लोहा नगरपालिकेला सक्त सूचना; दुकानासमोर बॅनर नकोत; बॅनरसाठी ठरावीक जागा निश्चित करालोहा । प्रतिनिधीलोहा शहरात बॅनर लावण्याबाबत उच्च न्यायालयाच्या

लोहा नगरपालिकेला सक्त सूचना; दुकानासमोर बॅनर नकोत; बॅनरसाठी ठरावीक जागा निश्चित करा
लोहा । प्रतिनिधी
लोहा शहरात बॅनर लावण्याबाबत उच्च न्यायालयाच्या निर्देशांचे सर्रास उल्लंघन होत असल्याने आमदार प्रतापराव पाटील चिखलीकर यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. नगरपालिकेच्या कार्यपद्धतीवर असमाधान व्यक्त करत त्यांनी प्रशासनाला ‘क्शन मोड’मध्ये काम करण्याच्या सक्त सूचना दिल्या आहेत.
शहरातील विविध चौक, रस्ते, दुकानासमोर तसेच खासगी प्रतिष्ठानांवर मनमानी पद्धतीने बॅनर लावले जात असून, त्यामुळे शहराचे विद्रुपीकरण होत आहे. बॅनरसाठी स्वतंत्र जागा निश्चित करण्याचा निर्णय यापूर्वीही घेण्यात आला होता; मात्र तो केवळ कागदावरच राहिल्याने प्रत्यक्षात कोणतीही ठोस अंमलबजावणी झालेली नाही, हे यावेळी स्पष्ट झाले. आ. चिखलीकर यांनी मुख्याधिकारी श्रीकांत लाळगे यांना स्पष्ट शब्दांत बजावले की, यापुढे कोणत्याही दुकानासमोर किंवा खासगी आस्थापनासमोर बॅनर लावण्यास परवानगी देण्यात येऊ नये. बॅनरसाठी शहरात ठरावीक ठिकाणी स्वतंत्र जागा निश्चित करून नियमांची काटेकोर अंमलबजावणी करावी. नियम मोडणार्यांवर कोणतीही गय न करता दंडात्मक कारवाई करावी, अशा स्पष्ट सूचनाही त्यांनी दिल्या. दरम्यान, शहरातील वाढती वाहतूक कोंडी, मुख्य रस्त्यांवरील अतिक्रमणे आणि अस्ताव्यस्त पार्किंगमुळे नागरिकांना मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागत आहे. रुग्णवाहिका, शालेय विद्यार्थी, महिला व ज्येष्ठ नागरिक यांना याचा मोठा त्रास सहन करावा लागत असल्याचे निदर्शनास आले. या पार्श्वभूमीवर आमदार चिखलीकर यांनी अतिक्रमणे तातडीने हटवण्याचे, पार्किंग व्यवस्थेला शिस्त लावण्याचे तसेच वाहतूक सुरळीत ठेवण्यासाठी पोलीस प्रशासनाशी समन्वय साधण्याचे आदेश दिले. बुधवारी (दि. 5 फेब्रुवारी) लोहा नगरपालिकेत आमदार प्रतापराव पाटील चिखलीकर यांच्या प्रमुख उपस्थितीत नगरपालिकेच्या विविध अडचणी, प्रलंबित प्रश्न व विकासकामांबाबत सविस्तर आढावा बैठक पार पडली. ही बैठक नगराध्यक्ष माणिकराव पाटील यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आली. या बैठकीस नगराध्यक्ष शरद पवार, उपनगराध्यक्ष करीम शेख, माजी उपनगराध्यक्ष केशवराव मुकदम, पोलीस निरीक्षक नागनाथ आयलाने, मुख्याधिकारी श्रीकांत लाळगे, विविध विभागांचे अधिकारी, नगरसेवक, गटनेते तसेच पालिकेचे कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. आमदार चिखलीकर यांनी सर्व विभागांचा सविस्तर आढावा घेत स्वच्छता कामकाजाबाबत समाधान व्यक्त केले. तसेच जुन्या शहराकडे जाणार्या रस्त्यांवरील अतिक्रमणे तातडीने हटवावीत, बॅनर, वाहतूक आणि पार्किंग या मुद्द्यांवर ठोस व त्वरित कारवाई करावी, अन्यथा जबाबदारी निश्चित केली जाईल, असा इशाराही त्यांनी दिला.
शहरातील दुकानदारांना मोठा दिलासा
शहरात वाट्टेल तिथे व कितीही दिवस बॅनर लावण्याच्या प्रथेमुळे लाखो रुपये भाडे देणारे दुकानदार गेल्या अनेक वर्षांपासून त्रस्त होते. बॅनरमुळे दुकानांचा दर्शनी भाग झाकला जात असल्याने व्यवसायावरही परिणाम होत होता. मागील काळात बॅनरबाबत मोठ्या प्रमाणावर मनमानी सुरू होती. मात्र नवनिर्वाचित नगराध्यक्ष शरद पवार, उपनगराध्यक्ष करीम शेख व नगरसेवकांनी बॅनरसाठी स्वतंत्र जागा निश्चित करण्याचा निर्णय घेतल्याने आता परिस्थिती बदलण्याची चिन्हे दिसू लागली आहेत. या निर्णयाची प्रभावी अंमलबजावणी झाल्यास शहराचे विद्रुपीकरण थांबेल आणि दुकानदारांना मोठा दिलासा मिळणार आहे.

COMMENTS