Homeताज्या बातम्या

भगवान शंकरांची उपासना जीवनात वैभव आणते; निंदा आणि अहंकार विनाशाला कारणीभूत – कथाकार शिवम शुक्ल

नांदेड : भगवान शंकरांची भक्तिभावाने उपासना करणार्‍यांच्या जीवनात सुख, शांती, धनधान्य, संपत्ती आणि वैभव प्राप्त होते. मात्र दुसर्‍यांची निंदा, द्व

तपोवन व मराठवाडा एक्सप्रेसला कायमस्वरूपी अतिरिक्त डबे
अंनिसच्या अहिल्यानगर जिल्हाध्यक्षपदी बाबासाहेब बुधवंत  यांची निवड
‘ऑपरेशन क्रॅक डाऊन’चा दणका : नांदेड ग्रामीण पोलिसांचा जुगार अड्ड्यावर छापा; पाच जण रंगेहात ताब्यात
श्री काळेश्वर सत्संग सभागृह, विष्णुपुरी, नांदेड येथे आयोजित श्री  शिवमहापुराण कथा सोहळ्यात सहभागी होऊन आज कथेचे श्रवण केले.

नांदेड : भगवान शंकरांची भक्तिभावाने उपासना करणार्‍यांच्या जीवनात सुख, शांती, धनधान्य, संपत्ती आणि वैभव प्राप्त होते. मात्र दुसर्‍यांची निंदा, द्वेष आणि अहंकार यामुळे प्राप्त झालेले वैभवही नष्ट होऊ शकते. निंदा आणि अधर्माच्या मार्गावर चालणार्‍यांचा विनाश अटळ असतो, असे प्रतिपादन प्रसिद्ध कथाकार शिवम शुक्ल यांनी केले.

विष्णुपुरी येथील श्री सत्संग सेवा समिती काळेश्वर यांच्या वतीने आयोजित शिवपुराण कथा महोत्सवाच्या पाचव्या दिवशी त्यांनी शिवपुराणातील विविध प्रसंगांचे रसाळ निरूपण करताना भगवान शंकर आणि माता पार्वती यांच्या दिव्य विवाह सोहळ्याचे वर्णन केले. त्यांच्या प्रभावी आणि ओघवत्या वाणीतून साकारलेल्या या प्रसंगाने उपस्थित भाविक मंत्रमुग्ध झाले.

यावेळी शिवम शुक्ल म्हणाले की, भगवान शंकर आणि माता पार्वती यांचा विवाह हा केवळ धार्मिक प्रसंग नसून तो संपूर्ण सृष्टीसाठी मंगलमय उत्सव आहे. हा महादेवांचा महाउत्सव असून देवतांचाही उत्सव मानला जातो. शिव-पार्वती विवाहातून श्रद्धा, समर्पण, त्याग आणि कुटुंबव्यवस्थेचे महत्त्व अधोरेखित होते. हा विवाह जीवनातील आध्यात्मिक आणि सामाजिक मूल्यांचे प्रतीक आहे.

शिवबारातीचे वर्णन करताना त्यांनी सांगितले की, भगवान शंकर हे वैराग्याचे प्रतीक आहेत. भस्म धारण करून, साधेपणाने आणि अलौकिक स्वरूपात ते विवाहासाठी निघाले. त्यांच्या अंगावर लावलेले भस्म हे जीवनाच्या क्षणभंगुरतेचे प्रतीक आहे. मनुष्याने अहंकार, लोभ आणि मोह यांचा त्याग करून शिवतत्त्व आत्मसात केले पाहिजे, असा संदेश या प्रसंगातून मिळतो. शिवपुराणातील विविध कथांद्वारे त्यांनी भक्ती, सदाचार, संयम आणि धर्माचरणाचे महत्त्व स्पष्ट केले. भगवान शंकरांच्या कृपेने जीवनातील संकटे दूर होतात आणि भक्ताला आध्यात्मिक उन्नतीचा मार्ग सापडतो, असेही त्यांनी सांगितले.

कथेदरम्यान उपस्थित भाविकांनी हर हर महादेवच्या जयघोषात सहभाग घेतला. शिव-पार्वती विवाहाचे वर्णन ऐकताना भाविकांमध्ये भक्तिभाव आणि उत्साहाचे वातावरण निर्माण झाले होते. संपूर्ण परिसर शिवमय झाल्याचे चित्र पाहायला मिळाले. शिवपुराण कथा महोत्सव २० जूनपर्यंत चालणार असून दररोज दुपारी ३ ते सायंकाळी ६ या वेळेत कथांचे आयोजन करण्यात आले आहे. महोत्सवाला परिसरातील तसेच जिल्ह्यातील भाविक मोठ्या संख्येने उपस्थित राहत असून शिवकथेचा लाभ घेत आहेत.

COMMENTS