पाटोदा तालुक्यातील श्री क्षेत्र अश्वत्थलिंग देवालयाचे मठाधिपती महादेवानंदभारती महाराज यांच्या अभिष्टचिंतन व वारकरी सन्मान सोहळ्याचे आयोजन शुक्रवा

पाटोदा तालुक्यातील श्री क्षेत्र अश्वत्थलिंग देवालयाचे मठाधिपती महादेवानंदभारती महाराज यांच्या अभिष्टचिंतन व वारकरी सन्मान सोहळ्याचे आयोजन शुक्रवार दि.15 रोजी सायंकाळी श्री स्वामी अमृतभारती विद्यालय, पिंपळवंडी येथे करण्यात आले.
या सोहळ्यास ह.भ.प. कृष्ण चैतन्य महाराज, संतोष भारती महाराज, विष्णू महाराज, शिवाजी येवले महाराज, शिवानंदभारती, परमानंदभारती, नारायण महाराज, दत्ता महाराज बेदरे, राम डोंगर महाराज यांच्यासह अनेक संत व मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमात बोलताना बजरंग सोनवणे यांनी सांगितले की, मानवी जीवनात शिक्षणाला मोठे महत्त्व आहे. शाळेत ज्ञान मिळते, परंतु हरी कीर्तन, ग्रंथवाचन व श्रवणातून आत्मिक ज्ञानाची प्राप्ती होते. ज्ञानेश्वरी पारायणातून विश्वज्ञान व समाधान मिळते. संत ज्ञानेश्वर व संत तुकाराम महाराजांचे विचार आचरणात आणल्यास जीवनातील संकटांवर मात करता येते. राजकारणातही अध्यात्मिक ज्ञान आवश्यक असून संत विचारांमुळे गाव व शहर विकासासाठी सातत्याने प्रेरणा मिळते. प्रत्येक व्यक्तीचे दुःख दूर करून रोजगारनिर्मिती व समाजहित साधण्यासाठी संत विचार मार्गदर्शक ठरतात, असे त्यांनी नमूद केले. महादेवानंदभारती महाराजांचे शिक्षण, जलसंधारण, वृक्षसंवर्धन व समाजनिर्मितीतील कार्य प्रेरणादायी असल्याचेही त्यांनी सांगितले. मराठवाड्यातील सर्वाधिक वृक्षलागवड त्यांच्या माध्यमातून झाल्याचे सांगत त्यांनी त्यांच्या कार्याचे कौतुक केले. कार्यक्रमास माजी आमदार साहेबराव दरेकर, परमेश्वर येवले, युवा नेते भाऊसाहेब भवर, युवराज काशीद, अजय काशीद, माऊली जरांगे, उपजिल्हाधिकारी गणेश सांगळे यांच्यासह अनेक मान्यवर, ग्रामस्थ व वारकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. एम.डी. साबळे, एस.आर. पवार, प्रताप पवार व दिलीप जरे यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी श्री स्वामी अमृतभारती विद्यालयाचे शिक्षक, ईश्वरभारती तरुण मंडळ, ग्रामपंचायत पदाधिकारी व ग्रामस्थांनी परिश्रम घेतले.

COMMENTS