नांदेड : श्री गुरु गोबिंद सिंघ जी विमानतळ, नांदेड येथे आंतरराष्ट्रीय दर्जाचे टर्मिनल उभारण्याच्या निर्णयाचे तख्त सचखंड श्री हजूर अबिचल नगर साहिबच

नांदेड : श्री गुरु गोबिंद सिंघ जी विमानतळ, नांदेड येथे आंतरराष्ट्रीय दर्जाचे टर्मिनल उभारण्याच्या निर्णयाचे तख्त सचखंड श्री हजूर अबिचल नगर साहिबचे प्रशासक डॉ. विजय सतबीरसिंघ (ख-ड, निवृत्त) यांनी स्वागत करत हा निर्णय नांदेडसह संपूर्ण मराठवाड्याच्या विकासासाठी मैलाचा दगड ठरेल, असा विश्वास व्यक्त केला आहे.
विमानतळाच्या विकास आराखड्याचा आढावा घेतल्यानंतर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी संबंधित विभागांना आंतरराष्ट्रीय टर्मिनल उभारणीची प्रक्रिया जलदगतीने पूर्ण करण्याचे निर्देश दिले आहेत. या पार्श्वभूमीवर डॉ. विजय सतबीरसिंघ यांनी हा निर्णय दूरदृष्टीचा असल्याचे सांगितले. त्यांच्या मते, आंतरराष्ट्रीय टर्मिनलमुळे पंजाब, दिल्ली, महाराष्ट्र, तेलंगणा तसेच सीमावर्ती राज्यांतील प्रवाशांना मोठा दिलासा मिळणार असून, नांदेडच्या धार्मिक, पर्यटन, औद्योगिक आणि आर्थिक विकासाला मोठी चालना मिळेल. तख्त सचखंड श्री हजूर साहिब येथे दर्शनासाठी देश-विदेशातून येणार्या लाखो भाविकांना भविष्यात थेट हवाई सेवांचा लाभ मिळण्याचा मार्ग मोकळा होईल. यामुळे शीख धर्मीयांच्या प्रमुख तीर्थक्षेत्रांपैकी एक असलेल्या नांदेडचे महत्त्व जागतिक स्तरावर अधिक वाढण्यास मदत होणार आहे. आढावा बैठकीत धावपट्टीचा विस्तार, आधुनिक टर्मिनल इमारत, प्रवासी सुविधा, सुरक्षा व्यवस्था, पार्किंग तसेच मालवाहतूक सुविधांच्या आधुनिकीकरणावरही सविस्तर चर्चा करण्यात आली. या सर्व सुविधांमुळे विमानतळाची क्षमता वाढून भविष्यातील वाढत्या प्रवासी संख्येला सक्षमपणे सामोरे जाणे शक्य होणार आहे. दरम्यान, नांदेड-मुंबई हवाई सेवा अविरत सुरू ठेवण्यासह भविष्यात दिल्ली, पुणे, हैदराबाद आणि बंगळूरू या प्रमुख शहरांशी हवाई संपर्क अधिक मजबूत करण्यासाठी लवकरच एक उच्चस्तरीय शिष्टमंडळ भारत सरकारच्या नागरी हवाई वाहतूक मंत्र्यांची भेट घेणार असल्याची माहितीही यावेळी देण्यात आली. आंतरराष्ट्रीय टर्मिनलची उभारणी पूर्ण झाल्यानंतर नांदेडची ओळख राष्ट्रीय स्तरापलीकडे जाऊन जागतिक स्तरावर एक महत्त्वाचे धार्मिक आणि प्रादेशिक हवाई केंद्र म्हणून निर्माण होईल, असा विश्वास डॉ. विजय सतबीरसिंघ तसेच स्थानिक नागरिकांनी व्यक्त केला आहे.

COMMENTS