कोल्हापूर : सामाजिक न्याय, समता आणि मानवमुक्तीच्या विचारांना बळ देणार्या माणगाव परिषदेच्या 106 व्या वर्धापन दिनानिमित्त 21 व 22 मार्च रोजी माणगा

कोल्हापूर : सामाजिक न्याय, समता आणि मानवमुक्तीच्या विचारांना बळ देणार्या माणगाव परिषदेच्या 106 व्या वर्धापन दिनानिमित्त 21 व 22 मार्च रोजी माणगाव येथे भव्य आणि प्रेरणादायी कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. या सोहळ्याच्या निमित्ताने इतिहासातील महत्त्वपूर्ण घटनांची उजळणी होणार असून, नव्या पिढीला परिवर्तनवादी विचारांची प्रेरणा मिळणार आहे.
माणगाव ही भूमी लोकराजा राजर्षी छत्रपती शाहू महाराज आणि भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या कार्याने पावन झालेली आहे. दक्षिण महाराष्ट्रातील बहिष्कृत समाजाच्या प्रश्नांना वाचा फोडणारी पहिली परिषद येथेच झाली होती. या परिषदेने सामाजिक परिवर्तनाचा पाया रचत, समानतेच्या लढ्याला दिशा दिली. त्यामुळेच या ठिकाणाला विशेष ऐतिहासिक आणि वैचारिक महत्त्व प्राप्त झाले आहे. या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी अमोल येडगे यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित बैठकीत वर्धापन दिन साजरा करण्याची सविस्तर रूपरेषा निश्चित करण्यात आली. बैठकीस जिल्हास्तरीय माणगाव स्मारक समितीचे सदस्य, ग्रामपंचायत पदाधिकारी, बौद्ध समाजाचे प्रतिनिधी, तसेच विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते. सर्वांनी एकमुखाने हा सोहळा अधिक प्रभावी आणि व्यापक स्वरूपात साजरा करण्याचा निर्धार व्यक्त केला.
पहिला दिवस शनिवार, 21 मार्च रोजी सकाळी नऊ वाजता कार्यक्रमांची सुरुवात होणार आहे. यावेळी ‘क्रांतीचा साक्षीदार’ या एकपात्री नाटकाच्या माध्यमातून समाजपरिवर्तनाचा इतिहास रंगमंचावर साकारला जाईल. हे नाटक प्रेक्षकांना भूतकाळातील संघर्ष, त्याग आणि परिवर्तनाच्या प्रवासाची जाणीव करून देणार आहे. यानंतर विविध मान्यवरांच्या उपस्थितीत महामानवांना अभिवादन करण्यात येईल. या कार्यक्रमास राज्यातील मंत्री, लोकप्रतिनिधी आणि वरिष्ठ प्रशासकीय अधिकारी उपस्थित राहणार आहेत. विशेष म्हणजे डॉ. बाबासाहेब आंबेडकर, राजर्षी शाहू महाराज आणि इतर सामाजिक नेत्यांच्या कुटुंबीयांची उपस्थिती या सोहळ्याचे महत्त्व अधिक वाढवणार आहे. दुसरा दिवस रविवार, 22 मार्च रोजी सायंकाळी प्रबोधनपर सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमात प्रसिद्ध गायक कलाकारांकडून समाजजागृतीपर गीते आणि सादरीकरणे होणार आहेत. सांस्कृतिक माध्यमातून सामाजिक संदेश पोहोचवण्याचा हा प्रयत्न ठरणार आहे. माणगाव परिषद ही केवळ ऐतिहासिक घटना नसून सामाजिक परिवर्तनाचा दीपस्तंभ आहे. या परिषदेमुळे वंचित आणि बहिष्कृत समाजाच्या हक्कांसाठीची लढाई अधिक तीव्र झाली. समानता, स्वाभिमान आणि न्याय यांच्या मूल्यांची रुजवात या भूमीतून झाली. आजच्या काळातही या विचारांची गरज तितकीच महत्त्वाची आहे. त्यामुळे या वर्धापन दिनाच्या निमित्ताने केवळ स्मरण न करता, त्या विचारांचे आचरण करण्याची गरज अधोरेखित केली जात आहे.
ज्ञानाचा प्रसार : पुस्तक प्रदर्शन
या दोन दिवसीय कार्यक्रमात डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्थेच्या वतीने पुस्तकांचे स्टॉल उभारण्यात येणार आहेत. येथे महापुरुषांच्या विचारांवर आधारित पुस्तके सवलतीच्या दरात उपलब्ध करून दिली जाणार आहेत. त्यामुळे नागरिकांना वाचनाची आणि अभ्यासाची संधी मिळणार आहे.

COMMENTS