मुंबई : राज्यातील महिलांसाठी राबविण्यात येत असलेल्या ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ योजनेच्या ई-केवायसी दुरुस्तीसाठी सरकारने दिलासा दिला आहे. महिल

मुंबई : राज्यातील महिलांसाठी राबविण्यात येत असलेल्या ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ योजनेच्या ई-केवायसी दुरुस्तीसाठी सरकारने दिलासा दिला आहे. महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी ही मुदत आता 30 एप्रिलपर्यंत वाढवण्यात आल्याची घोषणा केली आहे. यापूर्वी ही मुदत 31 मार्चपर्यंत होती. मात्र अनेक लाभार्थ्यांची प्रक्रिया अपूर्ण राहिल्याने शासनाने एक महिन्याची अतिरिक्त मुदत देण्याचा निर्णय घेतला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या सूचनेनुसार हा निर्णय घेतल्याचे तटकरे यांनी स्पष्ट केले.
राज्य सरकारने जुलै 2024 पासून सुरू केलेल्या या योजनेअंतर्गत पात्र महिलांना दरमहा 1500 रुपये आर्थिक सहाय्य दिले जाते. त्यामुळे ई-केवायसी दुरुस्ती पूर्ण करून लाभ सुरू ठेवण्यासाठी ही शेवटची संधी असल्याचे प्रशासनाकडून अधोरेखित करण्यात आले आहे. दरम्यान, भोंदू अशोक खरात प्रकरणावरून होत असलेल्या टीकेबाबत बोलताना आदिती तटकरे यांनी तीव्र प्रतिक्रिया दिली. या प्रकरणात पीडित महिलांना न्याय मिळणे हेच सरकारचे प्राधान्य असल्याचे त्यांनी सांगितले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मार्गदर्शनाखाली विशेष तपास पथक स्थापन करण्यात आले असून त्याचे नेतृत्व अनुभवी महिला पोलीस अधिकार्याकडे आहे. दोषींना कठोर शिक्षा व्हावी, हीच सरकारची स्पष्ट भूमिका असल्याचे तटकरे यांनी नमूद केले. विलिनीकरणाच्या मुद्द्यावर बोलताना तटकरे यांनी सुरुवातीला निर्माण झालेल्या परिस्थितीचा उल्लेख केला. त्या काळात विविध स्तरांवर चर्चा आणि दावे करण्यात आले, मात्र त्यातून संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले, असे त्यांनी सांगितले. राष्ट्रवादी काँग्रेसमधील वेगवेगळ्या गटांमध्ये स्वतंत्र चर्चा झाल्या असून सर्वच स्तरांवर एकमत झाले नव्हते. त्यामुळे या विषयावर गैरसमज आणि गोंधळ वाढल्याचे तटकरे यांनी स्पष्ट केले. लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांसाठी ही मुदतवाढ अत्यंत महत्त्वाची मानली जात आहे. अद्याप ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण न केलेल्या महिलांनी 30 एप्रिलपूर्वी आवश्यक दुरुस्ती करून योजना सुरू ठेवावी, असे आवाहन प्रशासनाने केले आहे.

COMMENTS