नांदेड : नांदेड रेल्वे स्थानकावर उभ्या असलेल्या मराठवाडा एक्सप्रेसच्या सर्वसाधारण डब्यात आग लावण्याच्या घटनेचा रेल्वे सुरक्षा बलाने (आरपीएफ) अवघ्
नांदेड : नांदेड रेल्वे स्थानकावर उभ्या असलेल्या मराठवाडा एक्सप्रेसच्या सर्वसाधारण डब्यात आग लावण्याच्या घटनेचा रेल्वे सुरक्षा बलाने (आरपीएफ) अवघ्या २४ तासांत उलगडा केला आहे. याप्रकरणी एका संशयित महिलेला अटक करण्यात आरपीएफला यश आले आहे.
१६ जून २०२६ रोजी गाडी क्रमांक १७६८८ (मराठवाडा एक्सप्रेस) नांदेड रेल्वे स्थानकावर उभी असताना, तिच्या जनरल डब्यातील शौचालयात ठेवलेल्या कापडाच्या तुकड्याला आग लावण्यात आली होती. मात्र, सतर्क प्रवासी, सी अँड डब्ल्यू (C&W) विभागाचे कर्मचारी तसेच आरपीएफ जवानांनी तत्परता दाखवत ही आग त्वरित विझवली आणि परिस्थिती नियंत्रणात आणली. त्यामुळे कोणतीही जीवितहानी किंवा रेल्वे मालमत्तेचे मोठे नुकसान झाले नाही.
या गंभीर प्रकरणाची दखल घेत आरपीएफ नांदेडने रेल्वे अधिनियम १९८९ च्या कलम १५३ अंतर्गत गुन्हा क्रमांक २६२/२०२६ नोंदवून तपास सुरू केला होता. वरिष्ठ विभागीय सुरक्षा आयुक्त दीपचंद्र आर्य यांच्या मार्गदर्शनाखाली सीसीटीव्ही फुटेजचे विश्लेषण, तांत्रिक पडताळणी, गुप्त माहिती आणि व्यापक चौकशी करण्यात आली.
तपासादरम्यान परभणी जिल्ह्यातील रहिवासी असलेली सीमा (वय २७) हिची मुख्य आरोपी म्हणून ओळख पटली. १७ जून रोजी आरपीएफ नांदेड आणि सीआयबी नांदेडच्या संयुक्त पथकाने सापळा रचून तिला ताब्यात घेतले. चौकशीदरम्यान तिने आपला गुन्हा कबूल केला असल्याची माहिती आरपीएफ सूत्रांनी दिली.
आरोपी महिलेला न्यायिक दंडाधिकारी प्रथम वर्ग (JMFC) न्यायालयात हजर करण्यात आले असता, न्यायालयाने तिची १५ हजार रुपयांच्या वैयक्तिक जामिनावर मुक्तता केली. रेल्वे अधिनियमाच्या कलम १५३ नुसार, रेल्वे प्रवाशांच्या सुरक्षिततेला धोका निर्माण करणाऱ्या किंवा तसा प्रयत्न करणाऱ्या व्यक्तीला ५ वर्षांपर्यंतच्या कारावासाची शिक्षा होऊ शकते. आरपीएफच्या या तत्पर कामगिरीमुळे प्रवाशांमधून समाधान व्यक्त होत आहे.

COMMENTS