निसर्गाचा नजारा

Homeताज्या बातम्यासंपादकीय

निसर्गाचा नजारा

मागील दोन वर्षांपासून कोरोनामुळे राज्यातील आणि देशातील सर्वच उत्सव बंद होते. यंदाचा काजवा महोत्सव कोरोनाच्या सावटामधून मुक्त झाला असून, हा काजवा महोत

भारत-चीन संघर्ष नव्या वळणावर
युक्रेनची गोची आणि युरोपला संधी
सांस्कृतिक दहशतवादाला खतपाणी

मागील दोन वर्षांपासून कोरोनामुळे राज्यातील आणि देशातील सर्वच उत्सव बंद होते. यंदाचा काजवा महोत्सव कोरोनाच्या सावटामधून मुक्त झाला असून, हा काजवा महोत्सव सुरु करण्याचा निर्णय वन्यजीव विभागाने घेतला आहे. दरवर्षी मे महिन्याच्या शेवटच्या आणि जूनच्या पहिल्या, दुसर्‍या आठवड्यात भंडारदरा कळसुबाई अभयारण्याच्या परिसरात काजवा महोत्सवाचे आयोजन केले जाते. पावसाळ्याची चाहूल लागताच अंधारातील काजव्यांची लखलखती दुनिया अनुभवण्यासाठी पर्यटकांची पावले नाशिक-अहमदनगर जिल्ह्याच्या सीमेवरील भंडारदरा वनपरिक्षेत्रात येणार्‍या कळसूबाई-हरिश्चंद्रगड अभयारण्याच्या दिशेने वळतात. जंगलातील सादडा, हिरडा, जांभूळ, आंबा, उंबर, बेहडा वृक्षांवर काजवे चमचम चमकतात. लखलख करणार्‍या काजव्यांच्या रूपाने अनोखा प्रकाशोत्सव अनुभव घेण्यासाठी राज्यभरातील पर्यटक गर्दी करतात. ग्रीष्म ऋतू संपतो न संपतोय तोच वर्षा राणीच्या स्वागतासाठी निसर्ग जणू काजव्यांच्या रुपात धरतीवर अवतरलाय की काय असा विचार याठिकाणी मनात चमकून जातो. आकाशातील तारांगणच जणू भुईवर उतरलेय अशी परिस्थिती निर्माण होते. काजव्यांच्या अस्तित्वाने रात्रीच्या प्रकाशाचा अदभूत खेळ तासन-तास पाहत बसलो तरी मन काही तृप्त होत नाही असा हा काजवा महोत्सव यंदा पर्यटकांना पाहायला मिळणार आहे. त्यामुळेच नुसतेच काजवे पाहणे निसर्गप्रेमींच्या दृष्टीने एक अविस्मरणीय अनुभव असतो. भंडारद-याच्या वन्यजीव विभागाच्या कार्यक्षेत्रात १५ मे ते १५ जुन या कालावधीत काजवा महोत्सव आयोजित करण्यात आला आहे. काजव्यांचे दिवसेंदिवस प्रमाण घटत चालल्याचे दिसुन येत असुन काजव्यांच्या कालचक्रात कोणतीही बाधा येऊ नये म्हणुन वनविभागाकडुन काही ठोस पावले उचलली गेली आहेत. त्यासाठी काजवा महोत्सवात भंडारदरा परीसरात येणाऱ्या पर्यटकांना एका विशिष्ट ठिकाणी आपली वाहने पार्क करुन नंतरच काजव्यांचा आनंद घेता येणार आहे. मद्य, साऊंड सिस्टीम, व प्लास्टिक पर्यटकांना अभयारण्यात घेऊन जाता येणार नाही. अभयारण्यात वरिलपैकी कोणतीही वस्तु आढळुन आल्यास किमान ५ हजार रु .दंड आकारण्यात येणार असल्याचा स्तुत्य निर्णय वन्यजीव विभागाने नुकताच घेतला आहे. भंडारदरा-घाटघर-कळसूबाई परिसरातील हजारो झाडांवर काजव्यांची ही मायावी दुनिया अवतरते आणि हे दृश्य डोळ्याचे पारणे फेडून टाकणारे असते. कळसूबाईच्या पायथ्याशी वसलेल्या घाटघर, उडदावणे, पांजरे, मुरशेत, मुतखेल, कोलटेंभे भंडारदरा, चिचोंडी, बारी, या आदिवासी खेड्यांच्या शिवारात तसेच रंधा धबधब्याजवळ झाडे लक्षावधी काजव्यांनी लगडली आहेत. झाडांच्या खोडांवर, फांद्यावर, पानांवर लक्ष लक्ष काजवे बसलेले असतात. हे लुकलुकत होणारी काजव्यांची प्रकाशफुले आपल्या डोळ्यांना सुखाऊन जातात. असे दृश्य पाहणे म्हणजे एकप्रकारे आकाशगंगा पाहण्यासारखे आहे. कुतूहलमिश्रीत आणि विस्मयचकित मुद्रेने निसर्गवैभव सर्वच जण पाहतच राहतात. आणि पाहता-पाहाता भान हरपून जातात. भोवतीच्या विराट पसा-यात रात्रीच्या प्रकाशाचा अदभूत खेळ  खेळत स्वत:ला हरवून बसतो. पर्यटकांसह निसर्गप्रेमींची नाशिक आणि अहमदनगर जिल्ह्याच्या सीमेवरील भंडारदर्‍यातील अभयारण्याला पसंती मिळते. काजवा महोत्सवासाठी नाशिकसह पुणे-मुंबई येथील सुमारे पन्नास हजार पर्यटक दरवर्षी हजेरी लावतात. प्रवेश शुल्कासह इतर सुविधांच्या माध्यातून वन्यजीव विभागाला सुमारे सात ते आठ लाखांचे उत्पन्न मिळते. तर निवास आणि गाइडच्या माध्यमातून स्थानिकांना रोजगार मिळतो. महोत्सव कालावधीत लाखो रुपयांची उलाढाल होते. १५ मे ते १५ जुन या कालावधीत निसगप्रेमींसाठी हा निसर्गाचा नजारा. निसर्गप्रेमींनी यावे पण वन्यजीव कायद्याचे पालनही करावे ही अपेक्षा. 

COMMENTS