Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिर अभियान पारगाव सिरस येथे उत्साहात संपन्ननागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद; शेकडो लाभार्थ्यांना विविध शासकीय प्रमाणपत्रांचे वितरण

बीड :पारगाव सिरस : शासनाच्या महसूल व वन विभागामार्फत राबविण्यात येणार्‍या छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिर अभियान अंतर्गत प

जीएसबी गणपतीला 400 कोटींचे विमा संरक्षण
ड्रायव्हरनं मालकाच्या घरातून केली चोरी
एस. एस. पाटील यांची ‘बालभारती’ पाठ्यपुस्तक निर्मिती समितीवर निवड


बीड :
पारगाव सिरस : शासनाच्या महसूल व वन विभागामार्फत राबविण्यात येणार्‍या छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिर अभियान अंतर्गत पारगाव सिरस येथे 10 एप्रिल 2026 रोजी आयोजित करण्यात आलेले शिबिर अत्यंत उत्साही वातावरणात आणि नागरिकांच्या प्रचंड प्रतिसादात यशस्वीपणे पार पडले.
विठ्ठल रुख्मिणी मंदिर सभागृह, पारगाव सिरस येथे झालेल्या या शिबिरात शेतकरी, ग्रामस्थ, महिला बचत गट, विद्यार्थी तसेच विविध सामाजिक घटक मोठ्या संख्येने उपस्थित होते. शासनाच्या विविध योजनांचा थेट लाभ गावपातळीवर मिळाल्याने नागरिकांमध्ये समाधानाचे वातावरण पाहायला मिळाले. राज्य शासनाने महसूल प्रशासन अधिक पारदर्शक, गतिमान आणि लोकाभिमुख करण्यासाठी छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाने हे महाराजस्व अभियान सुरू केले आहे. नागरिकांना महसूल विभागाच्या सेवा गावातच उपलब्ध करून देणे, प्रलंबित प्रकरणांचा तात्काळ निपटारा करणे आणि शासकीय योजनांची माहिती तळागाळापर्यंत पोहोचवणे हा या उपक्रमाचा मुख्य उद्देश आहे. पारगाव सिरस येथील शिबिराने हा उद्देश प्रत्यक्षात उतरल्याचे स्पष्ट दिसून आले. या शिबिराचे आयोजन जिल्हाधिकारी विवेक जॉन्सन यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले. कार्यक्रमास उपजिल्हाधिकारी (सामान्य प्रशासन) शैलेश सूर्यवंशी, तहसीलदार चंद्रकांत शेळके, नायब तहसीलदार सुरेंद्र डोके, अण्णा वंजारे यांची प्रमुख उपस्थिती लाभली. वरिष्ठ अधिकार्‍यांच्या उपस्थितीमुळे शिबिराला विशेष महत्त्व प्राप्त झाले. महसूल मंडळातील सर्व 13 गावांचे सरपंच, उपसरपंच, पोलीस पाटील, ग्रामपंचायत सदस्य, माजी लोकप्रतिनिधी तसेच विविध विभागांचे अधिकारी-कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. तलाठी, मंडळ अधिकारी, महसूल सेवक, ग्राम महसूल अधिकारी तसेच तहसील कार्यालयातील कर्मचारी यांचाही सक्रिय सहभाग होता. याशिवाय आरोग्य विभाग, महावितरण, कृषी विभाग, अंगणवाडी सेविका, आशा सेविका तसेच महिला बचत गट, शेतकरी गट आणि विद्यार्थी वर्ग मोठ्या प्रमाणात सहभागी झाला होता. शिबिरात विविध विभागांचे माहिती व सेवा स्टॉल्स उभारण्यात आले होते. यामध्ये जमीन नोंदणी, खातेफोड, वारस नोंद, सातबारा उतारे, विविध दाखले, शासकीय योजनांची माहिती नागरिकांना देण्यात आली. या शिबिरात अनेक महत्त्वाच्या सेवा प्रत्यक्ष देण्यात आल्या, ज्यामध्ये- जिवंत सातबारा व डिजिटल सातबारा वाटप वारस फेरफार प्रकरणांचा निपटारा , वर्ग-2 चे वर्ग-1 मध्ये रूपांतर, ई-पीक पाहणी व ग्रीस्टॅक नोंदणी, ई-वसुली पावती व ई-केवायसी प्रक्रिया, आधार नोंदणी कॅम्प, ई-शिधापत्रिका वितरण, घरकुल व गायरान मंजुरी आदेश, पानंद रस्ते योजना नोंदी, मोफत आरोग्य तपासणी व रक्तदान शिबिर, यांसारख्या अनेक सेवांचा नागरिकांनी लाभ घेतला. या शिबिरात महसूल विभागाशी संबंधित 42 फेरफार प्रकरणांचा जागेवरच निपटारा करण्यात आला. तसेच डिजिटल सातबारा उतार्‍यांचे वितरण, डिजिटल शिधापत्रिकांचे वाटप, आयुष्मान भारत कार्ड वितरण करण्यात आले. संजय गांधी निराधार योजना व श्रावणबाळ योजनेतील लाभार्थ्यांसाठी हयात प्रमाणपत्र ऑनलाईन करून देण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्याने वृद्ध नागरिकांना मोठा दिलासा मिळाला. शिबिरामुळे नागरिकांना तालुका कार्यालयात वारंवार हेलपाटे मारण्याची गरज राहिली नाही. अनेक शेतकर्‍यांनी आणि ग्रामस्थांनी आपल्या समस्या थेट अधिकार्‍यांसमोर मांडल्या. काही प्रकरणे तत्काळ निकाली काढण्यात आल्याने नागरिकांनी समाधान व्यक्त केले.उपजिल्हाधिकारी शैलेश सूर्यवंशी, तहसीलदार चंद्रकांत शेळके यांच्यासह उपस्थित अधिकार्‍यांनी शासनाच्या विविध योजनांची माहिती देत नागरिकांनी योजनांचा अधिकाधिक लाभ घ्यावा, असे आवाहन केले. प्रशासन आणि नागरिक यांच्यातील संवाद अधिक बळकट करण्यासाठी अशा शिबिरांचे महत्त्व असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. या शिबिराच्या यशस्वी आयोजनासाठी मंडळ अधिकारी स्मिता गुंजाळ, ग्राम महसूल अधिकारी विजयकुमार बहिर, विलास शिंदे, उत्तरेश्वर खांडे, यशवंत सानप, स्वाती घुगे तसेच संपूर्ण महसूल व ग्राम प्रशासन कर्मचार्‍यांनी परिश्रम घेतले. कार्यक्रमाच्या शेवटी उपसरपंच श्रीकांत नाना नवले यांनी सर्व उपस्थितांचे आभार मानून कार्यक्रमाची अधिकृत सांगता केली. एकूणच, छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व अभियान अंतर्गत पारगाव सिरस येथे पार पडलेले हे शिबिर प्रशासनाच्या लोकाभिमुख, गतिमान आणि पारदर्शक कार्यपद्धतीचे प्रभावी उदाहरण ठरले.

COMMENTS