पंढरपूर : बौद्ध धम्म चळवळीला नवी दिशा देणार्या आणि समाजकार्याच्या माध्यमातून आपला ठसा उमटवणार्या मा.खा. डॉ. सुनील बळीराम गायकवाड यांना 2026 साल

पंढरपूर : बौद्ध धम्म चळवळीला नवी दिशा देणार्या आणि समाजकार्याच्या माध्यमातून आपला ठसा उमटवणार्या मा.खा. डॉ. सुनील बळीराम गायकवाड यांना 2026 सालचा मानाचा क्रांतिकारी धम्मरत्न पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. चला बुद्धाच्या घरी या बौद्ध धम्म चळवळीच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या या भव्य सोहळ्यात संत दामाजी पंत सभागृह येथे त्यांचा विशेष सत्कार करण्यात आला.
या कार्यक्रमात चला बुद्धाच्या घरी अभियानाचे प्रमुख प्रबुद्ध साठे यांच्या हस्ते डॉ. गायकवाड यांना सन्मानचिन्ह, शाल व पुष्पगुच्छ देऊन गौरविण्यात आले. या क्षणी उपस्थितांनी टाळ्यांच्या गजरात त्यांचे अभिनंदन केले. या कार्यक्रमाला विविध क्षेत्रातील मान्यवर, धम्मप्रेमी, सामाजिक कार्यकर्ते आणि मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते. पुरस्कार प्रदान करताना आयोजकांनी डॉ. गायकवाड यांच्या गेल्या अनेक दशकांतील धम्मसेवेचा गौरव केला. डॉ. गायकवाड यांनी खासदार म्हणून काम करत असताना लोकसभामध्ये पाली विद्यापीठ स्थापनेची महत्त्वपूर्ण मागणी केली होती. तसेच, केंद्रीय यूपीएससी परीक्षेत पाली भाषा समाविष्ट करण्यासाठी त्यांनी ठोस आवाज उठवला होता. त्यांच्या या प्रयत्नांमुळे पाली भाषा आणि बौद्ध संस्कृतीच्या जतनासाठी नवे मार्ग खुले झाले आहेत. धम्म चळवळीत गेल्या 35 वर्षांपासून सातत्याने कार्यरत असलेल्या डॉ. गायकवाड यांनी देशभरात बौद्ध विहारांच्या उभारणीसाठी मोलाचे योगदान दिले आहे. त्यांच्या मार्गदर्शनाखाली अनेक ठिकाणी धम्मप्रसाराची चळवळ अधिक मजबूत झाली आहे. सध्या अजिंठा लेणी परिसरात पाली विद्यापीठ स्थापन करण्यासाठी त्यांचे प्रयत्न सुरू असून, या उपक्रमामुळे जागतिक स्तरावर बौद्ध अभ्यासाला चालना मिळण्याची अपेक्षा व्यक्त होत आहे. या मानाच्या पुरस्कारामुळे डॉ. गायकवाड यांच्या कार्याची पुन्हा एकदा दखल घेतली गेली असून, सर्व स्तरांतून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. समाजासाठी केलेल्या त्यांच्या अथक परिश्रमांना मिळालेली ही मान्यता भविष्यातील कार्यासाठी नवी प्रेरणा देणारी ठरत आहे.

COMMENTS