Homeताज्या बातम्यासंपादकीय

पवारांचे तळ्यात – मळ्यात का ?

आभाळच फाटले तर ठिगळ कसं लावायचं, हा यक्ष प्रश्न आता भारतीय जनता पक्ष समोर उभा राहिला असला तरी, सध्या मनाची घालमेल आणि व्यवहाराची धरसोड होत आहे, &

अर्थसंकल्पापूर्वीच घोषणांतून लोकप्रियतेवर भर ! 
नेते तीन; संदेश एक !
शब्द बंदी तरीही खडाजंगी !

आभाळच फाटले तर ठिगळ कसं लावायचं, हा यक्ष प्रश्न आता भारतीय जनता पक्ष समोर उभा राहिला असला तरी, सध्या मनाची घालमेल आणि व्यवहाराची धरसोड होत आहे,  ती, खरे म्हणजे शरद पवार यांची आणि राष्ट्रवादीची. तसं शरद पवार यांचं राजकीय नेतृत्व हे महाराष्ट्रात मुसद्दी म्हणून चर्चिले जात असले तरी, ते विश्वासार्ह आहे, असं मात्र कोणीही म्हणू शकत नाही. तरीही, शरद पवार हे आतापर्यंत भारतीय जनता पक्षाच्या सोबत गेले नाही, असं जर कोणी म्हणत असेल तर ते देखील निस्सीम चूक आहे. कारण, २०१४ च्या विधानसभा निवडणुकीत शिवसेना आणि भाजप यांनी स्वतंत्र निवडणुका लढविल्यानंतर या दोन्ही पक्षांचे मिळून बहुमत होणार असताना, शरद पवार यांनी विनाशशर्त भारतीय जनता पक्षाला बाहेरून पाठिंबा देण्याची घोषणा केली होती. त्यातूनच भारतीय जनता पक्षाचे किमान दोन महिन्याचे सरकार महाराष्ट्रात अस्तित्वात आले होते. त्यावेळी बहुमताचा निर्णय देखील केवळ आवाजी मतदानाने घेण्यात आला होता. यामध्ये गोंधळही झाला होता. याचा दुसरा अर्थ असा की, आज जे छाती ठोकून सांगत आहे की, शरद पवार हे भाजपासोबत जाणार नाहीत, आपल्या आयुष्याच्या वर्तमान टप्प्यात ते  भाजपा या पक्षाच्या जातीवादी समीकरणांसोबत आपल्याला जोडून घेणार नाहीत, यात जराही तथ्य नाही! राजकारण हे अनिश्चिततेचे असले तरीही, मतदार म्हणून समाज घटकाला ते विश्वासहार्ह वाटलं पाहिजे, ही जबाबदारी राजकीय नेत्यांची असते. परंतु, सध्या भारतीय राजकारण ज्या परिस्थितीतून जात आहे, यावरून भारतीय मतदाराला राजकारणाविषयीची एक विश्वासार्हता राहिलेली दिसत नाही. याचा अविभाज्य परिणाम हा आगामी निवडणुकांमध्ये मतदानाच्या टक्केवारीवर होऊ शकतो. वर्तमान काळात राजकीय पक्षांची जी तोडमोड चालली आहे, त्यातून मतदारांच्या विश्वासाला धक्का पोहोचवणे, हेच तंत्र वापरले जात असल्याचे दिसून येत आहे. याचाच अर्थ संसदीय लोकशाहीतील निवडणुकीच्या राजकारणाला कसे बाद करता येईल याचे डावपेच सर्वपक्षीय मिळून आखत आहेत की काय? अशी शंका मनाला चाटून गेल्याशिवाय राहत नाही. अजित पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये बंडखोरी केल्यानंतर त्यांच्या विरोधात कोणतीही कृती शरद पवार करू शकलेले नाहीत. याउलट त्यांच्या चोरून – चोरून गाठीभेटी होत असताना महाराष्ट्रात संशयाचे वातावरण निर्माण होत आहे. त्यांनी आपल्या वतीने एक स्पष्ट भूमिका घेऊन, यासंदर्भात कुठून निघालेल्यांना एक तर खडसावले पाहिजे किंवा पक्षात परत तरी बोलावले पाहिजे. दुसऱ्या बाजूला महाराष्ट्रात महाविकास आघाडी तयार झाल्यानंतर भाजपला एक अस्वस्थता आली होती. कारण, महाविकास आघाडीच्या माध्यमातून भाजपाचा पराभव हा महाराष्ट्रात स्पष्टपणे दिसत होता. त्यामुळे पक्ष तोडफोडीचे राजकारण झाले आणि असा विश्वास निर्माण करण्याचा प्रयत्न झाला की, आता महाविकास आघाडी ही जिंकू शकत नाही किंवा पराभवाला सामोरे जाईल! परंतु, वस्तुस्थिती अशी नाही.  वस्तुस्थिती आता पक्षांची आघाडी किंवा पक्षांकडे बघून नव्हे, तर, एकूणच राजकीय सत्तेच्या कामकाजावर मतदारांचे आकलन मोठे झाले आहे. त्यांच्या आकलनासाठी मतदार जे घटक वापरतो आहे, त्यामध्ये महागाई, बेरोजगारी आणि कायदा सुव्यवस्था या तीन घटकांचा तो प्रामुख्याने निकष लावतो आहे. त्यामुळे महाविकास आघाडी बनली नाही तरी, आणि बनली तरी,  मतदार त्या दिशेनेच अधिकपणे जाणार आहे, हे आता पुन्हा नव्याने केलेल्या सर्व्हे मधून स्पष्ट होत आहे. याचाच अर्थ भाजपच्या दृष्टीने आभाळ फाटले आहे त्याला आता ठिगळे कुठे लावणार असा यक्ष प्रश्न निर्माण झाला आहे. पण, त्याहीपेक्षा शरद पवार यांना जनकौलाचा अंदाजच बांधता येत नसल्याने त्यांचे तळ्यात – मळ्यात सुरू आहे!

राजकारणात सध्या होणारी स्थित्यंतरे ही सामान्य लोकांच्या दृष्टीने अनाकलनीय होत असल्याचा फाजिल आत्मविश्वास राजकीय नेत्यांना वाटत असला तरी लोक किंवा जनता आपली भूमिका आगामी निवडणुकांच्या मतपेटीतून व्यक्त करणारच आहे. राजकीय स्थित्यंतरे कशी घडतील आणि जनता आपली भूमिका कशी वठवेल, याचा वेध घेणारी मालिका लवकरच लोकमंथन च्या ‘दखल’ या सदरातून वाचकांसाठी….

COMMENTS