अरे बापरे…जिल्ह्यात एकाच दिवसात 224 मृत्यू  ;मृत्यू तांडवाने नगर जिल्ह्यात खळबळ, आकडे चुकल्याचा संशय

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

अरे बापरे…जिल्ह्यात एकाच दिवसात 224 मृत्यू ;मृत्यू तांडवाने नगर जिल्ह्यात खळबळ, आकडे चुकल्याचा संशय

कोरोनाची दुसरी लाट ओसरत असताना व लॉकडाऊन उठल्याने सर्व दैनंदिन व्यवहार सुरळीत होत असताना दुसरीकडे मृत्यूचे तांडव कमी होताना दिसत नाही.

संगणक शिक्षण ही काळाची गरज ः संजय जोशी
श्री क्षेत्र महेश्‍वर व अमृतेश्‍वर देवस्थानास ‘क’ वर्ग दर्जा मंजूर
सहाय्यक फौजदाराची झुंज अपयशी ;सेवानिवृत्तीसाठी अवघे काही दिवस शिल्लक असताना निधन

अहमदनगर/प्रतिनिधी-कोरोनाची दुसरी लाट ओसरत असताना व लॉकडाऊन उठल्याने सर्व दैनंदिन व्यवहार सुरळीत होत असताना दुसरीकडे मृत्यूचे तांडव कमी होताना दिसत नाही. बुधवार (9जून) सायंकाळ ते गुरुवार (10 जून) सायंकाळ या 24 तासात जिल्ह्यात तब्बल 224जणांचे मृत्यू झाले आहेत. 

    जिल्हा माहिती अधिकारी कार्यालयाद्वारे रोज दिल्या जात असलेल्या कोरोनासंदर्भातील दैनंदिन आकडेवारीतून ही बाब स्पष्ट झाली आहे. यात, बुधवारी सायंकाळी आतापर्यंतच्या मृत्यूंचा आकडा 3571 होता व तो गुरुवारी सायंकाळी 3795 दाखवला गेल्याने मृत्यूच्या या तांडवाने जिल्ह्यात खळबळ उडाली आहे. दरम्यान, या आकड्यांच्या नोंदणीत चूक झाल्याचा संशय आहे. पण याबाबत प्रशासनाकडून काहीही खुलासा झालेला नाही. मागील एप्रिल व मे महिन्यात कोरोनाची दुसरी लाट भयानक स्थितीत असताना या दोन्ही महिन्यात रोज किमान 35 ते 40जणांचे मृत्यू होत होते. या दोन्ही महिन्यांतून मिळून सुमारे दोन हजारावर मृत्यू झाल्याचे सांगितले गेले. या पार्श्‍वभूमीवर आता कोरोनाची दुसरी लाट ओसरत असल्याने सगळीकडचे लॉकडाऊन उठवण्यात आले आहे व दैनंदिन व्यवहारही सुरू झाले आहेत. अशा स्थितीत मागील दोन-तीन दिवसांपासून रुग्ण संख्या व मृत्यूसंख्याही फारशी वाढलेली नव्हती. 6 जूनला 40 (5 जूनची एकूण मृत्यूसंख्या 3443 व 6 जूनची 3483), 7 जूनला 30 (एकूण मृत्यूसंख्या 3513), 8 जूनला 18 (एकूण मृत्यूसंख्या 3531), 9 जूनला 40 (एकूण मृत्यूसंख्या 3571) व 10 जूनला 224 (एकूण मृत्यूसंख्या 3795) अशी दाखवली गेल्याने बुधवारी व गुरुवारी मिळून या एकाच दिवसात तब्बल 224जणांचे मृत्यू झाल्याचे या आकडेवारीतून दिसत आहे. जिल्हा माहिती अधिकारी कार्यालयालाही या आकडेवारीबाबत संशय आल्याने त्यांनी ती तपासून घेतली. पण जिल्हा शासकीय रुग्णालयातून अशी आकडेवारी अधिकृतपणे दिल्याचे स्पष्ट झाल्याचे सांगितले जाते. पण ही आकडेवारी जर खरी असेल तर एकाच दिवसातील 224 मृत्यूची घटना जिल्ह्यातच नव्हे तर राज्यात व देशात खळबळ उडवणारी ठरणार आहे.

 बाधितही वाढले

जिल्ह्यात बुधवारी असलेली नव्या कोरोनाबाधितांची संख्या व गुरुवारी असलेली नव्या बाधितांची संख्याही सुमारे 400ने वाढली आहे. बुधवारी नव्या बाधितांची संख्या 499 होती व गुरुवारी ही संख्या 868 झाली आहे. अर्थात या दोन दिवसात कोरोनातून बरे होऊन डिस्चार्ज मिळालेल्यांची संख्याही सुमारे साडेतीनशेने वाढली आहे. बुधवारी 818जणांना डिस्चार्ज मिळाला होता तर गुरुवारी 1171 जणांना बरे झाल्याने घरी सोडले गेले आहे. या पार्श्‍वभूमीवर एका दिवसातील 224 मृत्यूचा आकडा मात्र खळबळ उडवणारा ठरला आहे. मागच्या महिन्यात येथील अमरधामध्ये एकाच दिवसात 59जणांवर अंत्यसंस्कार झाल्याची घटना देशात खळबळ उडवून गेली होती. त्यानंतर जिल्ह्यात रोज सुमारे 35 ते 40 मृत्यू होत असल्याचे प्रशासनाद्वारेच अधिकृतपणे स्पष्ट केले गेले होते. या पार्श्‍वभूमीवर एकाच दिवसातील सुमारे सव्वादोनशे मृत्यूंवर प्रशासन काय भूमिका मांडते, याची प्रतीक्षा आहे.

चौकट

मागील दोन दिवसांचे आकडे

9 जून 2021

-बरे झालेली रुग्ण संख्या:2,60,910

-उपचार सुरू असलेले रूग्ण:5081

-मृत्यू:3571

-एकूण रूग्ण संख्या:2,69,562

10 जून 2021

-बरे झालेली रुग्ण संख्या:2,62,081

-उपचार सुरू असलेले रूग्ण:4554

-मृत्यू:3795

-एकूण रूग्ण संख्या:2,70,430

COMMENTS