अहिल्यानगर : राज्यभरात खळबळ उडवून देणार्या भोंदू बाबा अशोक खरात प्रकरणाचा तपास आता अंतिम टप्प्यात पोहोचत असून, या गुन्हेगारी जाळ्याला हातभार लाव

अहिल्यानगर : राज्यभरात खळबळ उडवून देणार्या भोंदू बाबा अशोक खरात प्रकरणाचा तपास आता अंतिम टप्प्यात पोहोचत असून, या गुन्हेगारी जाळ्याला हातभार लावणार्यांवरही कठोर कारवाई होणार असल्याचा स्पष्ट इशारा विशेष तपास पथकाच्या प्रमुख तेजस्वी सातपुते यांनी दिला आहे. सखोल तपासासाठी पथकाची व्याप्ती वाढवण्यात आली असून, 24 अनुभवी अधिकारी आणि अंमलदार अहोरात्र तपासात गुंतले आहेत.
पत्रकार परिषदेत सातपुते यांनी सांगितले की, तपासासाठी तांत्रिक पुरावे, साक्षीदारांचे जबाब आणि डिजिटल माहिती यांचा काटेकोर वापर केला जात आहे. पथकात दोन उपअधीक्षक, तीन निरीक्षक, तीन सहाय्यक निरीक्षक, दहा उपनिरीक्षक आणि सहा अंमलदारांचा समावेश असून, गुन्ह्यांचे संपूर्ण जाळे उलगडण्याचा प्रयत्न सुरू आहे. अशोक खरात याच्यावर नाशिक आणि अहिल्यानगर जिल्ह्यांत मिळून 12 गुन्हे दाखल आहेत. त्यापैकी 11 गुन्ह्यांचा तपास विशेष पथक करत आहे. आठ प्रकरणे महिलांवरील लैंगिक अत्याचाराशी संबंधित असून उर्वरित प्रकरणे आर्थिक फसवणूक, जादूटोणा विरोधी कायदा आणि अवैध सावकारीशी निगडित आहेत. उर्वरित तीन गुन्ह्यांचा तपास स्थानिक पोलीस करत आहेत. तपासादरम्यान 30 हून अधिक साक्षीदारांची चौकशी करण्यात आली आहे. खरात हा स्वतःकडे दैवी शक्ती असल्याचे भासवून लोकांची फसवणूक करत असे. कुटुंबातील अनर्थाची भीती दाखवून पैसे उकळणे, अंधाराचा फायदा घेत बनावट चमत्कार दाखवणे आणि महिलांना बदनामीची धमकी देत शोषण करणे, अशी त्याची कार्यपद्धती उघड झाली आहे. पीडितांविषयीची आक्षेपार्ह माहिती रोखण्यासाठी सायबर पथकाने मोठी मोहीम राबवली आहे. आतापर्यंत 4 हजार 650 हून अधिक लिंक हटवण्यात आल्या असून 451 अकाउंट्स कायमस्वरूपी बंद करण्यात आले आहेत. तसेच व्हिडिओ प्रसारित करणार्यांविरुद्ध स्वतंत्र गुन्हे दाखल करून सहा आरोपींना अटक करण्यात आली आहे.
पीडितांच्या गोपनीयतेचे संरक्षण महत्त्वाचे
या प्रकरणात पीडित महिलांनी मोठ्या धैर्याने पुढे येत तक्रारी नोंदवल्या आहेत. त्यांच्या ओळखीचे संरक्षण करणे हे समाज आणि प्रसारमाध्यमांचे कर्तव्य असल्याचे सातपुते यांनी स्पष्ट केले. लैंगिक अत्याचार पीडितांची ओळख उघड करणे हा कायद्याने गंभीर गुन्हा आहे. त्यांच्या खासगी आयुष्यावर चर्चा करणे किंवा व्हिडिओ प्रसारित करणे टाळावे, असे आवाहनही करण्यात आले.
बड्या व्यक्तींवरही तपासाची छाया
या प्रकरणात इतर कोणाचा सहभाग आहे का, याचाही शोध सुरू आहे. पुराव्यानिशी ज्यांची नावे समोर येतील, त्यांच्यावर कोणतीही दया न दाखवता कायदेशीर कारवाई केली जाईल, असे सातपुते यांनी ठामपणे सांगितले. त्यामुळे येत्या काळात काही प्रभावशाली व्यक्तींनाही तपासाला सामोरे जावे लागू शकते, अशी शक्यता व्यक्त होत आहे.एकूणच, अशोक खरात प्रकरणाचा तपास निर्णायक टप्प्यात पोहोचला असून, संपूर्ण गुन्हेगारी साखळी उघड करण्यासाठी यंत्रणा सज्ज असल्याचे चित्र स्पष्ट झाले आहे.

COMMENTS