Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

मिनी बँकेच्या आडून लाखोंचा घोटाळा; गरीब मजुरांच्या घामाच्या पैशांवर डल्ला, केंद्र चालक फरार

नांदेड : ग्रामीण भागातील गरिबांना बँकिंग सेवा देण्यासाठी सुरू करण्यात आलेल्या ग्राहक सेवा केंद्राचा वापरच आर्थिक लुटीचे अड्डे म्हणून होत असल्याचा

पुण्यात वर्क फ्रॉम होमच्या बहाण्याने साडेसोळा लाखांचा गंडा
नेवाशात तिघांची 35 लाखांची फसवणूक
बीव्हीजी डेव्हलपर्सची 7 कोटींची फसवणूक

नांदेड : ग्रामीण भागातील गरिबांना बँकिंग सेवा देण्यासाठी सुरू करण्यात आलेल्या ग्राहक सेवा केंद्राचा वापरच आर्थिक लुटीचे अड्डे म्हणून होत असल्याचा धक्कादायक प्रकार नांदेड जिल्ह्यातील मुदखेड तालुक्यातील बारड येथे उघडकीस आला आहे. एसबीआय अंतर्गत चालणार्‍या ग्राहक सेवा केंद्राच्या चालकाने अशिक्षित आणि रोजंदारी मजुरांच्या विश्‍वासाचा गैरफायदा घेत लाखो रुपयांची फसवणूक केल्याचा आरोप होत असून, संबंधित केंद्र चालक रुपेश डाकोरे हा दुकान बंद करून फरार झाल्याने ग्रामस्थांमध्ये संतापाची लाट उसळली आहे.
ग्रामीण भागातील नागरिकांना बँकेत वारंवार चकरा माराव्या लागू नयेत म्हणून एसबीआय बँकेने गावपातळीवर ग्राहक सेवा केंद्रांची व्यवस्था केली आहे. आधार लिंकद्वारे पैसे काढणे, जमा करणे, खाते उघडणे, विविध विमा योजना आदी सेवा या केंद्रांद्वारे दिल्या जातात. त्यामुळे या केंद्रांना ग्रामीण भागात मिनी बँक अशीच ओळख मिळाली आहे. मात्र बारड येथील ग्राहक सेवा केंद्रात याच व्यवस्थेचा गैरफायदा घेत गरीब आणि अशिक्षित ग्राहकांच्या पैशांवर डल्ला मारल्याचा आरोप होत आहे. एनआयसीटी टेक्नॉलॉजीज पीआर कंपनी अंतर्गत चालणार्‍या या केंद्राचा चालक रुपेश डाकोरे याने अनेक ग्राहकांकडून बँकेत जमा करण्यासाठी रोख रक्कम घेतली; मात्र ती प्रत्यक्ष खात्यात जमा न करता स्वतःकडेच ठेवली, असा गंभीर आरोप ग्रामस्थांनी केला आहे. ग्राहकांना बनावट मेसेज दाखवून पैसे जमा झाल्याचा आभास निर्माण करणे, तर पैसे मागण्यासाठी आलेल्या ग्राहकांना इतरांकडून घेतलेल्या रकमेतून थोडेफार पैसे देऊन वेळ मारून नेणे, अशा पद्धतीने हा प्रकार अनेक महिन्यांपासून सुरू असल्याचे समोर येत आहे. बारड येथील रोजंदारी मजूर नामदेव पिटलेवाड यांनी सांगितले की, मला लिहिता-वाचता येत नाही. मी 1 लाख 20 हजार रुपये खात्यात जमा करण्यासाठी दिले होते. पण नंतर बँकेत चौकशी केली असता ते पैसे खात्यातच जमा नसल्याचे कळले. तर सरस्वतीबाई कांबळे यांनीही पासबुकवर नोंद करून देतो असे सांगून 80 हजार रुपये घेतल्याची आणि मजुरीतून साठवलेली आयुष्याची पुंजी लुटल्याची वेदना व्यक्त केली.
दरम्यान, या प्रकरणाबाबत शाखा व्यवस्थापक संदीप वट्टमवार यांनी सांगितले की, संबंधित ग्राहक सेवा केंद्र चालकाने अचानक दुकान बंद करून पलायन केले आहे. ग्राहकांच्या तक्रारी कंपनीच्या मुख्य कार्यालयाकडे पाठवण्यात आल्या असून, ग्राहकांचे पैसे परत न केल्यास संबंधितावर गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू केली जाईल. मात्र प्रश्‍न असा आहे की, आधीही अफरातफरीच्या तक्रारी असूनही केंद्र पुन्हा सुरू कसे करण्यात आले? गरीबांच्या कष्टाची कमाई लुटणार्‍यांवर केवळ चौकशी नव्हे, तर कठोर आणि तातडीची कारवाई व्हावी, अशी जोरदार मागणी आता संतप्त ग्रामस्थांकडून होत आहे.

COMMENTS