पोलीस निरीक्षकांची तडकाफडकी उचलबांगडीमाजलगाव । प्रतिनिधीजिल्ह्यात वाळू वाहतुकीच्या नावाखाली सुरू असलेल्या हप्तेखोरीचा पर्दाफाश झाला असून, माजलगाव
पोलीस निरीक्षकांची तडकाफडकी उचलबांगडी
माजलगाव । प्रतिनिधी
जिल्ह्यात वाळू वाहतुकीच्या नावाखाली सुरू असलेल्या हप्तेखोरीचा पर्दाफाश झाला असून, माजलगाव शहर पोलीस ठाण्यातील कर्मचार्याला दरमहा 20 हजार रुपयांची लाच घेताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) रंगेहाथ पकडले आहे. या प्रकरणामुळे पोलीस प्रशासनात खळबळ उडाली असून, पोलीस अधीक्षक नवनीत काँवत यांनी कठोर भूमिका घेत शहर पोलीस निरीक्षक राहुल सूर्यतळ यांची तात्काळ उचलबांगडी करत त्यांची बदली नियंत्रण कक्षात केली आहे.
जिल्ह्यात वाळूच्या लिलाव प्रक्रियेचे टेंडर होऊन अवघे चार दिवस झाले असतानाच हप्तेखोरी सुरू झाल्याचा गंभीर प्रकार उघडकीस आला आहे. माजलगाव शहर पोलीस ठाण्यातील कर्मचारी अमोल कदम याने एका तक्रारदाराकडे वाळू वाहतूक सुरळीत राहण्यासाठी दरमहा 20 हजार रुपयांची मागणी केली होती. या व्यवहारासाठी खासगी इसम तात्यासाहेब आर्डे याच्यामार्फत रक्कम स्वीकारण्याचे ठरले होते. तक्रारदाराने या प्रकरणाची माहिती लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे दिल्यानंतर जालना येथील एसीबी उपअधीक्षक बाळासाहेब जाधव यांच्या नेतृत्वाखाली विशेष पथक तयार करण्यात आले. पथकाने संपूर्ण प्रकरणाची पडताळणी करून सापळा रचण्याचा निर्णय घेतला. बुधवारी माजलगाव बायपास रोडवरील लेंडाळ हॉस्पिटलसमोर एसीबी पथकाने सापळा रचला. कदमच्या सांगण्यावरून तात्यासाहेब आर्डे याने तक्रारदाराकडून 20 हजार रुपयांची लाच स्वीकारताच एसीबी पथकाने तत्काळ कारवाई करत दोघांनाही रंगेहाथ ताब्यात घेतले. आरोपींकडून लाच रक्कम जप्त करण्यात आली असून, पुढील कायदेशीर प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. या प्रकरणी माजलगाव शहर पोलीस ठाण्यात भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे. एसीबीकडून पुढील चौकशी सुरू असून, या प्रकरणात आणखी कोणी सहभागी आहे का, याचा तपास केला जात आहे. या लाचखोरीच्या प्रकरणामुळे पोलीस प्रशासनाची प्रतिमा मलीन झाल्याचे लक्षात घेऊन पोलीस अधीक्षक नवनीत काँवत यांनी तात्काळ कठोर पावले उचलली. शहर पोलीस निरीक्षक राहुल सूर्यतळ यांची माजलगाव शहर पोलीस ठाण्यातून तडकाफडकी बदली करून त्यांची नियुक्ती नियंत्रण कक्षात करण्यात आली आहे. तसेच माजलगाव शहर पोलीस ठाण्याचा अतिरिक्त पदभार पोलीस निरीक्षक उमाशंकर कस्तुरे यांच्याकडे सोपवण्यात आला आहे. या निर्णयामुळे पोलीस दलात मोठी चर्चा सुरू झाली आहे. काही दिवसांपूर्वी पाटोदा पोलीस ठाण्यातील कर्मचार्याने वाळूसाठी लाच घेतल्याप्रकरणी तेथील पोलीस निरीक्षकांचीही उचलबांगडी करण्यात आली होती. त्या घटनेनंतरही पुन्हा माजलगावमध्ये असा प्रकार घडल्याने पोलीस दलात खळबळ उडाली आहे. भ्रष्टाचार करणार्या कर्मचार्यांवर तसेच त्यांना पाठीशी घालणार्यांवर कठोर कारवाई करण्यात येईल, असा स्पष्ट संदेश पोलीस अधीक्षकांनी या कारवाईतून दिला आहे. त्यामुळे जिल्ह्यातील पोलीस यंत्रणेत शिस्त आणि पारदर्शकता आणण्याचा प्रयत्न प्रशासनाकडून सुरू असल्याचे चित्र दिसून येत आहे. या घटनेमुळे माजलगाव शहरात संतापाची लाट उसळली आहे. वाळू वाहतुकीच्या नावाखाली सुरू असलेली हप्तेखोरी, पोलिसांतील भ्रष्टाचार आणि प्रशासनाची भूमिका यावर नागरिकांकडून तीव्र प्रतिक्रिया व्यक्त करण्यात येत आहेत. सामान्य नागरिकांनी भ्रष्टाचाराविरोधात आवाज उठवावा आणि अशा घटनांची माहिती संबंधित यंत्रणेला द्यावी, असे आवाहन सामाजिक कार्यकर्त्यांकडून करण्यात येत आहे.

COMMENTS