Homeताज्या बातम्यासंपादकीय

सभ्य समाजाच्या मर्यादा ओलांडू नका !

कोरोना नंतरच्या काळात मानवी जीवनात सर्दी- खोकला हा आजार फार गंभीर स्वरूप धारण करतो आहे. श्वासाचा त्रास होण्याचा दमा सदृश्य आजार, हा महानगरांच्या

बाल हत्याकांडातील गावित बहिणींची फाशीची शिक्षा रद्द; मरेपर्यंत जन्मठेप
ईदच्या दिवशी पुन्हा होणार आयुष्मान खुरानाच्या ‘ड्रीम गर्ल २’ एन्ट्री
अल्पवयीन मुलीची गळा आवळून हत्या

कोरोना नंतरच्या काळात मानवी जीवनात सर्दी- खोकला हा आजार फार गंभीर स्वरूप धारण करतो आहे. श्वासाचा त्रास होण्याचा दमा सदृश्य आजार, हा महानगरांच्या जीवनामध्ये कबुतरांचा मोठा घोळका एका ठिकाणी जमा झाल्यामुळे अधिक त्रासदायक झाला आहे; असे थेट वैद्यकीय अहवाल सांगत आहेत. या वैद्यकीय अहवालांची दखल घेऊनच स्थानिक स्वराज्य संस्था प्रशासन, शासन यांनी जो निर्णय घेतला, तो म्हणजे महानगरातले कबूतरखाणे बंद करणे. विशेषतः मुंबईतील ५२ कबूतरखाणे बंद करावेत, अशा प्रकारचे आदेश दिले आहेत. या आदेशाच्या विरोधात एका विशेष समाजाने आंदोलन केले. वास्तविक, ज्या दिवशी आंदोलन झालं, त्या दिवशी कबूतर खाण्याजवळ शासनाने उभारलेल्या मंडपाला तोडण्याचा पूर्णपणे प्रयत्न झाला. आता या समाज विशेषाचे एक मुनी निलेशचंद्र विजय यांनी थेट धमकी दिली की, जर कबुतरांना अन्न टाकू दिलं नाही तर आम्ही न्यायालयाचा ही निर्णय मानणार नाही! म्हणजे कायदा मानणार नाही; आणि यात गर्भित इशारा देऊन ते असं म्हणतात की, सध्या आम्ही संविधानाला म्हणतो ना, न्यायालयाला म्हणतो ना, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना मानतो ना, पण, जर आम्हाला कबुतरांना अन्न टाकण्यापासून रोखलं गेलं, तर, आम्ही न्यायालयाचे ही मानणार नाही. याचा अर्थ असा की, शासन आणि प्रशासनाने जर कायद्यान्वये कोणता निर्णय घेतला तर तो आम्ही यापुढे मानणार नाही. वास्तविक, ‘अहिंसा परमो धर्म’ या तत्त्वावर हा समाज उभा राहिलेला आहे. परंतु, आज व्यावसायिक सुदृढ बनलेल्या या समाजाच्या कडे जर पाहिलं तर व्यवसायातील श्रीमंती त्यांच्याकडे आल्यामुळे ते बऱ्याच वेळा सत्ताधाऱ्यांशी जवळीक साधून असतात. परंतु, अशी जवळीकता ही अर्थपूर्ण व्यवहारातूनच उदयास येते. त्यामुळे, अर्थपूर्ण व्यवहार करूनही आपल्या मर्जीप्रमाणे जर शासन-प्रशासन निर्णय घेत नसेल, तर ते आम्ही मानणार नाही; अशा प्रकारची दर्पोक्ती त्यांच्या वक्तव्यांमध्ये येऊ पाहते. काल कुणीतरी मुनी असणाऱ्या धार्मिक व्यक्तीने या संदर्भात थेट इशारा दिला, कबुतरांना अन्न टाकण्यापासून आम्हाला रोखले तर आम्ही कायदा मानणार नाही! याचा अर्थ, कोणताही धर्म आणि त्या धर्माची मक्तेदारी असणारी विचारप्रणाली ही शासनावर आणि पर्यायाने जनतेवर लादता येणार नाही, हे आधी या मुनी असणाऱ्या व्यक्तीने लक्षात घ्यावं. मुंबईतील कबूतर खाण्यांमुळे आजूबाजूच्या परिसरातील राहणाऱ्या लोकांना जीवघेण्या आजारांना सामोर जावं लागतं. त्यांच्या आर्थिक कमजोरीमुळे त्यांना सरकारी उपचार केंद्रांवरच निर्भर राहावं लागतं. परंतु, जेव्हा दम्याचे आणि श्वासाचे आजार अशा व्यक्तींना ग्रासतात; तेव्हा, त्यांचे जीवन हे अगदी असाह्य होतं. या असाह्य आजाराने ग्रस्त असलेल्या लोकांवर हे मुनी महाशय जे कुणी आहेत ते उपचार करून देणार आहेत का? जसं पानपोई या समाजाकडून ठीकठिकाणी पुण्यसंपादन करण्यासाठी लावली जाते, तसे या समुदायाने ठिकठिकाणी धार्मिक हॉस्पिटल्स उभारून लोकांना उपचार करण्याची सोय आधी करावी; नंतर, त्यांना जे कबूतरखाणे चालवायचे असतील, ते त्यांनी चालवावे. त्यांना त्याच्यापासून कुणी रोखत नाही. परंतु, त्यासाठी कबुतरांची एक सवय असते की, जर बंगला असेल, घर असेल आणि ते जर रिकाम असेल तर, त्या ठिकाणी हजारो कबूतर आपली वस्ती करतात. वास्तविक, जो समाज हे आंदोलन करतो आहे, त्या समाजाकडे मोठ्या प्रमाणात मालमत्ता, पैसा, साधनसामुग्री आहे. त्यांना भूतदया करून जे पुण्य संचय करायचे आहे, त्यांनी अशा पक्षांसाठी, पशुंसाठी खुशाल बंगले उभे करावेत. त्या ठिकाणी हजारो लाखो पक्षांना त्यांनी रोज अन्न घालावं. त्या बंगल्याला आजूबाजूंनी त्यांनी जाळी लावावी. जेणेकरून इतरांना त्रास होणार नाही. सभ्य समाजाचं पहिलं लक्षण असतं, ते म्हणजे आपल्या कोणत्याही कृत्या पासून आपल्या समोर असणाऱ्या, आजूबाजूला राहणाऱ्या किंवा समाजात सहजीवन जगणाऱ्या व्यक्ती या सर्वांना कोणताही त्रास होऊ नये, ही काळजी आधी घेतात. संस्काराने सभ्यता ही दुसऱ्यांच्या सन्मानातून येते. पण, या कबूतर खाण्यावरून काहीशा चवताळलेल्या समुदायाने समाजाचा सन्मान आणि आपल्यापासून त्यांना होणारा त्रास अधिक वाढवण्याचा जो चंग बांधला आहे, तर त्याची दखल एकदा घ्यावी म्हणूनच आजची ही दखल आम्ही घेत आहोत. पैसा हा मानवी जीवनात फार महत्त्वाचा नाही. मानवी जीवन जगण्यासाठी जे वातावरण हवं असतं, ते वातावरण निर्माण करणं, झाडे, वनस्पती, पशुपक्षी यांच्या सगळ्यांच्या सहवासाने ते होत असलं तरी, ज्यांनी या मानवी जीवनाला त्रास ठरलेल्या पक्षांना आपल्या अवतीभवती बाळगण्याचा जो चंग बांधला आहे, त्यांनी सर्वप्रथम समाजासाठी चांगले हॉस्पिटल्स मोफत उपलब्ध करून द्यावेत. त्यांनी त्या पक्षांना स्वतंत्रपणे राहण्यासाठी आपल्या पैशातून चांगले बंगले उभे करून द्यावेत आणि त्या ठिकाणी त्यांनी रोज त्यांना अन्नधान्य देण्यासाठी जावं. या कोणत्याही गोष्टींना लोकांचा अडथळा येणार नाही. परंतु, जिथे सार्वजनिक स्थळावर, गर्दीच्या स्थळांवर, जिथे मानवी समुदाय खूप मोठ्या प्रमाणात वास्तव्य करतो, अशा ठिकाणी आरोग्य बिघडवण्यास कारणीभूत ठरलेल्या कबुतरांना आम्हाला भोजन देऊ द्या, हा जो आग्रह आहे, तो आदी मानवा सारखा सुरू आहे. यावर स्पष्टपणे बोलण्याची आता गरज निर्माण झाली आहे. कायदा सुव्यवस्था ठेवण्याची जबाबदारी या देशातल्या प्रत्येक नागरिकाची आहे. पक्षांच्या खाण्यावरून जर एखादी व्यक्ती कायदा मोडण्याची, न्यायालयांना न मानण्याची धमकी देत असेल, तर, त्यांना आधी तुरुंगाचा रस्ता दाखवायला हवा. कारण, हा देश संविधानाने चाललेल्या कायद्यानुसार चालला पाहिजे आणि त्या ठिकाणी सर्वांना जो अधिकार आहे तो कायद्यात पालनाचा अधिकार त्याचं कर्तव्य बजवावं लागेल. जर यांच्या धार्मिक भावना अशा गोष्टींच्या आड येत असतील तर, त्या धार्मिक भावनांना त्यांनी त्यांच्या घराच्या चार भिंतीच्या आड जोपासले पाहिजे. कोणत्याही व्यक्तीच्या आणि समुदायाची धार्मिक भावना ही देशाच्या रस्त्यावर आणि देशाच्या नागरिकांवर सक्तीची होऊ शकत नाही. त्यामुळे मानवी जीवनाचे मूल्य या सगळ्या समुदायांनी ठेवलं पाहिजे, मानवी समाज समूहाला धोक्यात आणणारा विचार आणि त्यासाठी आम्ही कायदा आणि सुव्यवस्था ही प्रसंगी मोडीत काढू, असा गर्भित इशारा व्यवस्थेला देणाऱ्यांवर कडक कारवाई करून त्यांना त्या कारवाईच्या अधिन आणून त्याची योग्य ती शिक्षाही दिली गेली पाहिजे. कारण, एका बाजूला ९५% माणसं हे म्हणत असताना की, त्यांच्या आरोग्यावर विपरीत परिणाम होतो आहे. शास्त्रीय पद्धतीने संशोधन होऊन संशोधनाचा निष्कर्ष येऊन त्यावर प्रत्यक्ष कायदा काम करायला लागला. याला एक दीर्घ काळ जातो. हा १०-१५ वर्षाचा काळ यासाठी लागलेला आहे. परंतु, या सगळ्यांकडे दुर्लक्ष करून केवळ आम्ही म्हणू तेच करा, ही जी अरेरावीची भाषा समुदाय विशेषाने सुरू केली आहे. त्यामुळे सर्वसामान्य लोकांच्या जीवावर उठण्याचा खेळ त्यांनी चालवला आहे. आणि प्रसंगी शस्त्र धारण करण्याची जी ते भाषा करत आहेत, या सगळ्या शब्दातून त्यांनी मर्यादा ओलांडलेल्या आहेत. या मर्यादा ओलांडण्याची धमक त्यांच्याकडे याचमुळे आलेले आहे की, त्यांना आपण सत्तेवर असणाऱ्या लोकांचे सावकार आहोत, अशी घमेंड निर्माण झालेली आहे. त्यामुळे शासनाने प्रशासनाने अशा अरेरावी करणाऱ्यांची घमेंड जिरवण्याची वेळ आता आली आहे.

COMMENTS