राज्यात ऐनवेळी रब्बी पिकं काढणीचा वेळ सुरू असतांनाच झालेल्या अवकाळी पावसाने शेतकर्यांचे कंबरडे मोडले आहे. राज्यातील शेतकरी अद्याप मान्सूनमधील अत

राज्यात ऐनवेळी रब्बी पिकं काढणीचा वेळ सुरू असतांनाच झालेल्या अवकाळी पावसाने शेतकर्यांचे कंबरडे मोडले आहे. राज्यातील शेतकरी अद्याप मान्सूनमधील अतिवृष्टी आणि पुराच्या जखमांमधून सावरत नाहीत, तोच रब्बी हंगामात अवकाळी पाऊस आणि गारपीट या नव्या संकटाने त्यांना पुन्हा एकदा उध्वस्त केले आहे. गेल्या काही दिवसांपासून राज्यातील विविध भागांत सुरू असलेल्या अवकाळी पावसाने शेतीपिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान केले असून, बळीराजाच्या आशा पुन्हा एकदा पाण्यात गेल्या आहेत. प्राथमिक अंदाजानुसार सुमारे 1,400 हेक्टर क्षेत्रावरील पिकांचे नुकसान झाले असून, हा आकडा पुढील काही दिवसांत आणखी वाढण्याची भीती व्यक्त होत आहे.
रब्बी हंगाम म्हणजे शेतकर्यांच्या वर्षभराच्या मेहनतीचे फळ. हरभरा, गहू, ज्वारी ही पिके काढणीच्या उंबरठ्यावर असताना अचानक आलेल्या पावसाने आणि गारपिटीने त्यांना अक्षरशः जमिनीवर पाडले. उभ्या पिकांचे आडवे झालेले दृश्य केवळ आर्थिक नुकसानाचे नव्हे, तर मानसिक वेदनेचेही प्रतीक आहे. यासोबतच आंबा, द्राक्ष, केळी यांसारख्या फळबागांचाही मोठा फटका बसला आहे. फळबागा म्हणजे दीर्घकालीन गुंतवणूक; त्या एका वादळात उद्ध्वस्त होणे म्हणजे अनेक वर्षांच्या कष्टांचे नुकसान होणे होय. मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्र आणि विदर्भ या तिन्ही भागांत या अवकाळीचा प्रभाव स्पष्टपणे दिसून येत आहे. धाराशिव, बीड, परभणी, जालना या जिल्ह्यांत पावसासोबत गारपीट झाली. काही ठिकाणी विजेच्या कडकडाटासह वादळी वारे वाहिले, ज्यामुळे शेतीबरोबरच पशुधनाचेही नुकसान झाले. धाराशिव जिल्ह्यात तर सर्वाधिक सुमारे 1 हजार हेक्टर क्षेत्र बाधित झाल्याचे समोर आले आहे. ही आकडेवारी केवळ संख्येची नाही, तर हजारो कुटुंबांच्या उदरनिर्वाहावर आलेल्या संकटाची आहे. सोलापूर जिल्ह्यातील पडसाळी गावातील एका शेतकर्याची तीन एकर द्राक्ष बाग पूर्णपणे उद्ध्वस्त झाली. हिरव्यागार बागा काही क्षणांत जमीनदोस्त झाल्या. या घटनेतून अवकाळीच्या तडाख्याची तीव्रता स्पष्ट होते. अनेक महिन्यांच्या मेहनतीनंतर तयार झालेले पीक एका रात्रीत नष्ट झाल्याने शेतकर्यांच्या डोळ्यांत अश्रू अनावर झाले. नाशिक जिल्ह्यात कांदा, द्राक्ष, गहू, टोमॅटो आणि इतर भाजीपाला पिकांचे नुकसान झाले असून, कळवण, देवळा, दिंडोरी, निफाड आणि सिन्नर या तालुक्यांना विशेष फटका बसला आहे. या सर्व घटनांमधून एक गोष्ट प्रकर्षाने समोर येते-हवामानातील अनिश्चितता आणि त्याचा शेतीवर होणारा गंभीर परिणाम. हवामान बदलाचा परिणाम म्हणून अवकाळी पाऊस, गारपीट आणि अतिवृष्टी यांची वारंवारता वाढत चालली आहे. पारंपरिक शेती पद्धती आणि नियोजन या नव्या परिस्थितीत अपुर्या पडत आहेत. शेतकर्यांसाठी हवामानाचा अंदाज बांधणे अधिकच कठीण होत आहे. अशा परिस्थितीत शासन आणि प्रशासनाची भूमिका अत्यंत महत्त्वाची ठरते. नुकसानीचे तातडीने पंचनामे करून शेतकर्यांना योग्य आणि वेळेवर मदत मिळणे अत्यावश्यक आहे. केवळ घोषणांवर न थांबता प्रत्यक्षात नुकसान भरपाई शेतकर्यांच्या हातात पोहोचली पाहिजे. अनेकदा कागदोपत्री प्रक्रिया, विलंब आणि अपुरी मदत यामुळे शेतकर्यांचे हाल अधिकच वाढतात. त्यामुळे मदत प्रक्रिया सुलभ आणि पारदर्शक करण्याची गरज आहे. तसेच, शेती विमा योजनांची प्रभावी अंमलबजावणी ही काळाची गरज आहे. अनेक शेतकरी विमा घेतात, परंतु नुकसान भरपाई मिळण्यात होणारा विलंब आणि तांत्रिक अडचणी यामुळे या योजनांबाबत नाराजी आहे. विमा योजना अधिक सुलभ, पारदर्शक आणि विश्वासार्ह केल्या तरच शेतकर्यांना खर्या अर्थाने आधार मिळू शकतो. यासोबतच दीर्घकालीन उपाययोजनांवरही भर देणे आवश्यक आहे. हवामान बदलाच्या पार्श्वभूमीवर शेतीत बदल करणे अपरिहार्य आहे. पिकांची निवड, जलसंधारण, आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर, हवामान आधारित शेती नियोजन यांसारख्या बाबींवर अधिक लक्ष केंद्रित करणे गरजेचे आहे. शेतकर्यांना योग्य मार्गदर्शन आणि प्रशिक्षण देणेही तितकेच महत्त्वाचे आहे. अवकाळी पाऊस ही केवळ नैसर्गिक आपत्ती नाही, तर ती व्यवस्थेच्या तयारीचीही कसोटी आहे. प्रत्येक वेळी नुकसान झाल्यानंतर मदत देणे हा तात्पुरता उपाय आहे; परंतु भविष्यात अशा संकटांचा परिणाम कमी करण्यासाठी ठोस धोरणे आखणे आवश्यक आहे. हवामान बदलाच्या आव्हानाला सामोरे जाण्यासाठी शेती क्षेत्रात व्यापक आणि दूरदृष्टी असलेले नियोजन करणे ही काळाची गरज आहे. आज बळीराजा पुन्हा एकदा संकटात सापडला आहे. त्याच्या कष्टाचे मोल केवळ शब्दांत नव्हे, तर कृतीतून दिसले पाहिजे. अवकाळीचा हा तडाखा केवळ शेतीपुरता मर्यादित नाही, तर तो राज्याच्या अर्थव्यवस्थेलाही हादरा देणारा आहे. त्यामुळे या संकटाकडे केवळ आपत्ती म्हणून न पाहता, एक इशारा म्हणून पाहण्याची गरज आहे. शेतकरी हा देशाचा कणा आहे, हे आपण वारंवार म्हणतो. मात्र या कण्याला सतत होणारे आघात थांबवण्यासाठी ठोस पावले उचलणे ही आजची सर्वात मोठी गरज आहे. अन्यथा, अवकाळीचा हा तडाखा केवळ पिकांवरच नव्हे, तर शेतकर्यांच्या आयुष्यावर कायमचा उमटणारा ठरेल.

COMMENTS