केज । प्रतिनिधी आरोग्य सेवेप्रती अढळ निष्ठा, रुग्णांविषयी असलेली संवेदनशीलता आणि प्रदीर्घ सेवाकार्याच्या जोरावर अधिपरिचारिका ज्योती विलासराव आरकडे

केज । प्रतिनिधी
आरोग्य सेवेप्रती अढळ निष्ठा, रुग्णांविषयी असलेली संवेदनशीलता आणि प्रदीर्घ सेवाकार्याच्या जोरावर अधिपरिचारिका ज्योती विलासराव आरकडे-मस्के यांना ‘उत्कृष्ट अधिपरिचारिका’ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
राष्ट्रीय पत्रकार संघ, मराठी पत्रकार परिषद व पुरोगामी पत्रकार संघ यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आलेल्या विशेष सन्मान सोहळ्यात त्यांच्या उल्लेखनीय आरोग्य सेवेला गौरविण्यात आले. ग्रामीण व दुर्गम भागातील रुग्णांसाठी केलेल्या निस्वार्थ सेवेमुळे त्यांना हा मानाचा पुरस्कार प्रदान करण्यात आला. ज्योती आरकडे-मस्के यांनी आपल्या सेवाकाळात बीड व नांदेड जिल्ह्यातील विविध शासकीय रुग्णालयांमध्ये कार्य करत आरोग्य सेवेचा ठसा उमटवला आहे. त्यांनी उपजिल्हा रुग्णालय केज, ग्रामीण रुग्णालय धारूर, ग्रामीण रुग्णालय भोकर (जि. नांदेड) तसेच जिल्हा रुग्णालय बीडच्या मोबाईल वैद्यकीय पथकात कार्य करत दुर्गम भागातील रुग्णांना सेवा दिली आहे. आरोग्य क्षेत्रातील त्यांच्या अनुभवाची व्याप्ती मोठी असून आतापर्यंत त्यांनी 10 हजारांहून अधिक विविध शस्त्रक्रियांमध्ये सहाय्यक म्हणून जबाबदारी यशस्वीरीत्या पार पाडली आहे. यामध्ये सुमारे 5 हजार मोतीबिंदू शस्त्रक्रियांमध्ये त्यांनी महत्त्वपूर्ण योगदान देत नेत्रसेवेतही उल्लेखनीय कार्य केले आहे. सध्या त्या स्त्री रुग्णालय, लोखंडीसावरगाव येथे कार्यरत असून प्रसूती शस्त्रक्रिया, हर्निया, अपेंडिक्स, गर्भपिशवी तसेच कुटुंब नियोजन शस्त्रक्रियांदरम्यान त्यांनी कौशल्यपूर्ण सेवा बजावली आहे. याशिवाय जिल्हा शल्यचिकित्सकांच्या मोबाईल टीमसोबत वाशी (जि. धाराशिव), आडस, बनसारोळा व धानोरा येथे आयोजित आरोग्य शिबिरांमध्येही त्यांनी सक्रिय सहभाग नोंदवला आहे. रुग्णांप्रती असलेली बांधिलकी, सेवाभाव आणि कर्तव्यनिष्ठा यामुळेच ज्योती आरकडे-मस्के यांना हा सन्मान मिळाला आहे. ग्रामीण भागातील हजारो गरजू रुग्णांसाठी त्यांचे कार्य प्रेरणादायी व दीपस्तंभासारखे आहे, अशी भावना यावेळी मान्यवरांनी व्यक्त केली.

COMMENTS