Homeताज्या बातम्यासंपादकीय

विकासाचे राजकारण…

भारतासारख्या विशाल देशात विविध जाती-धर्मांचे लोक गुण्या-गोविदांने नांदतात. भारतासोबतच अस्तित्वात आलेल्या पाकिस्तानची शकले उडाली आहेत, तो देश विका

आश्‍वासनांची खैरात
मानवाच्या हातासमोर तंत्रज्ञान फिके
एसटी संपाचा बागुलबुवा

भारतासारख्या विशाल देशात विविध जाती-धर्मांचे लोक गुण्या-गोविदांने नांदतात. भारतासोबतच अस्तित्वात आलेल्या पाकिस्तानची शकले उडाली आहेत, तो देश विकासापासून कोसो दूर असतांना, भारत देशाने केवळ 75 वर्षांमध्ये विकासाचा मोठा टप्पा गाठला आहे. अर्थव्यवस्थेमध्ये मोठी झेप घेतली आहे. याचे प्रमुख कारण म्हणजे, भारत स्वातंत्र्य झाल्यानंतर देशाला स्थिर सरकार आणि योग्य असे संविधान देवू शकल्यामुळेच आपण आजचा दिवस बघू शकतोय. अन्यथा पाकिस्तानसारखे आपले शकले उडाली असती. असले असले तरी, भारतामध्ये जातीय, धार्मिक राजकारणाचा मोठा शाप आहे. जातीय, धार्मिक तेढ निर्माण करून आपली राजकीय पोळी भाजून घेण्यात राजकीय पक्ष अग्रेसर असल्याचे दिसून येत आहे. भारतामध्ये विकासाच्या राजकारणाला प्रथम प्राधान्य दिले जात नाही, हो आजच्या राजकारणाची शोकांतिकाच म्हणावे लागेल. राजकारण फक्त निवडणुकीपुरते किंवा लढायांपुरते मर्यादित नाही. राजकारणाला विचार असणे व त्या विचारांना मूल्यांचा आधार असणे व हेतू असणे आवश्यक आहे. राजकारणाला काही श्रद्धा व हेतू असणे आवश्यक आहे. असा विचार प्रत्येक नागरिकाने व राजकारण्यांनी ठेवणे गरजेचे आहे. आपल्याला काय करायचंय हे आधी निश्‍चित करायला हवे, आपली दिशा पक्की असायला हवी.आपण सर्व नागरिकांनी सर्वांनी मिळून एक मोठ्या माणुसकीचे व जगात शांतता नांदेल,प्रत्येक हाताला काम मिळेल, शेतकरी सधन होईल असे काम करणे व ती व्यवस्था निर्माण करणे अत्यंत आवश्यक आहे तेव्हाच अखंड राष्ट्र सुखी झाले असे म्हणता येईल. सर्वच पक्षांचा राजकीय अजेंडा हा विकासाचा नसतो. त्यामुळे खरंतर राजकीय पक्षांनी देशहिताला सर्वोच्च प्राधान्य देण्याची गरज आहे. हिंदू-मुस्लिम, शीख, ख्रिश्‍चन, बौद्ध, जैन असो की तो कोणत्याही जाती धर्माचा असो, त्यांना गोंजारण्यापेक्षा, त्यांचे लांगुलचांगुल करण्यापेक्षा देशहिताला प्राधान्य देण्याची गरज आहे. मात्र राजकीय पक्ष आपली व्होट बँक शाबूत राहण्यासाठी स्वतंत्र आणि वेग-वेगळे गट निर्माण करण्यात यशस्वी होतात, आणि याच गटाच्या बळावर आपले राजकारण करतांना दिसून येतात. वास्तविक पाहता, जाती-धर्मांचे राजकारण जेव्हा भारतातुन संपुष्टात येईल, तेव्हा भारताची प्रगती कोणताही देश रोखू शकणार नाही. त्यामुळे जाती-धर्माच्या तिढ्यातून आपल्याला बाहेर येण्याची गरज आहे. आज आपण अमेरिका, जपान, चीन, रशिया या देशाची प्रगती बघतो, मात्र तिथेच एकच धर्म बहुसंख्या लोकांचा असल्यामुळे तिथे कायदे आणि नियमांची अंमलबजावणी करणे सहज शक्य होते. आपल्याकडे मात्र विविध धर्मांमध्ये हजारो जाती, आणि विविधता असल्यमुळे त्यांना एका धाग्यात गुंफणे अशक्य होते. मात्र भारतीय संविधानाच्या माध्यमातून आपण ते सहज शक्य करू शकलो आहे. आज भारताची अर्थव्यवस्थेचा जगातील प्रमुख पाच देशांमध्ये समावेश होतो. तसेच या देशामध्ये बहुसंख्य मध्यमवर्गीय लोकसंख्या असल्यामुळे या देशांकडे इतर देशाच्या नजरा आहेत. कारण भारत देश एक प्रमुख बाजारपेठ आहे. तसेच अनेक उद्योगधंदे या देशात सुरू करण्यासाठी अनुकूल परिस्थिती असल्यामुळे परदेशी गुंतवणूक सहजतेने भारताकडे येत आहे. त्यामुळे आगामी काही दशकांमध्ये भारत मोठी झेप घेवू शकतो. भारताने परिस्थितीनुसार आपल्या धोरणांमध्ये सातत्याने बदल केला आहे. कोणत्याही देशाला जेव्हा विकासाचा महत्वाचा टप्पा पार करायचा असतो, तेव्हा त्या देशामध्ये स्थिर सरकार असणे आवश्यक असते. आणि 90 च्या दशकातील काही अपवाद वगळता सातत्याने स्थिर सरकार असल्यामुळे देश विकासामध्ये मोठी झेप घेतांना दिसून येत आहे. कोरोनाच्या संकटानंतर जर्मनी, ब्राझील, ब्रिटन, श्रीलंका, पाकिस्तान, यासारख्या देशांच्या अर्थव्यवस्था कोसळत असतांना, आपण मात्र आत्मनिर्भरतेकडे वाटचाल करत होतो. त्यामुळे एकीकडे आपण विकासाचा वेग मोठ्या कष्टाने उंचावत आहोत. मात्र भारतासारख्या देशासमोर अनेक आव्हाने आहेत, त्याकडे दुर्लक्ष करून चालणार नाही. लोकसंख्यावाढ, बेरोजगारी, शाश्‍वत विकास, तापमानवाढ यासारख्या अनेक समस्या उभ्या आहेत. भविष्यात या समस्या आणखी तीव्र होण्याची शक्यता नाकारता येत नाही. 

COMMENTS