कोपरगाव : कोपरगाव-शिर्डी मार्गाच्या दुरुस्तीचे काम गेल्या दोन ते तीन वर्षांपासून संथ गतीने सुरू असून, कामातील दिरंगाई व सुरक्षाविषयक उपाययोजनांचा
कोपरगाव : कोपरगाव-शिर्डी मार्गाच्या दुरुस्तीचे काम गेल्या दोन ते तीन वर्षांपासून संथ गतीने सुरू असून, कामातील दिरंगाई व सुरक्षाविषयक उपाययोजनांचा अभाव यामुळे या मार्गावर अपघातांची मालिका सुरूच आहे. या अपघातांमध्ये अनेकांना जीव गमवावा लागला असून काही जण कायमस्वरूपी अपंग झाले आहेत. त्यामुळे संबंधित ठेकेदारावर कठोर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते व नागरिकांकडून होत आहे.
कोपरगाव ते अहिल्यानगर मार्गाची अनेक वर्षांपासून दुरवस्था झाली होती. या मार्गाच्या दुरुस्तीसाठी सातत्याने मागणी होत होती. त्यानंतर या मार्गाचा राष्ट्रीय महामार्गात समावेश करून काँक्रीटीकरणाच्या कामास मंजुरी देण्यात आली. मात्र काम सुरू झाल्यानंतरही अपेक्षित वेगाने प्रगती झालेली नाही.
माहिती अधिकारातून प्राप्त माहितीनुसार, १ जानेवारी २०२० ते १ जून २०२५ या कालावधीत कोपरगाव शहर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील येवला नाका ते आत्मामालिक रुग्णालय या सुमारे तीन ते चार किलोमीटरच्या पट्ट्यात ५३ अपघातांची नोंद झाली आहे. या अपघातांमध्ये अनेकांचा मृत्यू झाला असून अनेक जण गंभीर जखमी झाले आहेत. किरकोळ अपघातांपैकी अनेक घटनांची पोलीस ठाण्यात नोंद झालेली नसल्याचेही सांगितले जात आहे.
अपघातांमुळे अनेक कुटुंबांवर संकट कोसळले असून काहींनी कुटुंबातील कर्ती व्यक्ती गमावली आहे. तसेच अनेक वाहनांचे मोठे नुकसान झाले आहे. वारंवार होणाऱ्या वाहतूक कोंडीमुळे नागरिकांनाही त्रास सहन करावा लागत आहे.
या पार्श्वभूमीवर महामार्गाच्या कामातील विलंब आणि सुरक्षेच्या उपाययोजनांबाबत शासनाने गांभीर्याने दखल घेऊन संबंधितांवर जबाबदारी निश्चित करावी, अशी मागणी नागरिकांकडून केली जात आहे.”एकीकडे विकासाच्या घोषणा केल्या जात असताना रस्ते, पाणी, वीज आणि शिक्षण यांसारख्या मूलभूत प्रश्नांकडे दुर्लक्ष होत असल्याचे दिसते. अनेक वर्षांपासून अपूर्ण असलेला नगर-मनमाड मार्ग हे त्याचे ज्वलंत उदाहरण आहे. हा मार्ग आता अपघातांचा सापळा ठरत असतानाही अपेक्षित गांभीर्य दिसून येत नाही.”
— ऍड. नितीन पोळ, सामाजिक कार्यकर्ते.

COMMENTS