Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

कार्याला ’माणुसकी’चे श्राध्द; तांबवेच्या पाटील कुटुंबाने दिले मुलांना शैक्षणिक साहित्य

प्रतिक्रियापाटील कुटुंबीयांचे जिजाऊ वसतिगृहावर नेहमीच मायेचे छत्र राहिले आहे. मुलांच्या विकासात त्यांचाही सिंहाचा वाटा आहे. 30 मुलांचे संगोपन होण

माण तालुक्यातील वीर जवान दादासो तोरसकर यांना अखेरचा निरोप
सातारा-म्हसवड-माळशिरस चौक रस्ता दुरुस्तीची मागणी
राजू नाईकला अ‍ॅट्रॉसिटी अ‍ॅक्टनुसार अटक करा

प्रतिक्रिया
पाटील कुटुंबीयांचे जिजाऊ वसतिगृहावर नेहमीच मायेचे छत्र राहिले आहे. मुलांच्या विकासात त्यांचाही सिंहाचा वाटा आहे. 30 मुलांचे संगोपन होण्यासाठी दानशुरांनी मदतीसाठी पुढे यावे.
समीर नदाफ (संस्थापक, जिजाऊ वसतिगृह)

कराड / प्रतिनिधी : कुटुंबातील कर्तबगार व्यक्तिच्या निधनाचे दुःख असतानाही त्यांचा विचारांचा, कृतीचा वारसा जोपासत पाटील कुटुंबियांनी निराधार मुलांना शैक्षणिक साहित्य, भोजन देऊन खर्‍या अर्थाने तेराव्याला ’माणुसकी’चे श्राध्द घातले. तेराव्या दिवशीचा उत्तर कार्याचा विधी उरकून वडीलांच्या संस्कारांवर चालण्याचा केलेला प्रयत्न आदर्शवत आहे.
तांबवे, ता. कराड येथील ज्ञानदेव पाटील यांचे अल्पशा आजाराने नुकतेच निधन झाले. त्यांचा उत्तर कार्य विधी गुरुवारी झाला. त्यानंतर त्यांची मुले विकास पाटील, पत्रकार विशाल पाटील, स्व. सौ. सुशीला ज्ञानदेव पाटील बहुउद्देशीय सामाजिक संस्थेच्या अध्यक्षा नयना खबाले-पाटील यांनी कोळे, ता. कराड येथील जिजाऊ बहुउद्देशीय सेवाभावी संस्थेच्या जिजाऊ वसतिगृहातील 30 निराधार मुलांना वही, पेन, कंपास पेटी आदी शैक्षणिक साहित्य तसेच पाणी बॉटल, टॉवेल याची मदत दिली. शिवाय, या मुलांना भोजनही दिले. यावेळी कराड येथील व्यापारी निखिल शहा, पोतले गावचे सरपंच संदीप पाटील, तांबव्याचे माजी सरपंच जावेद मुल्ला, शंकर चव्हाण, विकास पाटील, अनिल काटवटे, विकास खडंग, आक्काताई पाटील, नयना खबाले, सविता पाटील, प्रियंका पाटील, अस्मिता पाटील, शरयू शेळके, श्रीमान पाटील, अन्वीती खबाले उपस्थित होते. वसतिगृहाचे संस्थापक समीर नदाफ, सलमा नदाफ यांचा पोशाख देऊन सत्कार केला.
निखिल शहा म्हणाले, आई-वडीलांच्या शिकवणीतून कष्ट, जिद्द, चिकाटी आणि सामाजिक बांधिलकी या गुणांचे बाळकडू मिळालेल्या पाटील कुटुंबीयांनी वडीलांच्या उत्तरकार्य विधी निमित्ताने मुलांना शैक्षणिक मदत व भोजन देऊन समाजाकरिता एक आदर्श पुढे ठेवला. आईने साथ सोडून दीड वर्षे उलटले नाही तोपर्यंत वडीलांचे छत्र हरपून गेले. कुटुंबावर दुःखाचा डोंगर असतानाही आई-वडीलांनी दिलेल्या संस्काराचे पालन करीत मुलांना मदत केली.
जिजाऊ वसतिगृहाचे संस्थापक सलमा व समीर नदाफ यांनी मुलांवर केलेले संस्कार पाहता नदाफ दाम्पत्यांनी खरोखरच एक उत्तम प्रकल्प समाजासमोर ठेवला. येथे समाजातील सर्व थरांमध्ये दुर्लक्षित झालेली बालके आहेत. नदाफ दाम्पत्यांनी स्वतःच्या मुला-मुलींप्रमाणेच या 30 बालकांचा स्वीकार करून सर्वांना शिक्षण देत त्यांचे पालन पोषण करण्याचा नित्यक्रम 2015 पासून चालू आहे, हे कृतकृत्यर्थ करणारे आहे, असे गौरवोद्गार निखिल शहा यांनी काढले.
आई सुशीला यांच्या निधनानंतर काही दिवसांत दिवाळीचे पदार्थ ऊस तोड कामगारांना देऊन त्यांची दिवाळी गोड केली होती. आई-वडीलांच्या दातृत्वाचे संस्कार कायम ठेवू आज निराधार मुलांना मदत दिली. हे पाऊल समाजासाठी आदर्शवत आहे, असे मत जावेद मुल्ला, संदीप पाटील यांनी व्यक्त केले.
’श्रध्दया क्रियते तत् श्राध्दम्’ म्हणजे जे श्रध्देने केले जाते ते श्राध्द होय. पितरांविषयी आदर बाळगणे, त्यांच्या नावे दानधर्म करणे व त्यांना संतोष होईल अशी कृत्ये करणे हे वंशजांचे कर्तव्य आहे, असे धर्मशास्त्र सांगते. ज्ञानदेव पाटील यांनी अनेकांना शिक्षणासाठी मदत केली. तो वारसा जपण्याचे काम पाटील कुटुंबीयांनी केले आहे, असे प्रतिपादन शंकर चव्हाण यांनी केले.


’आमदार व्हायचंय’
वसतिगृहातील मुलांनी शालेय परिपाठातील ’हीच आमुची प्रार्थना’ सुंदररीत्या सादर केली. त्याचवेळी एका मुलाने लेखक शिव खेरा यांच्या पुस्तकातील प्रेरणादायी कथा सांगून स्वतःच्या जीवनातील ध्येय सांगितले. ’मला आमदार व्हायचंय’ असे त्याने सांगताच सर्वांनी टाळ्या वाजवून त्याचे कौतुक केले.

COMMENTS