नांदेड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने 2025-26 या आर्थिक वर्षात उल्लेखनीय आर्थिक प्रगती साधत मार्च अखेर तब्बल 53.7 कोटी रुपयांचा ढोबळ नफा कमावला

नांदेड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने 2025-26 या आर्थिक वर्षात उल्लेखनीय आर्थिक प्रगती साधत मार्च अखेर तब्बल 53.7 कोटी रुपयांचा ढोबळ नफा कमावला असून वैधानिक तरतुदीनंतर 7.33 कोटी रुपयांचा निव्वळ नफा नोंदविला आहे. यासोबतच बँक संचित तोट्यातून पूर्णपणे मुक्त झाल्याची माहिती बँकेचे अध्यक्ष मा. खा. भास्करराव पाटील खतगावकर यांनी पत्रकार परिषदेत दिली.
खतगावकर म्हणाले की, बँकेच्या भागभांडवलात मोठी वाढ झाली असून एनपीए (थकबाकी कर्ज) कमी करण्यातही यश आले आहे. त्यामुळे बँकेवरील ग्राहकांचा विश्वास अधिक दृढ झाला असून ठेवीत लक्षणीय वाढ झाली आहे. सध्या बँकेच्या एकूण 63 शाखांपैकी 58 शाखा नफ्यात कार्यरत आहेत. बँकेच्या पुनरुज्जीवनासाठी माजी मुख्यमंत्री तथा राज्यसभा सदस्य अशोकराव चव्हाण तसेच तत्कालीन अर्थमंत्री स्व. अजितदादा पवार यांचे मोलाचे सहकार्य लाभल्याचे त्यांनी नमूद केले. नांदेड जिल्ह्यातील शेतकर्यांसाठी ही बँक ‘कामधेनू’ ठरत असल्याचेही त्यांनी सांगितले. ही प्रगती केवळ आकड्यांपुरती मर्यादित नसून संचालक मंडळ, व्यवस्थापन आणि कर्मचार्यांच्या एकत्रित प्रयत्नांचे फलित असल्याचे खतगावकर यांनी स्पष्ट केले. बँकेच्या या यशस्वी वाटचालीत संचालक, कर्मचारी, सभासद, ठेवीदार व हितचिंतक यांचे महत्त्वपूर्ण योगदान असल्याचे त्यांनी सांगितले. या पत्रकार परिषदेस बँकेचे उपाध्यक्ष मा. आ. हणमंतराव पाटील बेटमोगरेकर, संचालक बाळासाहेब रावणगावकर, गोविंदराव शिंदे नागेलीकर, बाबुराव कोंढेकर, शिवराम लुटे, राजेंद्र केशवे, राजेश पावडे, व्यंकटराव जाळणे, श्रीमती विजयाताई शिंदे, शाम कदम, रामचंद्र मुसळे, माजी उपमहापौर सरजीतसिंग गील, एन. डी. पवार, जगनाथ चक्रावार तसेच बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अजय कदम व कर्मचारी उपस्थित होते.

COMMENTS