Homeताज्या बातम्यादेश

नीट पेपरफुटीप्रकरणात शिवराज मोटेगावकरांना अटक9 दिवसांची सीबीआय कोठडी ; आर्थिक बाबी उलगण्याचे आव्हान

लातूर/नवी दिल्ली : वैद्यकीय प्रवेशासाठी घेतल्या जाणार्‍या राष्ट्रीय पात्रता व प्रवेश परीक्षेतील प्रश्‍नपत्रिका अर्थात नीट परीक्षेतील गैरव्यवहार प

नीट पेपरफुटी प्रकरणाने लाखो विद्यार्थ्यांचे भविष्य अधांतरी; विद्यार्थ्यांच्या मानसिकतेचा विचार कोण करणार?
नीट परीक्षा रद्द करण्याची नामुष्कीपेपरफुटीमुळे निर्णय ; देशातील 23 लाख विद्यार्थ्यांनी दिली होती परीक्षा
नीट पेपरफुटी आणि शिक्षणाचा बाजार !


लातूर/नवी दिल्ली : वैद्यकीय प्रवेशासाठी घेतल्या जाणार्‍या राष्ट्रीय पात्रता व प्रवेश परीक्षेतील प्रश्‍नपत्रिका अर्थात नीट परीक्षेतील गैरव्यवहार प्रकरणात केंद्रीय अन्वेषण विभाग अर्थात सीबीआयने लातूर येथील आरसीसी क्लासेसचे संचालक शिवराज मोटेगावकर यांना अटक केली आहे. सोमवारी विशेष सीबीआय कोर्टात हजर केले असता न्यायालयाने मोटेगावकर याला 9 दिवसांची सीबीआय कोठडी सुनावली आहे. मोटेगावकर हे लातूरमधील नामांकित आरसीसी या कोचिंग संस्थेचे संचालक असून, या प्रकरणातील त्यांची भूमिका नेमकी काय होती याचा तपास आता अधिक तीव्र करण्यात आला आहे.
या प्रकरणात यापूर्वी रसायनशास्त्र विषयाचे प्राध्यापक पी. व्ही. कुलकर्णी तसेच वनस्पतिशास्त्र विषयाच्या अध्यापिका मनीषा मांढरे यांना अटक करण्यात आली होती. आता मोटेगावकरांच्या अटकेमुळे या संपूर्ण गैरव्यवहाराचे जाळे राज्याबाहेरही विस्तारले असल्याचे संकेत मिळत आहेत. तपास यंत्रणांच्या मते, हा प्रकार केवळ काही व्यक्तींपुरता मर्यादित नसून देशभर पसरलेल्या संघटित साखळीचा भाग असू शकतो. गत आठवड्यात सीबीआयने मोटेगावकर यांच्या विविध ठिकाणांवरील कार्यालये आणि वर्गांवर छापे टाकले होते. या कारवाईदरम्यान काही महत्त्वाची कागदपत्रे, संगणकीय साधने आणि इलेक्ट्रॉनिक उपकरणे जप्त करण्यात आली होती. या तपासातून अनेक धक्कादायक बाबी समोर येत असल्याचे सांगितले जात आहे. तपास अधिकार्‍यांच्या माहितीनुसार, परीक्षेच्या सुमारे दहा दिवस आधीच प्रश्‍नपत्रिकेची माहिती काही आरोपींकडे पोहोचली होती. मोटेगावकर यांच्या दूरध्वनी संचातून प्रश्‍नपत्रिका आणि उत्तरसंचाशी संबंधित माहिती मिळाल्याचा दावा तपास यंत्रणांनी केला आहे. काही विद्यार्थ्यांना आणि मध्यस्थांना ही माहिती पाठवण्यात आल्याची शक्यता तपासली जात आहे. तपासात काही मध्यस्थांच्या माध्यमातून आर्थिकदृष्ट्या सक्षम कुटुंबांशी संपर्क साधून प्रवेश परीक्षेत जास्त गुण मिळवून देण्याचे आमिष दाखवण्यात येत असल्याचे समोर आले आहे. काही पालकांनी लाखो रुपये देऊन प्रश्‍नपत्रिका विकत घेतल्याच्या चर्चांमुळे शिक्षण क्षेत्रात मोठी खळबळ उडाली आहे.
मोटेगावकरकडे 10 दिवसआधीच होता नीटचा पेपर ?
नीट पेपरफुटी प्रकरणात लातूरचे प्रसिद्ध आरसीसी कोचिंगचे संचालक शिवराज मोटेगावकर यांच्याकडे नीटचा पेपर 10 दिवस आधीच असल्याचे सीबीआयच्या तपासात उघड झाले आहे. मोटेगावकर यांनी 23 एप्रिल 2026 रोजीच नीट परीक्षेची प्रश्‍नपत्रिका आणि उत्तरपत्रिका मिळवली होती. म्हणजे परीक्षा होण्याच्या दहा दिवस आधीच त्यांच्या हातात पेपर पोहोचल्याचा संशय आहे. 14 मे रोजी लातूर येथील त्यांच्या निवासस्थानी छापा टाकण्यात आला होता. यावेळी त्यांच्या मोबाईल फोनमध्ये नीट परीक्षेशी संबंधित प्रश्‍न आणि उत्तरपत्रिकेचा डेटा आढळल्याचे सांगितले जात आहे.
देशभरातील आरोपी तपासाच्या कक्षेत
या प्रकरणाचे धागेदोरे महाराष्ट्राबरोबरच राजस्थान, हरियाणा आणि इतर राज्यांपर्यंत पोहोचल्याचे समोर आले आहे. विविध राज्यांतील काही आरोपींना ताब्यात घेण्यात आले असून त्यांच्या संपर्कातून आणखी मोठे जाळे उघड होण्याची शक्यता आहे. छापेमारीदरम्यान जप्त करण्यात आलेले भ्रमणध्वनी, संगणक, वह्या आणि इतर उपकरणे न्यायवैद्यकीय तपासणीसाठी पाठवण्यात आली आहेत. हटवलेला माहिती संच पुन्हा मिळवण्याचे काम सुरू असून आर्थिक व्यवहारांचाही तपास केला जात आहे.
लाभार्थी विद्यार्थ्यांची माहिती गुप्त?
तपासादरम्यान काही लाभार्थी विद्यार्थ्यांची नावे समोर येण्याची शक्यता व्यक्त होत असली तरी संबंधित आरोपींकडून याबाबत सहकार्य मिळत नसल्याचे समजते. तपासात पुरावे नष्ट करण्याचाही प्रयत्न झाल्याचा संशय व्यक्त करण्यात आला आहे. परीक्षेनंतर काही तांत्रिक माहिती हटवण्यात आल्याचेही प्राथमिक चौकशीत उघड झाले आहे.

COMMENTS