अन् बाळासाहेबही हसले!

Homeसंपादकीयअग्रलेख

अन् बाळासाहेबही हसले!

महाराष्ट्राच्या विधीमंडळाचे दोन दिवसांचे पावसाळी अधिवेशनाचे कामकाज पाहून शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा पुण्यात्मा नक्कीच हसला असेल.हा आमचा दावा

न्यायपालिका – सरकार संघर्ष वाढणार
भारत ‘भूक’बळी
मेंदूचे पुनर्भरण व्हावे !

महाराष्ट्राच्या विधीमंडळाचे दोन दिवसांचे पावसाळी अधिवेशनाचे कामकाज पाहून शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा पुण्यात्मा नक्कीच हसला असेल.हा आमचा दावाच नाही तर खात्री आहे.मराठी मुलखात शिवसेनेच्या भगव्या नेतृत्वाखाली सरकार स्थापन व्हावे आणि या सरकारचे नेतृत्व उध्दव ठाकरे यांनी करावे ही बाळासाहेबांची एकमेव आणि अंतिम राजकीय इच्छा होती,असे सांगीतले जाते,हयातीत राजकारण आणि समाजकारण करतांना शिवसेनाप्रमुख म्हणून बाळासाहेब ठाकरे यांनी शिवसैनिकांना ऐंशी टक्के समाजकारण आणि वीस टक्के राजकारण हा मंत्र दिला.या मंत्रावर परिश्रम घेत सेनापतीच्या आदेशाला शिरसावंद्य मानीत शिवसैनिकांनी ऐंशी टक्के समाजकारण करीत वीस टक्के राजकारणाच्या भरोशावर शिवसेनेच्या पायाशी सत्तेला शरण आणले.बाळासाहेबांनी शिवसैनिक घडवला,नेता घडवला,मंत्री मुख्यमंत्री घडवले,पण सत्तेची ही अवदसा मातोश्रीचा उंबरा ओलांडणार नाही,याची पुरेपूर खबरदारी घेतली.हयात असे पर्यंत  ठाकरे परिवार कुठल्याही सत्तेत सहभागी होणार नाही असा प्रण त्यांनी खरा करून दाखविला.तथापी आयुष्याची संध्याकाळ होत असतांना महाराष्ट्राच्या सत्तेचा वारसा पुत्राने चालवावा अशी मनात असलेली इच्छा त्यांचे बंधुतुल्य मित्र शरद बाबूंनी पुर्णत्वास नेली.सर्वाधिक संख्याबळ असतानाही सत्तेच्या बाहूल्याने खो दिल्याचा गहिवर भाजपाला आजही पावलापावलावर सतावतो आहे,त्याचा वचपा काढण्यासाठी भारतीय जनता पक्षाचे चाणक्य  क्षणाक्षणाला  कुभांड कांड करीत आहेत.सुशांत,कंगणा,अर्णब,वाझे,परमवीर सिंग,अनिल परब,प्रताप सरनाईक,अनिल देशमुख,राहीले साहीले अजित पवार सारी अस्रे वापरून झाले.इडीची बीडीही शिलगेना,सीबीआयची मात्राही चालेना.सरकार दिवसेंदिवस आपली मुळे घट्ट करू पहातेय.अशा सरकारचे नेतृत्व आपला वारसदार करतो आहे हे पाहून कुठला पिता हर्षोल्हासीत होणार नाही? हे सारे पाहून बाळासाहेबांसारखे हृदयशील मनही हराखून हसले नसेल तरच नवल!पावासाळी अधिवेशनात याच उध्दव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली महाविकास आघाडी सरकारने दाखवलेली एकजूट,प्रगल्भता आणि चितपट रणनिती बाळासाहेबांनी पाहील्यानंतर कोण आनंद झाला असेल..उर आनंदाने किती उचंबळून इला असेल!बाळासाहेब हजर जबाबी,स्पष्टवक्ते आणि मिश्कील राजकारणी होते.मागे फिरणे हा त्यांचा पिंड नव्हता.तथापी अत्यंत आणिबाणीच्या काळात कणा ताठ ठेवून सत्तापदावर असतांना अंगावर येणारी अस्रे परतावून लावण्याची वेळ बाळासाहेबांवर प्रत्यक्षात कधी आली नव्हती.कारण सत्तेत थेट सहभाग नसल्यामुळे कितीही बाका प्रसंग उभा राहिला तरी होणारे परिणाम थेटपणे बाळासाहेबांवर आदळत नव्हते.उध्दव ठाकरे यांच्याबाबतीत परिस्थिती नेमकी उलट आहे,सत्तेत थेट सहभागीच नव्हे,तर सत्तेचे नेतृत्वच त्यांच्याकडे असल्याने श्रेय अपश्रेयाचे मानकरी होण्याचे दायीत्व मातोश्रीच्या पदरात येऊन पडते.म्हणूनच उध्दव ठाकरे यांच्यावर असलेली जबाबदारी अधिक वाढली आहे.या जबाबदारीला तितक्याच नेटाने तोंड देऊन यशस्वी होत असल्याने बाळासाहेब मनोमन खुश असणार यात शंका नाही.एका बाजूला मातोश्रीचे संस्कार एकामागून एक षटकार ठोकीत असतांना विद्वत्तेचे ठेकेदार म्हणविणाऱ्या षडयंत्री विश्वासघातकी भाजपाच्या चाणक्यांना मिळत असलेली चपराक पाहूनही बाळासाहेब आनंदाश्रू ढाळत असतील.भाजपेयींचा सुरू असलेला जळफळाट पाहून बाळासाहेबांच्या आनंदाश्रूंचा ओलावा महाराष्ट्रालाही सुखाहून गेला नाही तरच नवल!

COMMENTS