Homeताज्या बातम्यासंपादकीय

दहशतवादाची कीड ठेचण्याचे आव्हान

भारतासारख्या सार्वभौम देशाला दहशतवादाची लागलेली कीड अजूनही ठेचून काढता आलेली नाही. पाकिस्तानातून होणारे हल्ले आणि त्याचबरोबर पंजाब प्रातांतून स्व

अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या निमित्ताने…
पायाभूत सुविधांचा अभाव
वंचितांचा नायक  

भारतासारख्या सार्वभौम देशाला दहशतवादाची लागलेली कीड अजूनही ठेचून काढता आलेली नाही. पाकिस्तानातून होणारे हल्ले आणि त्याचबरोबर पंजाब प्रातांतून स्वतंत्र खलिस्तानची मागणी करणार्‍यांची संख्या वाढत चालली आहे. त्यातून अमृतपाल सिंग सारखे दहशतवादी जन्माला येत आहे. त्यामुळे दहशतवादाची कीड ठेचण्याचे मोठे आव्हान आपल्यासमोर आहे. मात्र त्याचबरोर अमृतपाल सिंग याला पोसणारे कोण, तो मोठा होत असतांना, पोलिस प्रशासन काय करत होते, हा देखील महत्वाचा प्रश्‍न आहे. पोलिसांना आपल्या परिसराची, इत्यंभूत माहिती असते. आपल्या परिसरात ज्या काही घडामोडी घडत आहेत, त्याची माहिती असतांना, अमृतपाल सिंगकडे दुर्लक्ष करण्यामागे नेमके कारण काय, याचा शोध घेण्याची गरज आहे. अमृतपाल सिंगने स्वतंत्र खलिस्तानची मागणी केल्यानंतर तो चर्चेचा विषय ठरला. त अमृतपाल सिंग ’वारिस पंजाब दे’ या संस्थेचा प्रमुख आहे. ही संस्था अभिनेता आणि कार्यकर्ता दीप सिद्घूने स्थापन केली होती. शेतकरी आंदोलनाच्यावेळी ती चर्चेत आली होती. मात्र त्याचवेळी या संस्थेचा मोटो, तिचे कार्य आणि उद्देश पोलिसांना माहीत नसणार असे नाही. मात्र तरी देखील अमृतपाल सिंगकडे दुर्लक्ष केल्यामुळे त्याला पाहिजे ती रसद मिळू लागली. त्यातूनच त्याचे संबंध पाकिस्तानातील विविध संघटनांशी यायला सुरुवात झाली. त्याचबरोबर मिळणारी शस्त्रास्त्रे आणि आर्थिक रसद यामुळे अमृतपाल सिंगने आपले स्वतःचे नेटवर्क प्रस्थापित करण्याचा प्रयत्न केला. यातून अमृतपाल सिंग देशविरोधी कारवाया करतांना आढळून आला. पंजाब पोलिस 18 मार्चपासून अमृतपाल सिंग आणि त्याच्या सहकार्‍यांच्या शोधात आहे. गेल्या महिन्यापासून तो राष्ट्रीय चर्चेचा विषय झाला आहे. तो आणि त्याच्या साथीदाराने अमृतसरच्या अजनाला पोलिस स्टेशवनर हल्ला केला करून त्याच्या साथीदाराला पोलिस कोठडीतून सोडवण्याची मागणी केली होती. त्यांनी अनेक तास पोलिस स्टेशन ताब्यात घेतले होते. पोलिस हतबलपणे ही सगळी परिस्थिती पाहत होते आणि शेवटी त्याच्या साथीदाराला सोडण्यात आले. अमृतपाल केवळ देशविघाताक कारवायांसाठी प्रसिद्ध नसून त्याने अनेक मुलींचे अश्‍लील व्हिडीओ बनवून त्यांना ब्लॅकमेलही केले आहे. त्यांना प्रेमाच्या जाळ्यात अडकवून तो धमक्या द्यायचा. अनेक मुलींसोबत त्याने हे कृत्य केले आहे. पोलिसांनी पंजाबसह, जम्मू-काश्मीर उत्तराखंडसह विविध राज्यात त्याचा शोध घेणे सुरु आहे. त्याचबरोबर अमृतपाल सिंग महाराष्ट्रात आश्रयाला आल्याची माहिती गुप्तचर यंत्रणांच्या हाती आली आहे. नांदेड शहरात पंजाबमधून येणार्‍यांची संख्या मोठी आहे. यापूर्वी पंजाबमध्ये काही खलिस्तानी अतिरेकी पकडले गेले होते. त्यामुळे अमृतपाल आणि त्याचे समर्थक नांदेडला येऊ शकतात. या पार्श्‍वभूमीवर नांदेड जिल्ह्यात अलर्ट राहीर करण्यात आला आहे. पाकिस्तानमधून सूत्र हलवणार्‍या आणि देशात ड्रग्स सप्लाय करणार्‍या हरिवंदर सिंह रिंदा याची अमृतपालला मदत होत असल्याची माहिती आहे. या माहितीला पुष्टी मिळालेली नाही. मात्र तो पंजाबमधून महाराष्ट्राकडे गेल्याची गुप्तचर यंत्रणांची माहिती आहे. त्यामुळे अमृतपाल सिंग हा वेगळया खलिस्तानची मागणी करण्यासोबतच त्याचे असलेले पाकिस्तानसोबतचे संबंध, मुलींचे अश्‍लील व्हिडिओ बनवून त्यांना करण्यात आलेले ब्लॅकमेल, त्याचे असलेले ड्रग्ज पेडलर्ससोबतचे संबंध यावूरन अमृतपाल सिंग किती देशविघातक कारवाया करत असल्याचे दिसून येत आहे. ड्रग्जच्या माध्यमातून मिळणारा पैसा, आणि त्यातून सुरु असलेले नेटवर्क, सर्व काही कायदा व सुव्यवस्थेला बाधा आणणारे आहे. त्यामुळे अमृतपाल सिंगच्या लवकरात लवकर मुसक्या आवळण्याची गरज आहे. तो हातात आल्यानंतर तो पोलिसांच्या तावडीतून निसटलाच कसा, हा गहन प्रश्‍न आहे. मात्र दहशतवादांचा आश्रय घेणार्‍यांची अखेर कशी होते, याचे इतिहासात अनेक उदाहरणे आहेत. 

COMMENTS