन्हेगारीत वाढ, पालकांमध्ये चिंतेचे वातावरण; तरुण मुले व्यसनांच्या  जाळ्यात | Navarashtra

नांदेड : एकेकाळी शिक्षणनगरी म्हणून ओळख असलेले नांदेड शहर सध्या चिंताजनक सामाजिक वास्तवाला सामोरे जात आहे. वैद्यकीय, अभियांत्रिकी तसेच विविध स्पर्धा परीक्षांच्या तयारीसाठी राज्यभरातून विद्यार्थी येथे येत असताना, दुसर्‍या बाजूला शहरातील अल्पवयीन मुले गुन्हेगारीच्या विळख्यात अडकत असल्याचे चित्र समोर येत आहे. खून, दुचाकी चोरी, घरफोडी, बनावट नोटा प्रकरणे तसेच व्यसनाधीनतेमुळे उद्भवणारे गुन्हे यामध्ये 13 ते 17 वयोगटातील मुलांचा वाढता सहभाग पोलिसांसाठीही मोठे आव्हान ठरत आहे.
गेल्या दोन महिन्यांतील घटनांचा आढावा घेतला असता, अनेक गंभीर गुन्ह्यांमध्ये अल्पवयीन मुलांचा थेट किंवा अप्रत्यक्ष सहभाग उघड झाला आहे. काही दिवसांपूर्वी गोवर्धन घाट पुलाजवळ पैशांच्या वादातून 16 वर्षीय मुलाचा खंजराने भोसकून खून करण्यात आला. या प्रकरणात तीन अल्पवयीन मुलांना ताब्यात घेण्यात आले. विशेष म्हणजे मृत मुलगाही चोरीच्या घटनांमध्ये सहभागी असल्याची माहिती समोर आली. याशिवाय नांदेड शहरातील विविध भागांत दुचाकी चोरीच्या घटनांमध्येही अल्पवयीन टोळ्यांचा सहभाग आढळून आला आहे. फेब्रुवारी महिन्यात भाग्यनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत चार ते पाच अल्पवयीन मुलांच्या टोळीला पकडून त्यांच्याकडून तब्बल 17 दुचाकी जप्त करण्यात आल्या. त्यानंतर एप्रिलच्या सुरुवातीला विमानतळ पोलीस ठाण्याच्या हद्दीत आणखी एका टोळीचा पर्दाफाश झाला. या कारवाईत चार अल्पवयीन मुलांना ताब्यात घेऊन 20 चोरीच्या दुचाकी जप्त करण्यात आल्या. मार्च महिन्यात माहूर तालुक्यातील जत्रेत 500 रुपयांच्या बनावट नोटा चलनात आणण्याचा प्रयत्न करणार्‍या एका अल्पवयीन मुलाला पकडण्यात आले. तपासात त्यामागे दुसरा मास्टरमाइंड असल्याचे निष्पन्न झाले. म्हणजेच मोठे गुन्हेगार स्वतःचे हात स्वच्छ ठेवण्यासाठी अल्पवयीन मुलांचा वापर करीत असल्याचेही स्पष्ट होत आहे. या सर्व प्रकारामागे व्यसनाधीनतेचे मोठे कारण पुढे येत आहे.  10 ते 12 वर्षांच्या मुलांमध्ये दारू, सिगारेट, गुटखा, व्हाईटनर, खोकल्याचे औषध, फेविस्टिक, गांजा यांसारख्या पदार्थांच्या सेवनाची सवय वाढत असल्याचे सांगितले जाते. नशेची सवय पूर्ण करण्यासाठी सुरुवातीला किरकोळ चोरी केली जाते आणि नंतर त्यातूनच मोठ्या गुन्ह्यांकडे पावले वळतात. सामाजिक तज्ज्ञांच्या मते, अल्पवयीन मुलांवर पालकांचे नियंत्रण कमी होणे, मोबाईलचा अनियंत्रित वापर, चुकीची मित्रमंडळी, शिक्षणापासून दुरावा, झटपट पैसा कमावण्याची मानसिकता आणि परिसरातील गुन्हेगारी वातावरण ही यामागील प्रमुख कारणे आहेत. अनेक मुलांना ना घरचा धाक राहिला आहे, ना कायद्याची भीती. यावर उपाय म्हणून पालकांनी आपल्या पाल्यांच्या वर्तनावर बारकाईने लक्ष ठेवणे गरजेचे आहे. मुलांचे मित्र कोण आहेत, मोबाईलमध्ये काय पाहतात, वेळ कुठे घालवतात, घरच्यांशी कसे वागतात याची सातत्याने दखल घेतली पाहिजे. तसेच शाळा, महाविद्यालये, पोलीस प्रशासन आणि सामाजिक संस्था यांनी संयुक्तपणे जनजागृती मोहीम राबवून या पिढीला गुन्हेगारीपासून दूर ठेवण्याची गरज निर्माण झाली आहे. अल्पवयीन हातात पुस्तके असावीत, शस्त्रे नव्हेत-ही जाणीव समाजाने आता गंभीरतेने स्वीकारण्याची वेळ आली आहे.

COMMENTS