पवारांची गुगली

Homeसंपादकीय

पवारांची गुगली

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या वर्धापनदिनानिमित्त केलेले भाष्य अनेक दृष्टीने महत्त्वाचे आहे.

सेक्युलर आणि सेक्युलॅरिझम वास्तव आणि विचार!
केरळ उत्तम उदाहरण
मोदी मंत्रिमंडळाचा चेहरा बहुजन !

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या वर्धापनदिनानिमित्त केलेले भाष्य अनेक दृष्टीने महत्त्वाचे आहे. त्यातून त्यांनी काँग्रेस आणि भाजप या दोन राष्ट्रीय पक्षांना पुरेसा संदेश दिला आहे. तसेच शिवसेनेसला चुचकारून तिलाही भाजपच्या कच्छपि लागणार नाही, याची व्यवस्था केली आहे. पवार यांचे हे भाष्य येण्याअगोदर गेल्या आठवड्यात घडलेल्या महत्त्वाच्या घटनांचा विचार करावा लागेल. माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शरद पवार यांची घेतलेली भेट, त्याअगोदर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सरकार चालवण्याची जबाबदारी एकट्या शिवसेनेची नाही, हा दिलेला इशारा पाहिला, तर राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेतही दरी निर्माण झाली होती. ठाकरे यांच्या दिल्ली दौर्‍यात अजित पवार, अशोक चव्हाण यांना दूर ठेवून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यांशी केलेल्या एकांतातील चर्चा अधिक चर्चिली गेली. 

`    ठाकरे, अजित पवार, अशोक चव्हाण यांनी दिल्ली दरबारी मांडलेल्या 12 प्रश्‍नांपेक्षाही ठाकरे-मोदी यांच्या भेटीवर अधिक प्रश्‍न उपस्थित झाले. काँग्रेसने वारंवार सरकारमधून बाहेर पडण्याची दिलेली धमकी आणि राष्ट्रवादी काँग्रेसशीही झालेला बेसूर या पार्श्‍वभूमीवर मोदी-ठाकरे यांच्यांतील गोपनीय चर्चा दोन्ही पक्षांसाठी सूचक इशारा मानली जात होती. ठाकरे यांनीही मोदी यांच्या भेटीचे समर्थन करताना त्यांना भेटायला जाणे म्हणजे नवाज शरीफ यांना भेटायला जाणे नाही, असे सांगताना प्रत्यक्षात मोदी यांनाही टोला लगावला होता. मोदी यांच्यासोबत नसलो, तरी त्यांच्यात आणि आपल्यात दुरावा नाही, हे ठाकरे यांचे सांगणे महाराष्ट्र भाजपही इशाराच होता. त्यामुळे देवेंद्र फडणवीस, चंद्रकांतदादा पाटील यांच्या प्रतिक्रियांत बदल झाला होता. दोन्ही काँग्रेस फारच आकांडतांडव करायला लागल्या, तर शिवसेना आणि भाजप हे दोन्ही पक्ष काही तडजोडी करून सत्तेसाठी एकत्र येऊ शकतात, असे संकेत दिल्ली भेटीतून मिळत होते. त्यामुळे महाराष्ट्रातील राजकीय समीकरणे बदलतात, की काय अशी शंका यायला लागली होती. या सर्व चर्चांना शरद पवार यांनी बेदखल केले. उलट, बाळासाहेब ठाकरे यांचे उदाहरण देऊन त्यांनी काँग्रेसला कसे समर्थन दिले होते, याची आठवण जागी केली. काँग्रेसला ठाकरे यांनी केलेल्या मदतीची जाणीव करून देताना आता काँग्रेसला फार ताणून न धरण्याचा सल्ला दिला आहे. महाराष्ट्रात सत्तेवर आलेले शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे सरकार शरद पवार यांच्यामुळेच आहे, हे जगजाहीर आहे. सरकारला स्थैर्य यावे, म्हणून पवार यांनीच उद्धव ठाकरे यांना मुख्यमंत्री केले. या पार्श्‍वभूमीवर राज्यात सत्तेवर असलेले सरकार टिकवण्याची जबाबदारी पवार यांच्यावर आहे. त्यामुळे कोणत्याही परिस्थितीत ते सरकार पडू देणार नाही. भाजपवर ते ममता दीदींइतके पवार तुटून पडणार नाहीत, हे कितीही खरे असले, तरी आता ते भाजपच्या कच्छपि ते लागणार नाही, हे ही खरे आहे. त्यांच्या मुलाखतीतून ही तेच स्पष्ट झाले. काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसची नैसर्गिक युती असली, तरी काँग्रेस कायम राष्ट्रवादीच्या यशात कोलदांडा घालीत असते. त्यामुळे काँग्रेसला आता राष्ट्रवादी काँग्रेसने शिवसेना हा पर्याय शोधला आहे. पवार यांच्या मुलाखतीतून हे ध्वनित झाले.

    राजगुरूनगर, पारनेर, नगर, परभणी आदी ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेत कडवा संघर्ष झाला असला, तरी राज्य पातळीवर दोन्ही पक्षांत समन्वय आहे. स्थानिक पातळीवरच्या वादाचे परिणाम राज्यात होऊ द्यायचा नाही; उलट जमेल तसे दोन्ही पक्ष जुळवून घेत आहेत. ठाकरे-मोदी यांच्या भेटीनंतर लगेच राज्यात नवीन कृषी कायदा तायर करणे, जिल्हा बँकांच्या अस्तित्त्वासाठी समिती तयार करणे आणि इंधनदरवाढीवरून भाजपविरोधात आंदोलन करणे यावरून राज्यातील सरकार भाजपविरुद्ध आहे आणि कोणताही एक नाही, तर तीनही पक्ष बरोबर आहेत, ही खेळी पवार यांनी केली आहे. पवार यांनी शिवसेना आणि आपण एकत्र काम करु शकतो असे कोणाला पटले नसते असे म्हटले आहे. आपण राज्याला वेगळ्या विचारांचे सरकार दिले असून पुढील पाच वर्षे हे सरकार टिकेल, असा विश्‍वास त्यांनी व्यक्त केला. आपण लोकांना पर्याय दिला आणि त्यांनी तो स्वीकारला. तिन्ही पक्षांनी योग्य पावले टाकली आणि आज हे आघाडी सरकार चांगल्या रितीने काम करत आहे, असे कौतुक पवार यांनी केले. ठाकरे यांच्या दिल्ली दौर्‍यानंतर शिवसेनेबद्दल अविश्‍वास व्यक्त व्हायला लागला होता; परंतु प्रधानमंत्री मुख्यमंत्र्यांसोबत स्वतंत्र बसले आणि चर्चा केली. लगेच वेगवेगळ्या शंका घेण्यात आल्या असे सांगत पवार यांनी टीकाकारांना उत्तर दिले. शिवसेनेसोबत आपण कधी काम केले नाही; पण महाराष्ट्र शिवसेनेलासुद्धा कित्येक वर्षांपासून पाहत आहे. माझा यासंबंधीचा अनुभव विश्‍वास असणाराच आहे, असे प्रशस्तीपत्रक पवार यांनी शिवसेनेला दिले. देशात राजकीय पक्षांचे पीक येते. पक्ष निघतात. ते कधी संपतात, असे अनेकदा होते; परंतु राष्ट्रवादी काँग्रेसने 22 वर्षे पूर्ण केली. सहकार्‍यांच्या कष्टाने, जनतेच्या बांधिलकीमुळे आज आपण इथपर्यंत पोहोचलो आहेत. जनतेचा विश्‍वास संपादन करण्यात आपण यशस्वी ठरलो आहोत. कधी आपण सत्तेत होतो तर कधी नव्हतो; पण त्याचा त्याचा फारसा काही परिणाम होत नाही, अशा शब्दांत पवार यांनी विरोधकांना सुनावले. सततची सत्ता भ्रष्ट करते, त्यातून लोक दूर जातात असा संदेशही त्यांनी सूचकपणे दिला. एकाचवेळी अनेकांना इशारे आणि गुगल्या टाकण्यात पवार यशस्वी झाले आहेत. त्याचबरोबर या 22 वर्षांत राष्ट्रवादी काँग्रेसच्या मर्यादाही स्पष्ट झाल्या.

COMMENTS