अहिल्यानगर : तथाकथित भोंदू अशोक खरात बलात्कार आणि फसवणुकीच्या प्रकरणात अटकेत असून सोमवारी त्याच्यावर अंमलबजावणी संचालनालय अर्थात ईडीने गुन्हा दाख

अहिल्यानगर : तथाकथित भोंदू अशोक खरात बलात्कार आणि फसवणुकीच्या प्रकरणात अटकेत असून सोमवारी त्याच्यावर अंमलबजावणी संचालनालय अर्थात ईडीने गुन्हा दाखल केला आहे. या नव्या कारवाईमुळे त्यांच्या विरोधातील एकूण गुन्ह्यांची संख्या आता 13 वर पोहोचली असून तपासाचा आवाका अधिक वाढला आहे.
यापूर्वी दाखल असलेल्या गुन्ह्यांमध्ये महिलांचे शोषण, फसवणूक आणि अंधश्रद्धेशी संबंधित आरोपांचा समावेश आहे. त्याशिवाय काही प्रकरणे आर्थिक फसवणुकीशी संबंधित आहेत. नाशिक पोलिसांकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे ईडीने हा गुन्हा नोंदवला असून तपासासाठी आवश्यक कागदपत्रेही ताब्यात घेतली आहेत. ईडीकडून आता खरात यांच्या उत्पन्नाचे स्रोत, मालमत्ता आणि बँक व्यवहारांचा सखोल अभ्यास केला जात आहे. त्यांच्या नावावर किंवा संबंधित व्यक्तींच्या माध्यमातून उभे राहिलेले आर्थिक जाळे नेमके कसे तयार झाले, याचा शोध घेण्यावर भर दिला जात आहे. पुढील टप्प्यात बेहिशोबी मालमत्तांवर कारवाई होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. शिर्डी परिसरात बेकायदेशीर सावकारकी आणि जमीन व्यवहार प्रकरणात खरात, त्यांच्या पत्नी आणि इतर काही जणांविरुद्धही गुन्हे दाखल झाले आहेत. या पार्श्वभूमीवर मालमत्ता खरेदी-विक्री तसेच आर्थिक व्यवहार तपास यंत्रणांच्या लक्षात आले आहेत. संबंधित प्रकरणात काही माजी लोकप्रतिनिधी आणि एका संस्थेच्या माजी विश्वस्तांनाही चौकशीसाठी समन्स बजावण्यात आल्याची माहिती समोर येत आहे. तपासादरम्यान असेही स्पष्ट झाले आहे की, शिर्डी परिसरात खरात यांचा मोठा अनुयायी वर्ग होता. त्यातूनच अनेक आर्थिक व्यवहार आणि मालमत्ता व्यवहार घडत असल्याचे प्राथमिक तपासात निदर्शनास आले आहे. दरम्यान, राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अलीकडील दौर्यात या प्रकरणाच्या सखोल चौकशीचे संकेत दिले होते. त्यानंतर अल्पावधीतच ईडीने गुन्हा नोंदवून तपास सुरू केल्याने या कारवाईकडे विशेष लक्ष लागले आहे. मुख्यमंत्री यांनी यापूर्वीच सर्व व्यवहारांची तपासणी होणार असल्याचे स्पष्ट केले होते.
पतसंस्थांसह नगरसेवक, श्री साई संस्थानचा विश्वस्त रडारवर
अशोक खरात व त्याची पत्नी कल्पना खरात यांच्यासह 5 जणांविरोधात शिर्डीत बेकायदा सावकारकी व जमीन व्यवहारात गुन्हा दाखल झाला आहे. त्यामुळे अशोक खरातच्या आर्थिक व्यवहारासह मालमत्ता खरेदी- विक्रीचे व्यवहारही तपास यंत्रणांच्या रडारवर आल्या आहेत. या प्रकरणी विशेष तपास पथकाने शिर्डी नगरपंचायतीचे माजी नगराध्यक्ष, उपनगराध्यक्ष व माजी नगरसेवकांना चौकशीसाठी समन्स बजावला आहे. साई संस्थानचा एक माजी विश्वस्तही यासंबंधी चौकशीच्या रडारवर आहे. त्यातच ईडीने गुन्हा दाखल झाल्यामुळे या सर्वांची चौकशी होण्याची शक्यता व्यक्त होत आहे.


COMMENTS