Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

नांदेड जिल्ह्यातील अपघातात 4 जणांचा मृत्यू; हडसणी फाटा बनला ‘मृत्यूचा सापळा’; एकाची प्रकृती चिंताजनक

नांदेड : तालुक्यातील हडसणी फाटा येथे अपघातांची मालिका थांबण्याचे नाव घेत नाही. बुधवारी (22 एप्रिल) रात्री घडलेल्या भीषण अपघातात एकाच कुटुंबातील त

कोल्हारजवळील गर्भगिरी डोंगराला भीषण आग;एक हजार एकर क्षेत्राचे नुकसान, पशुपक्षी, झाडांची राख
देवळाली प्रवरा परिसरात ड्रोनसह हत्यारबंद तरुणांचा वावर
बुळे पठारमध्ये तीव्र पाणीटंचाई महिलांसह चिमुरड्यांची वणवण; एक हंड्यासाठी तीन किलोमीटरची पायपीट

नांदेड : तालुक्यातील हडसणी फाटा येथे अपघातांची मालिका थांबण्याचे नाव घेत नाही. बुधवारी (22 एप्रिल) रात्री घडलेल्या भीषण अपघातात एकाच कुटुंबातील तिघांसह चार जणांचा मृत्यू झाला, तर एक जण गंभीर जखमी असून त्याची प्रकृती चिंताजनक आहे. या दुर्दैवी घटनेमुळे संपूर्ण परिसरात शोककळा पसरली असून नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, एम एच12 के एन-2509 क्रमांकाची भरधाव स्विफ्ट डिझायर कार हडसणी फाट्यावरून जात असताना तिने दोन दुचाकींना जोरदार धडक दिली. या अपघातात पहिल्या दुचाकीवरील रेखाबाई भाऊराव नरवाडे (42), त्यांचा मुलगा यशवंत भाऊराव नरवाडे (23) आणि नणंद अनुसया बालाजी लोणाळे (43) यांचा जागीच मृत्यू झाला. एकाच कुटुंबातील तिघांचा मृत्यू झाल्याने नरवाडे कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. दुसर्‍या दुचाकीवरील दोघे गंभीर जखमी झाले. त्यांना तातडीने हदगाव उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यापैकी भोकर येथील एका जखमीचा उपचारादरम्यान मृत्यू झाला, तर दुसर्‍या जखमीला पुढील उपचारासाठी नांदेड येथे हलवण्यात आले असून त्याची प्रकृती अत्यंत चिंताजनक असल्याचे डॉक्टरांनी सांगितले. हडसणी फाटा हा परिसरातील नागरिकांसाठी अक्षरशः ‘मृत्यूचा सापळा’ ठरत असल्याची भावना तीव्र झाली आहे. विशेष म्हणजे 21 एप्रिल रोजी याच ठिकाणी दोन अपघात झाले होते, आणि त्यानंतर अवघ्या 24 तासांत पुन्हा हा भीषण अपघात घडल्याने प्रशासनाच्या निष्क्रियतेवर प्रश्‍नचिन्ह निर्माण झाले आहे. स्थानिक नागरिकांनी यापूर्वी अनेकदा या ठिकाणी स्पीड ब्रेकर, रेडियम साईनबोर्ड, तसेच हायमास्ट लाईट बसवण्याची मागणी केली होती. मात्र, सार्वजनिक बांधकाम विभागाने या मागण्यांकडे दुर्लक्ष केल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे.

संतप्त ग्रामस्थांचा घेराव
या पार्श्‍वभूमीवर संतप्त ग्रामस्थांनी गुरुवारी (23 एप्रिल) सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकार्‍यांना घेराव घालत तीव्र संताप व्यक्त केला. आता तरी ठोस उपाययोजना करा, अन्यथा आंदोलन अधिक तीव्र करू, असा इशाराही ग्रामस्थांनी दिला. दरम्यान, या अपघाताची चौकशी सुरू असून संबंधितांवर कठोर कारवाई करण्यात येणार असल्याचे प्रशासनाने सांगितले आहे. मात्र, वारंवार होणारे अपघात रोखण्यासाठी तातडीने कायमस्वरूपी उपाययोजना करणे अत्यावश्यक असल्याची मागणी सर्व स्तरांतून होत आहे.

COMMENTS