पुणे : शहरातील हडपसर परिसरात निष्काळजीपणामुळे घडलेल्या एका दुर्दैवी घटनेत साडेचार वर्षांच्या बालिकेचा मृत्यू झाला आहे. सोसायटीच्या आवारातील लोखंड

पुणे : शहरातील हडपसर परिसरात निष्काळजीपणामुळे घडलेल्या एका दुर्दैवी घटनेत साडेचार वर्षांच्या बालिकेचा मृत्यू झाला आहे. सोसायटीच्या आवारातील लोखंडी घसरगुंडी अंगावर कोसळल्याने ही दुर्घटना घडली. या प्रकरणी सोसायटीच्या पदाधिकार्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
ही घटना मगरपट्टा भागातील वेदविहार सोसायटीत घडली. अनिका नवनाथ देवीकर (वय साडेचार) ही चिमुरडी इतर मुलांसोबत खेळत असताना, नीट बसवलेली नसलेली लोखंडी घसरगुंडी अचानक तिच्यावर कोसळली. या अपघातात तिच्या डोक्याला, चेहर्याला आणि मानेला गंभीर मार लागला. घटनास्थळीच ती बेशुद्ध पडली. कुटुंबीयांनी तातडीने तिला जवळच्या खासगी रुग्णालयात दाखल केले; मात्र उपचार सुरू असतानाच तिचा मृत्यू झाला. या प्रकरणी अनिकाचे वडील नवनाथ पांडुरंग देवीकर यांनी पोलिसांत दिलेल्या फिर्यादीत गंभीर आरोप केले आहेत. त्यांच्या म्हणण्यानुसार, संबंधित घसरगुंडी व्यवस्थित बसवलेली नसल्याची बाब त्यांनी यापूर्वी अनेक वेळा सोसायटीच्या पदाधिकार्यांच्या निदर्शनास आणून दिली होती. ती हटवण्याबाबत तक्रारीही करण्यात आल्या होत्या; मात्र कोणतीही दखल घेतली गेली नाही. या निष्काळजीपणामुळेच मुलीचा जीव गेला, असा आरोप करत वडिलांनी तक्रार दाखल केली. त्यानुसार पोलिसांनी सोसायटीचे अध्यक्ष आणि इतर संबंधित पदाधिकार्यांविरुद्ध गुन्हा नोंदवला आहे. हडपसर पोलिस ठाण्याचे अधिकारी या प्रकरणाचा अधिक तपास करत असून, घसरगुंडीच्या बसवणीतील त्रुटी, देखभालीतील दुर्लक्ष आणि जबाबदारी निश्चित करण्यावर भर दिला जात आहे.

COMMENTS