Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

माण तालुक्यातील वीर जवान दादासो तोरसकर यांना अखेरचा निरोप

दहिवडी / प्रतिनिधी : अतिशय दुर्दैवी घटनेत प्राण गमवावा लागलेल्या सीमा सुरक्षा दलातील जवान व कोळेवाडीचे (ता. माण) सुपुत्र हेड कॉन्स्टेबल दादासो सो

पंढरपूरला जाताना कारच्या धडकेत कोल्हापूर जिल्ह्यातील 7 वारकर्‍यांचा मृत्यू
म्हसवड शहरातील 10 घरांमध्ये चोरी; लाखोचा मुद्देमाल लंपास
सोमय्यांचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळला, मुलाचा फैसला उद्या

दहिवडी / प्रतिनिधी : अतिशय दुर्दैवी घटनेत प्राण गमवावा लागलेल्या सीमा सुरक्षा दलातील जवान व कोळेवाडीचे (ता. माण) सुपुत्र हेड कॉन्स्टेबल दादासो सोपान तोरसकर (वय 49) यांना साश्रूपुर्ण डोळ्यांनी धीरगंभीर वातावरणात अंतिम निरोप देण्यात आला. वीर जवानाच्या अंत्य दर्शनासाठी कोळेवाडीत जनसमुदाय लोटला होता.
पंजाब राज्यातील अमृतसर जिल्ह्यातील खासा येथील बीएसएफच्या मुख्यालयात 144 बी. एन. या युनिटमध्ये युनिटमधीलच सहकार्‍याने केलेल्या गोळीबारात हेड कॉन्स्टेबल दादासो तोरसकर यांचा रविवारी मृत्यू झाला होता. या दुर्दैवी घटनेची माहिती समजताच कोळेवाडीकरांवर दु:खाचा डोंगर कोसळला. कोळेवाडीसह संपुर्ण परिसरावर शोककळा पसरली. त्यानंतर सर्वांचे डोळे वीर जवान दादासो यांच्या पार्थिवाकडे लागले होते. आज मंगळवारी सकाळी आठच्या सुमारास पार्थिव गावात आल्यानंतर कुटूंबियांसह, आप्तेष्टांनी दु:खावेगाने हंबरडा फोडला.
त्यानंतर सकाळी सव्वा नऊच्या सुमारास वीर जवान दादासो यांच्या पार्थिवाची सजविलेल्या ट्रॅक्टर मधून अंत्ययात्रा काढण्यात आली. अंत्यदर्शनासाठी आबालवृद्धांसह महिलांचा जनसमुदाय लोटला होता. सकाळी दहाच्या सुमारास अंत्यसंस्कारासाठी तयार करण्यात आलेल्या मोकळ्या रानात पार्थिव आणण्यात आले. प्रशासनाकडून प्रांताधिकारी शैलेश सुर्यवंशी, परिविक्षाधिन तहसीलदार रिचर्ड यानथन, उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ. निलेश देशमुख, गटविकास अधिकारी सर्जेराव पाटील, सपोनि संतोष तासगावकर, बीएसएफचे अधिकारी, आजी-माजी सैनिक संघटनेचे पदाधिकारी व सदस्य तसेच बीएसएफ असोसिएशनचे राज्यभरातील पदाधिकारी व सदस्यांनी वीर जवान दादासो यांच्या पार्थिवावर पुष्पचक्र अर्पण करुन श्रध्दांजली अर्पण केली.
बीएसएफ तसेच सातारा पोलिस दलाकडून बिगुल वाजवून व तीन राऊंड फायर करुन मानवंदना देण्यात आली. नंतर वीर जवान दादासो यांच्या पार्थिवावर ठेवलेला तिरंगा ध्वज त्यांची पत्नी वनिता आणि मुले सुधीर व सुशांत यांच्याकडे सुपूर्द करण्यात आला. सर्व धार्मिक विधी झाल्यानंतर वीर जवान दादासो यांच्या पार्थिवास मुलगा सुधीर याने मुखाग्नी दिला.

वीर जवान दादासो तोरसकर हे सन 1992 साली सीमा सुरक्षा दलात भरती झाले. सध्या ते हेड कॉन्स्टेबल पदावर कार्यरत होते. त्यांचे वडील सोपान तोरसकर यांनी भारतीय सेनेत बाँम्बे इंजिनिअरिंग ग्रुपमध्ये 17 वर्षे देशसेवा केली आहे. त्यांचे धाकटे बंधू नवनाथ सोपान तोरसकर हे भारतीय सेनेच्या आर्मी मेडिकल कोअर मध्ये गेली 10 वर्षे देशसेवा करत आहेत. एक बंधू शेती करतात.

COMMENTS