Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

प.बंगाल निवडणुकीसाठी भाजपचे भरोसा पत्र जाहीरलाडक्या बहिणींना दरमहा 3 हजार, बेरोजगार तरूणांनाही मदत

कोलकाता : पश्‍चिम बंगालमधील विधानसभा निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर भाजपने भरोसा पत्र प्रसिद्ध करत विविध घटकांना आकर्षित करण्याचा प्रयत्न केला आहे.

रूपाली चाकणकरांच्या बहिणीला पोलिसांची नोटीस2 कोटी 40 लाखांचा हिशोबाची पोलिस करणार चौकशी
टेक्सासमध्ये भारतीय ध्वजाचा अवमान करत ‘इमिग्रेशन’ विरोधात निदर्शने; स्थानिक नागरिकाच्या संतापजनक कृत्याचा व्हिडिओ व्हायरल
मुंबई विमानतळावर 37 कोटींच्या सोन्याची तस्करी उघड29 किलो सोन्यासह 24 महिलांना केली अटक


कोलकाता : पश्‍चिम बंगालमधील विधानसभा निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर भाजपने भरोसा पत्र प्रसिद्ध करत विविध घटकांना आकर्षित करण्याचा प्रयत्न केला आहे. महिलांपासून बेरोजगार तरुणांपर्यंत, शेतकरी ते सरकारी कर्मचारी अशा सर्व स्तरांवर लक्ष केंद्रित करत मोठ्या आर्थिक सवलती आणि धोरणात्मक बदलांची घोषणा करण्यात आली आहे. या घोषणांमुळे राज्यातील राजकीय वातावरण अधिक तापले असून सत्ताधारी तृणमूल काँग्रेसकडूनही तीव्र प्रतिक्रिया उमटत आहे.
जाहीर आश्‍वासनपत्रानुसार, राज्यातील महिलांना दरमहा तीन हजार रुपये भत्ता देण्याचे आश्‍वासन देण्यात आले आहे. त्याचबरोबर बेरोजगार तरुणांनाही दरमहा तीन हजार रुपयांची आर्थिक मदत देण्याची योजना मांडण्यात आली आहे. गर्भवती महिलांसाठी एकवीस हजार रुपयांची मदत आणि सहा पोषण संच देण्याचेही जाहीर करण्यात आले आहे. शेतकर्‍यांसाठी दरवर्षी नऊ हजार रुपयांची मदत तसेच धानाला प्रतिक्विंटल तीन हजार शंभर रुपयांचा दर देण्याची हमी देण्यात आली आहे. सरकारी कर्मचार्‍यांसाठी निवडणुकीनंतर अवघ्या पंचेचाळीस दिवसांत सातवा वेतन आयोग लागू करण्याचे आश्‍वासन देण्यात आले आहे. तसेच पहिल्या सहा महिन्यांत समान नागरी कायदा लागू करण्याचा निर्धारही व्यक्त करण्यात आला आहे. महिलांच्या सक्षमीकरणासाठी सरकारी नोकर्‍यांमध्ये तेहतीस टक्के आरक्षण देण्याची घोषणा करण्यात आली असून प्रत्येक विभागात महिला पोलीस ठाणे आणि स्वतंत्र महिला कक्ष उभारण्याचेही सांगण्यात आले आहे. औद्योगिक आणि पायाभूत विकासावरही भर देत चार नवीन औद्योगिक वसाहती उभारण्याची योजना मांडण्यात आली आहे. हल्दिया बंदराचा विकास, रेल्वे प्रकल्पांना गती, तसेच राज्यातील उद्योगांना प्रोत्साहन देण्यासाठी विशेष उपाययोजना करण्याचे आश्‍वासन देण्यात आले आहे. अतिक्रमण हटवण्यासाठी निश्‍चित कालमर्यादा ठरवून कठोर कारवाई केली जाईल, असेही स्पष्ट करण्यात आले आहे. या पार्श्‍वभूमीवर केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी राज्यातील गेल्या काही वर्षांतील परिस्थितीवर टीका करत भ्रष्टाचाराविरोधात कठोर कारवाई करण्याचा इशारा दिला. तसेच सीमावर्ती भागांतील घुसखोरी रोखण्यास प्राधान्य दिले जाईल, असे त्यांनी सांगितले. एकूणच, मोठ्या आश्‍वासनांची घोषणा आणि तीव्र राजकीय आरोप-प्रत्यारोप यामुळे पश्‍चिम बंगालमधील निवडणूक लढत अधिकच चुरशीची होण्याची चिन्हे दिसत आहेत. आगामी मतदान आणि निकालाच्या पार्श्‍वभूमीवर मतदार कोणाच्या बाजूने कौल देतात, याकडे संपूर्ण देशाचे लक्ष लागले आहे.
मतदारांनी सावध राहावे : ममता बॅनर्जी
राज्याच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी उत्तर चोवीस परगणा जिल्ह्यातील तेंतुलिया येथे झालेल्या सभेत विरोधकांवर जोरदार टीका केली. त्यांनी मतदारांना सावध करत विरोधी पक्षाच्या आश्‍वासनांवर विश्‍वास ठेवू नये, असे आवाहन केले. बाहेरील लोकांना आणून निवडणुकीवर प्रभाव टाकण्याचा प्रयत्न होत असल्याचा आरोपही त्यांनी केला.

COMMENTS