किनवट : शिक्षणाचे माहेरघर म्हणून ओळख असलेल्या गोकुंदा आणि किनवट परिसरात सध्या देशी, विदेशी आणि गावठी दारूचा अक्षरशः महापूर वाहत आहे. एकीकडे अवैध

किनवट : शिक्षणाचे माहेरघर म्हणून ओळख असलेल्या गोकुंदा आणि किनवट परिसरात सध्या देशी, विदेशी आणि गावठी दारूचा अक्षरशः महापूर वाहत आहे. एकीकडे अवैध दारूविक्रीने सीमा ओलांडली असताना, दुसरीकडे यावर नियंत्रण मिळवणारे राज्य उत्पादन शुल्क कार्यालय केवळ नावालाच उरले आहे. शहराबाहेर थाटलेल्या या कार्यालयाला नेहमीच ’कुलूप’ पाहायला मिळत असल्याने, उत्पादन शुल्क विभाग नक्की कोणाच्या हितासाठी काम करत आहे? असा संतप्त सवाल नागरिक विचारत आहेत.
विस्मयकारक बाब म्हणजे, मुख्य राष्ट्रीय महामार्गावरील हॉटेल्सच नव्हे, तर गल्लीबोळांतील पानटपर्या आणि चक्क किराणा दुकानांमध्येही आता सहजरित्या दारू उपलब्ध होत आहे. मद्यमाफियांनी आपले जाळे इतके घट्ट विणले आहे की, कोणत्याही वेळेला आणि कुठेही मद्य मिळणे आता सामान्य बाब झाली आहे. प्रशासनाच्या या डोळेझाक वृत्तीमुळे अवैध धंदेवाल्यांचे मनोबल कमालीचे वाढले आहे. गोकुंदा परिसर हा शैक्षणिक केंद्र म्हणून ओळखला जातो. मात्र, घराघरापर्यंत पोहोचलेल्या दारूच्या व्यसनामुळे येथील तरुण वर्ग मोठ्या प्रमाणात व्यसनाधीन होत आहे. हातात पुस्तके असण्याच्या वयात तरुणांच्या हाती दारूच्या बाटल्या दिसत आहेत. शिक्षण सोडून तरुण पिढी गुन्हेगारी आणि व्यसनाकडे वळत असल्याने अनेक कुटुंबे देशोधडीला लागली आहेत.एकीकडे शासन व्यसनमुक्तीच्या गप्पा मारते आणि दुसरीकडे शहराच्या नाकावर अवैध दारूचे पेव फुटले आहे. राज्य उत्पादन शुल्क विभाग याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करून तरुणांचे आयुष्य उद्ध्वस्त करण्याचे पाप करत आहे, असा थेट आरोप स्थानिक पालकांकडून होत आहे. गोकुंदा शहराबाहेर असलेले राज्य उत्पादन शुल्क कार्यालय नेहमीच बंद अवस्थेत असते. तक्रार करायची तरी कोणाकडे? असा प्रश्न जनतेसमोर आहे. ’हप्तेखोरी’ आणि ’अर्थपूर्ण’ संबंधांमुळेच या अवैध विक्रीला अभय दिले जात असल्याची चर्चा आता उघडपणे रंगू लागली आहे. राज्याचे गृहमंत्री आणि जिल्हा प्रशासन या गंभीर बाबीकडे लक्ष देऊन या ’सुस्त’ विभागाला सक्रिय करणार का? की मद्यमाफियांच्या या साम्राज्यात गोकुंदा-किनवटची तरुण पिढी अशीच जळून खाक होणार? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. नागरिकांनी आता या विरोधात तीव्र आंदोलनाचा इशारा दिला आहे.

COMMENTS