Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

ओडिसातील आगीत 10 रुग्णांचा मृत्यू; 23 रुग्णांचे स्थलांतर, 11 कर्मचारी जखमी

भुवनेश्‍वर : ओडिसा राज्यातील कटक येथील सरकारी वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालयात सोमवारी पहाटे भीषण आग लागून दहा रुग्णांचा मृत्यू झाल्याची दुर्द

संजय शिंदे शिक्षणाची पताका वाहणारा वारकरी ः आमदार डॉ. लहामटे
उदगीरात महाविकास आघाडीचा सत्याग्रह
डॉ. गाडेकर धन्वंतरी पतसंस्थेच्या अध्यक्षपदी डॉ. स्वाधीन गाडेकर


भुवनेश्‍वर : ओडिसा राज्यातील कटक येथील सरकारी वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालयात सोमवारी पहाटे भीषण आग लागून दहा रुग्णांचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली. अतिदक्षता उपचार विभागात लागलेल्या आगीमुळे काही क्षणांतच गोंधळ उडाला आणि गंभीर अवस्थेतील रुग्णांना सुरक्षित बाहेर काढण्यासाठी मोठी धावपळ सुरू झाली. या दुर्घटनेमुळे संपूर्ण राज्यात शोककळा पसरली आहे.
अधिकार्‍यांनी दिलेल्या माहितीनुसार, पहाटे साधारण अडीच ते तीनच्या दरम्यान रुग्णालयाच्या आघात उपचार विभागातील अतिदक्षता कक्षात आग लागली. या विभागात अत्यंत गंभीर रुग्णांवर उपचार सुरू होते. अचानक धूर आणि ज्वाळा पसरल्यामुळे रुग्णालयात उपस्थित डॉक्टर, परिचारिका आणि कर्मचार्‍यांमध्ये एकच खळबळ उडाली. घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाची पथके तातडीने घटनास्थळी दाखल झाली. बचाव पथकांनी त्वरेने आगीवर नियंत्रण मिळवण्याचा प्रयत्न सुरू केला. धुराने भरलेल्या कक्षातून रुग्णांना बाहेर काढताना डॉक्टर आणि कर्मचार्‍यांना मोठा धोका पत्करावा लागला. या दरम्यान रुग्णालयातील अकरा कर्मचारी जखमी झाले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. आगीमुळे धोकादायक परिस्थिती निर्माण झाल्याने किमान तेवीस रुग्णांना तातडीने इतर विभागात हलवण्यात आले. रुग्णालयातील कर्मचारी, पोलीस आणि रुग्णांच्या नातेवाईकांनीही बचावकार्यामध्ये महत्त्वाची भूमिका बजावली. अनेक रुग्णांना धूरामुळे श्‍वास घेण्यास त्रास होत असल्याने त्यांना सुरक्षित वॉर्डमध्ये हलवून उपचार सुरू करण्यात आले. या दुर्घटनेची माहिती मिळताच राज्याचे मुख्यमंत्री मोहन चरण माझी आणि आरोग्यमंत्री मुकेश महालिंग यांनी तातडीने रुग्णालयाला भेट देत परिस्थितीचा आढावा घेतला. त्यांनी जखमी आणि उपचार घेत असलेल्या रुग्णांची भेट घेऊन डॉक्टरांकडून माहिती घेतली. मुख्यमंत्री माझी यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले की, प्राथमिक तपासात आगीचे कारण विद्युत तांत्रिक बिघाड असण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. अतिदक्षता विभागासह शेजारील काही वॉर्डनाही आगीची झळ बसली. बचावकार्यादरम्यान सात रुग्णांचा मृत्यू झाला, तर त्यानंतर उपचार घेत असताना आणखी तीन रुग्णांनी प्राण गमावले, अशी माहिती त्यांनी दिली. घटनेनंतर राज्य प्रशासनाने रुग्णालयातील आपत्कालीन व्यवस्थेची तातडीने पुनर्रचना करण्याचे आदेश दिले आहेत. जखमी रुग्णांच्या उपचारात कोणतीही हलगर्जी होऊ नये, यासाठी संबंधित अधिकार्‍यांना कठोर सूचना देण्यात आल्या आहेत. या दुर्घटनेत मृत्यूमुखी पडलेल्या नागरिकांच्या कुटुंबीयांप्रती मुख्यमंत्री माझी यांनी शोक व्यक्त केला असून राज्य सरकारने प्रत्येक मृताच्या कुटुंबाला पंचवीस लाख रुपयांची आर्थिक मदत जाहीर केली आहे. तसेच संपूर्ण घटनेची सखोल चौकशी करण्यासाठी उच्चस्तरीय समिती नेमण्याचा निर्णयही घेण्यात आला आहे. दरम्यान, रुग्णालयातील परिस्थिती सध्या नियंत्रणात असल्याचे प्रशासनाने सांगितले आहे. मात्र या घटनेमुळे रुग्णालयांमधील अग्निसुरक्षा व्यवस्थेवर गंभीर प्रश्‍नचिन्ह निर्माण झाले असून भविष्यात अशा दुर्घटना टाळण्यासाठी कठोर उपाययोजना करण्याची मागणी होत आहे.

COMMENTS