Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

युरियासाठी होणारी शेतकऱ्यांची पिळवणूक थांबवा; भाजपची मागणी

कर्जत : कर्जत तालुक्यात युरिया खताचा तीव्र तुटवडा निर्माण झाला असून, या परिस्थितीचा गैरफायदा घेत काही कृषी व्यावसायिकांकडून शेतकऱ्यांची अडवणूक केल

रेहेकुरी वनक्षेत्रात काळविटाच्या शिकारीचा प्रयत्न
हरणाची शिकार, जिवंत हरणेही पळवली
कर्जतमध्ये युवकाचा निर्घृण खून

कर्जत : कर्जत तालुक्यात युरिया खताचा तीव्र तुटवडा निर्माण झाला असून, या परिस्थितीचा गैरफायदा घेत काही कृषी व्यावसायिकांकडून शेतकऱ्यांची अडवणूक केली जात असल्याचा गंभीर आरोप भारतीय जनता पक्षाच्या वतीने करण्यात आला आहे. युरिया खतासाठी शेतकऱ्यांची पिळवणूक तात्काळ थांबवावी, अशी ठाम मागणी भाजपचे तालुका सरचिटणीस नंदलाल काळदाते यांनी केली आहे.

 या पार्श्वभूमीवर भाजप कर्जत तालुका शाखेच्या वतीने तालुका कृषी अधिकारी नंदकुमार वाणी यांना निवेदन देण्यात आले. यावेळी ओबीसी सेलचे जिल्हाध्यक्ष दादासाहेब सोनमाळी, तालुकाध्यक्ष अनिल गदादे, तालुका सरचिटणीस नंदलाल काळदाते, कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक श्रीहर्ष शेवाळे, किसान आघाडीचे तालुकाध्यक्ष दत्तात्रय नलवडे, युवा मोर्चाचे तालुकाध्यक्ष निळकंठ शेळके, सरचिटणीस स्वप्निल तोरडमल यांच्यासह भाजपचे पदाधिकारी उपस्थित होते.

 निवेदन देताना नंदलाल काळदाते म्हणाले की, कर्जत तालुक्यात शेतकऱ्यांना युरिया मिळवण्यासाठी कृषी सेवा केंद्रांवर वारंवार चकरा माराव्या लागत आहेत. अनेक ठिकाणी ‘युरिया उपलब्ध नाही’ असे सांगून शेतकऱ्यांना परत पाठवले जात आहे. काही दुकानदारांकडून युरिया देताना इतर खते व औषधे बळजबरीने खरेदी करण्याची अट घातली जात असून, शासकीय दरापेक्षा जास्त दराने खतांची विक्री केल्याच्या तक्रारीही मोठ्या प्रमाणात समोर येत आहेत.

 खरीप हंगामात अतिवृष्टीमुळे पिकांचे मोठे नुकसान झाले असून, रब्बी हंगामात पिकांच्या वाढीसाठी युरिया खत अत्यावश्यक आहे. अशा परिस्थितीत शेतकऱ्यांची पिळवणूक होणे दुर्दैवी असल्याचे काळदाते यांनी सांगितले. विधान परिषदेचे सभापती प्रा. राम शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली हे निवेदन देण्यात आले असून, तालुका कृषी अधिकाऱ्यांनी तात्काळ दखल घेत सर्व कृषी व्यवसायिकांना लेखी सूचना दिल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

 तालुका कृषी अधिकारी नंदकुमार वाणी यांनी स्पष्ट केले की, कोणत्याही कृषी दुकानदाराने युरियासाठी शेतकऱ्यांची अडवणूक करू नये. शासनाने ठरवून दिलेल्या दरानेच युरिया द्यावा. इतर खते बळजबरीने देऊ नयेत किंवा ‘युरिया नाही’ असे सांगून शेतकऱ्यांना परत पाठवू नये, असे परिपत्रक काढण्यात आले आहे. शेतकऱ्यांची अडवणूक झाल्यास संबंधित दुकानदाराविरुद्ध नावासह तक्रार करण्याचे आवाहनही त्यांनी केले.

COMMENTS