नांदेड । प्रतिनिधी नांदेड वाघाळा महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रभाग क्रमांक दोनमध्ये राजकीय वातावरण चांगलेच तापले असून, पूर्वी काँग्रे
नांदेड । प्रतिनिधी
नांदेड वाघाळा महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रभाग क्रमांक दोनमध्ये राजकीय वातावरण चांगलेच तापले असून, पूर्वी काँग्रेसकडून निवडून गेलेल्या प्रस्थापित माजी नगरसेवकांविरोधात नागरिकांचा तीव्र रोष उफाळून येत आहे. पाच वर्षांच्या कार्यकाळात या नगरसेवकांनी प्रभागाकडे पाठ फिरवली, नागरिकांच्या मूलभूत समस्या दुर्लक्षित केल्या आणि केवळ निवडणुकीपुरतेच दर्शन दिले, असा थेट आरोप मतदारांकडून केला जात आहे.
या प्रभागातील सर्वात गंभीर आणि ज्वलंत समस्या म्हणजे पाण्याची टंचाई. अनेक भागांमध्ये दिवसेंदिवस अनियमित पाणीपुरवठा होत असून, काही ठिकाणी आठवड्यातून एकदाच पाणी येत असल्याची परिस्थिती आहे. नागरिकांना खासगी टँकरवर अवलंबून राहावे लागत असून त्याचा आर्थिक बोजा सामान्य कुटुंबांवर पडत आहे. कर मात्र वेळेवर भरायचे आणि सुविधा मात्र शून्य, अशी संतप्त प्रतिक्रिया स्थानिक नागरिक व्यक्त करत आहेत. महानगरपालिकेकडून घरपट्टी आणि नळपट्टीत मोठ्या प्रमाणावर वाढ करण्यात आली आहे. मात्र कर वाढीच्या तुलनेत नागरी सुविधा मिळत नसल्याने नागरिकांमध्ये तीव्र नाराजी आहे. रस्त्यांची दुरवस्था, सतत तुंबणार्या ड्रेनेज लाईन्स, पावसाळ्यात सांडपाण्याचे रस्त्यावर येणारे पाणी आणि दुर्गंधी यामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. अनेक वेळा तक्रारी करूनही त्याकडे गांभीर्याने पाहिले गेले नाही, असा आरोपही नागरिकांकडून करण्यात येत आहे. या प्रभागातील माजी नगरसेवक स्वतः या परिसरात राहत नसल्याने येथील रोजच्या समस्या त्यांना कधी जाणवल्याच नाहीत, अशी तीव्र टीका केली जात आहे. नगरसेवक आमच्यात राहिलेच नाहीत, मग आमचे प्रश्न त्यांना कसे कळणार? असा सवाल नागरिक विचारत आहेत. कचरा व्यवस्थापनाची स्थितीही अत्यंत बिकट असून अनेक ठिकाणी कचर्याचे ढीग साचलेले दिसून येतात. वेळेवर कचरा उचलला जात नसल्याने दुर्गंधी, डासांचा प्रादुर्भाव आणि रोगराईचा धोका वाढला आहे. नागरी प्रश्नांबाबत माजी नगरसेवकांनी कधीही ठोस पाठपुरावा केला नाही. महानगरपालिकेच्या सभागृहात प्रभागातील प्रश्न मांडले गेले नाहीत, निधी आणण्यासाठी प्रयत्न झाले नाहीत आणि प्रशासनावर दबाव टाकण्याची भूमिका दिसून आली नाही, असा आरोप स्थानिक सामाजिक कार्यकर्त्यांनी केला आहे. निवडणुकीच्या तोंडावर मात्र पुन्हा आश्वासनांचा पाऊस सुरू झाल्याने नागरिकांमध्ये प्रचंड असंतोष आहे. आता फक्त शब्दांवर नाही तर कामावर मत देणार, असा स्पष्ट इशारा प्रभाग क्रमांक दोनमधील मतदार देत आहेत. या निवडणुकीत प्रस्थापित राजकारणाला धक्का देण्याची तयारी नागरिकांनी केली असून, परिवर्तनाच्या दिशेने मतदारांचा कल झुकत असल्याचे चित्र सध्या दिसून येत आहे. पाणी, स्वच्छता, ड्रेनेज आणि मूलभूत नागरी सुविधा हेच यंदाच्या निवडणुकीतील निर्णायक मुद्दे ठरणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.

COMMENTS