मुंबई : बारामती पोटनिवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या सुप्रिया सुळे यांच्या एका सूचक वक्तव्याने राज्याच्या राजकारणात नव्

मुंबई : बारामती पोटनिवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या सुप्रिया सुळे यांच्या एका सूचक वक्तव्याने राज्याच्या राजकारणात नव्या चर्चांना उधाण आले आहे. नातेसंबंध हेच खरे महत्त्वाचे असल्याचा संदेश देत त्यांनी कुटुंबीय ऐक्याचा मुद्दा अधोरेखित केला. सत्ता आणि पैशापेक्षा नाती अधिक मौल्यवान असतात, असे स्पष्ट करत त्यांनी सुनेत्रा पवार यांच्या प्रचाराबाबतही संकेत दिले.
सुनेत्रा पवार यांच्या प्रचारासाठी जाणार का, या प्रश्नावर सुळे यांनी थेट उत्तर देणे टाळले. मात्र, हा निर्णय अजित पवार गटाकडून येणार्या निमंत्रणावर अवलंबून असल्याचे त्यांनी सूचित केले. बोलावणे आले, तर विचार केला जाईल, असे म्हणत त्यांनी कुटुंबीय नात्यांना प्राधान्य देण्याची भूमिका व्यक्त केली. त्यामुळे पवार कुटुंबातील नातेसंबंध आणि राजकीय भिन्नता यामधील समतोल कसा साधला जाणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. बारामती पोटनिवडणूक बिनविरोध का झाली नाही, याबाबतही सुळे यांनी भाष्य केले. या प्रक्रियेची जबाबदारी अजित पवार गटावर असल्याचे सांगत त्यांनी अप्रत्यक्ष टीका केली. या प्रश्नाचे उत्तर त्यांनाच विचारावे, असे म्हणत त्यांनी विषयावर अधिक भाष्य टाळले. निवडणुकीच्या काळात कार्यकर्त्यांमध्ये उत्साह असतो आणि स्पर्धा होणे स्वाभाविक असल्याचेही त्यांनी नमूद केले. सुळे या पंढरपूर येथे विठ्ठलाच्या दर्शनासाठी आल्या असताना त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी पुन्हा एकदा कुटुंबाच्या ऐक्याचा उल्लेख करत, संपूर्ण कुटुंब सुनेत्रा वहिनींच्या पाठीशी असल्याचे सांगितले. या वक्तव्यामुळे पवार कुटुंबातील नातेसंबंध अद्याप मजबूत असल्याचा संदेश देण्याचा प्रयत्न दिसून आला. बारामती पोटनिवडणुकीची प्रक्रिया सुरू झाली असून 30 मार्च रोजी अधिसूचना जाहीर झाली होती. उमेदवारी अर्ज सादर करण्याची मुदत 6 एप्रिलपर्यंत होती. त्यानंतर 7 एप्रिल रोजी अर्जांची छाननी पार पडली, तर 9 एप्रिलपर्यंत अर्ज मागे घेण्याची अंतिम मुदत देण्यात आली होती. मतदान 23 एप्रिल रोजी होणार असून मतमोजणी 4 मे रोजी होईल. संपूर्ण प्रक्रिया 6 मेपर्यंत पूर्ण होणार आहे.

COMMENTS