कॅन्सर रुग्णांच्या सेवेसाठी टाटा-एसएमबीटी हॉस्पिटल एकत्र – महसूलमंत्री नामदार बाळासाहेब थोरात

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

कॅन्सर रुग्णांच्या सेवेसाठी टाटा-एसएमबीटी हॉस्पिटल एकत्र – महसूलमंत्री नामदार बाळासाहेब थोरात

नाशिक / संगमनेर  प्रतिनिधी नाशिकच्या एसएमबीटी हॉस्पिटलने मुंबईच्या टाटा मेमोरियल हॉस्पिटलच्या सहाय्याने नाशिक येथील कॅम्पसमध्ये सर्व सुविधायुक्त स

मीच “मुख्यमंत्री” आहे हे एकनाथ शिंदेंनी सिद्ध करावे.
आ.थोरातंकडून बस अपघातातील जखमींना तातडीने मदत
सरकारकडून फक्त घोषणांचा पाऊस प्रत्यक्षात मदत नाही – काँग्रेस नेते आमदार थोरात

नाशिक / संगमनेर  प्रतिनिधी

नाशिकच्या एसएमबीटी हॉस्पिटलने मुंबईच्या टाटा मेमोरियल हॉस्पिटलच्या सहाय्याने नाशिक येथील कॅम्पसमध्ये सर्व सुविधायुक्त स्वतंत्र कॅन्सर सुविधा सुरु केल्याने संपूर्ण महाराष्ट्रातील कॅन्सर रूग्णांना उपचारासाठी मुंबई-पुणे यांसारख्या मोठ्या शहरांत जाण्याची गरज पडणार नाही. त्यांना इथेच अत्यंत माफक दरात उपचार मिळतील असा आशावाद राज्याचे महसूल मंत्री ना. बाळासाहेब थोरात यांनी व्यक्त केला आहे.

धामणगावमधील नंदी हिल्स येथे एसएमबीटी हॉस्पिटलच्या प्रांगणात टाटा मेमोरियल सेंटर, मुंबई यांच्या सहकार्यातून एसएमबीटी कॅन्सर इन्स्टिट्युटचा शुभारंभ झाला. यावेळी टाटा मेमोरियल सेंटरचे संचालक डॉ. राजेंद्र बडवे, उपसंचालक डॉ. पंकज चतुर्वेदी, राज्याचे महसूल मंत्री नामदार बाळासाहेब थोरात, आमदार डॉ. सुधीर तांबे, व्यवस्थापकीय विश्वस्त डॉ. हर्षल तांबे आणि विश्वस्त डॉ. जयश्री थोरात, आदी मान्यवर उपस्थित होते.

गरजू व सामान्यांसाठी स्वस्त व खात्रीशील उपचारांसाठी एसएमबीटी रुग्णालय नामांकित रुग्णालयांपैकी एक आहे. एसएमबीटी रुग्णालयाने उत्तर महाराष्ट्रातील अनेक गरजूंना अत्यंत दर्जेदार वैद्यकीय सेवा पुरवली असून अत्याधुनिक यंत्रणेसह उत्तम आरोग्य सुविधा हे एसएमबीटीचे वैशिष्ट्य राहिले आहे. यामुळे या भागातील नागरिकांना आरोग्य सुविधेकरिता उत्कृष्ट सुविधा या ठिकाणी उपलब्ध झाली आहे.

याप्रसंगी बोलताना टाटा मेमोरियलचे संचालक डॉ. राजेंद्र बडवे म्हणाले की, “एसएमबीटीला माननीय बाळासाहेब थोरात यांच्या मार्गदर्शनाने संलग्न काम करण्याचा मोठा अनुभव आपल्या सोबत असून एसएमबीटी हॉस्पिटल ही टाटा मेमोरियल सेंटरची महाराष्ट्रातील केवळ सर्वांत मोठी शाखाच नाही, तर स्वतः एसएमबीटी कॅन्सर हॉस्पिटल नावारूपाला येईल आम्हाला आशा आहे. एसएमबीटीसोबतचा हा करार दोन अधिक दोन = चार नव्हे, तर दोन अधिक दोन = आठ असा होवो असे आमचे ध्येय आहे. मुंबईतील टाटा कॅन्सर हॉस्पिटलमध्ये देशभरातून रुग्ण मोठ्या संख्येने येतात. त्यामुळे तेथे लांबलचक प्रतीक्षायादी असते व ती सतत वाढत रहाते. संपूर्ण महाराष्ट्रातील कॅन्सर रुग्णांची एसएमबीटी हॉस्पिटलमध्ये देखील सोय उपलब्ध झाली आहे. या हॉस्पिटलचा व आमचा दृष्टीकोन व ध्येय एकच आहे. त्याचा लाभ रुग्णांना निश्चितच होईल.

यावेळी बोलताना महसूल मंत्री नामदार बाळासाहेब थोरात म्हणाले की, कोरोना महामारीने पुरेशा व दर्जेदार आरोग्य सुविधांचे महत्त्व अधोरेखीत केले आहे. फक्त मोठ्या शहरातल्या पंचतारांकित रूग्णालयांमध्येच चांगल्या आरोग्यसुविधा व उपचार मिळतात हा समज खोडून काढत एसएमबीटी रूग्णालय ग्रामीण भागातील गरजू रुग्णांना अत्यंत माफक दरात आरोग्य सेवा पुरवत आहे. कोरोना महामारीच्या इथल्या डॉक्टर, नर्स आणि त्यांच्या सहका-यांनी अत्यंत सेवाभावी वृत्तीने केलेले काम उल्लेखनीय आहे. बदलत्या काळासोबत कॅन्सर रूग्णांची वाढती संख्या पाहता एसएमबीटीने देशातील अग्रगण्य टाटा मेमोरियल इन्स्टिट्यूटच्या सहकार्याने स्वतंत्र कॅन्सर सेवा सुरु केल्याने संपूर्ण महाराष्ट्रातील कॅन्सर रूग्णांना आता उपचारासाठी मुंबई पुण्यासारख्या महानगरात जाण्याची गरज राहिली नसून त्यांना इथेच दर्जेदार सुविधा मिळणार आहेत. त्यामुळे त्यामुळे त्यांचा त्रास आणि खर्च कमी होणार आहे.

ना. थोरात म्हणाले, मानवसेवेच्या हेतूने टाटा मेमोरियल हॉस्पिटल आणि एसएमबीटी हॉस्पिटल एकत्र काम करणार आहेत. टाटा आणि एसएमबीटी गरजू रुग्णांची सेवा या एकाच उद्देशाने काम करत आहोत, त्यामुळे हा प्रवास उत्तम होईल याची मला खात्री आहे. एसएमबीटी हॉस्पिटलच्या डीन डॉ. मीनल मोहगांवकर यांनी या कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले, आणि डेप्युटी मेडीकल सुप्रिटेंडन्ट डॉ. संतोष पवार यांनी आभार मानले. या प्रसंगी एसएमबीटी हॉस्पिटल, वैद्यकीय महाविद्यालयाचे प्राचार्य, विभाग प्रमुख डॉक्टर्स व कर्मचारी उपस्थित होते.

COMMENTS