नांदेड : नांदेड शहरात अवैध सावकारीच्या माध्यमातून कर्जदारांना मारहाण करून त्यांच्याकडून खंडणी उकळणार्या टोळीचा स्थानिक गुन्हे शाखेने (ङउइ) पर्दा

नांदेड : नांदेड शहरात अवैध सावकारीच्या माध्यमातून कर्जदारांना मारहाण करून त्यांच्याकडून खंडणी उकळणार्या टोळीचा स्थानिक गुन्हे शाखेने (ङउइ) पर्दाफाश केला आहे. या प्रकरणात पोलिसांनी अवघ्या तीन तासांत कारवाई करत पाच मुख्य आरोपींना अटक केली असून, चार आरोपी अद्याप फरार आहेत.
भाग्यनगर आणि अर्धापूर पोलीस ठाण्यांच्या हद्दीत ही टोळी सक्रिय होती. साठे चौक परिसरातील ‘खालसा फायनान्स’ आणि ‘गुरुकृपा ट्रेडर्स’ या कार्यालयांच्या माध्यमातून आरोपी अवैध सावकारीचा व्यवसाय करत होते. कर्ज फेडण्यास विलंब करणार्या नागरिकांना जबरदस्तीने उचलून आणणे, त्यांना कार्यालयात डांबून ठेवणे आणि त्यांच्या नातेवाईकांकडे खंडणीची मागणी करणे असे गंभीर प्रकार उघडकीस आले आहेत. 28 मार्च 2026 रोजी आरोपींनी आबेद अली चाऊस यांना जबरदस्तीने मोटारसायकलवर बसवून नेले आणि त्यांच्यावर मारहाण केली. तसेच अर्धापूर येथील समाधान जोंधळे यांनाही अशाच प्रकारे डांबून ठेवून मारहाण करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. पोलीस अधीक्षक अबिनाश कुमार यांच्या आदेशानुसार स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक उदय खंडेराय यांच्या मार्गदर्शनाखाली पथकाने साठे चौक परिसरात सापळा रचून धाड टाकली. संशयास्पद हालचालींच्या आधारे करण्यात आलेल्या या कारवाईत पाच आरोपींना घटनास्थळावरून ताब्यात घेण्यात आले. चौकशीत त्यांनी गुन्ह्यांची कबुली दिली. अटक करण्यात आलेल्या आरोपींमध्ये मजहर खान नवीद खान (वय 38, अमन कॉलनी), अभिजीत प्रकाश सूर्यवंशी (वय 18, विष्णुनगर), सुमित रामदास ढवळे (वय 22, संघसेन नगर), अभय गौतम भुजबळ (वय 19, गौतम नगर), अनिकेत राजू हिरापुरम् (वय 18, नारायण नगर), या प्रकरणातील सोहेल खान, सय्यद आझम, शुभम कांबळे आणि माँटीसिंग मेजर (फायनान्स मालक) हे आरोपी सध्या फरार असून पोलिसांकडून त्यांचा शोध सुरू आहे. या टोळीवर भारतीय न्याय संहिता तसेच महाराष्ट्र सावकारी अधिनियमाच्या कलम 39 अंतर्गत गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.ही कारवाई पोलीस अधीक्षक अबिनाश कुमार, अपर पोलीस अधीक्षक अर्चना पाटील आणि अपर पोलीस अधीक्षक सुरज गुरव यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली. स्थानिक गुन्हे शाखेच्या या धाडसी कारवाईमुळे शहरातील अवैध सावकारांचे धाबे दणाणले असून, नागरिकांनी अशा प्रकारच्या त्रासाला बळी पडू नये आणि निर्भयपणे पोलिसांकडे तक्रार करावी, असे आवाहन करण्यात आले आहे. खाजगी फायनान्सवाल्यांनी शहर व जिल्ह्यात हायदोस घातला आहे. चक्रवाढ व्याजाने कर्जदारांना पूर्णपणे बुडवून त्यांना कुटुंबीयांच्या समोर अपमानित केले जाते तसेच त्यांना मारहाण केली जाते. यामधील किती फायनान्स कंपन्यांनी रजिस्ट्रेशन केले आहे व अवैध आहेत यासाठी पोलिसांनी पडताळणी करणे आवश्यक आहे. अनेक कर्जदारांना मुद्दलापेक्षा जास्त व्याज दिल्यामुळे आपली संपत्ती व घरदार विकून खाजगी फायनान्सवाल्यांची भरती करावी लागली आहे. त्यामुळे ग्रामीण तसेच शहरी भागातील अनेक कर्जदारांची संसार मोडले आहेत. खाजगी फायनान्सवाल्यांचा विळखा खाजगी व्यावसायिक व शेतकर्यांच्या भोवती पडल्यामुळे अनेकांना आत्महत्या कराव्या लागल्या आहेत.

COMMENTS