अॅमस्टरडॅम : हिमाचल प्रदेशच्या डोंगररांगांतून आलेल्या तरुण धावपटू सावन बरवालने आंतरराष्ट्रीय पातळीवर भारतीय क्रीडाजगताला अभिमान वाटावा अशी ऐतिह

अॅमस्टरडॅम : हिमाचल प्रदेशच्या डोंगररांगांतून आलेल्या तरुण धावपटू सावन बरवालने आंतरराष्ट्रीय पातळीवर भारतीय क्रीडाजगताला अभिमान वाटावा अशी ऐतिहासिक कामगिरी नोंदवली आहे. नेदरलँड्समध्ये झालेल्या प्रतिष्ठित ‘एनएन मॅरेथॉन रॉटरडॅम’ स्पर्धेत त्याने तब्बल 48 वर्षे अबाधित राहिलेला भारतीय मॅरेथॉन विक्रम मोडीत काढत नवे पर्व सुरू केले.
बरवालने 42.195 किलोमीटरचे अंतर केवळ 2 तास 11 मिनिटे 58 सेकंदांत पूर्ण करत ही विक्रमी कामगिरी साधली. या वेळेसह त्याने 1978 साली शिवनाथ सिंग यांनी नोंदवलेला 2 तास 12 मिनिटांचा विक्रम मागे टाकला. भारतीय धावपटूंसाठी हा विक्रम दीर्घकाळ गाठता न आलेला टप्पा मानला जात होता. त्यामुळे बरवालची ही झेप विशेष महत्त्वाची ठरते. या शर्यतीत बरवालने एकूण विसावे स्थान मिळवले. त्याच्यासोबत सहभागी झालेला आणखी एक भारतीय धावपटू गोपी थोनाकल याने 2 तास 13 मिनिटे 16 सेकंद अशी वेळ नोंदवत तेवीसावे स्थान मिळवले. दोन्ही धावपटूंनी आंतरराष्ट्रीय दर्जाच्या स्पर्धेत केलेली ही कामगिरी भारतीय अॅथलेटिक्ससाठी सकारात्मक संकेत देणारी मानली जात आहे. विशेष म्हणजे, रॉटरडॅममधील ही स्पर्धा सावन बरवालची पहिलीच पूर्ण मॅरेथॉन होती. यापूर्वी त्याने अधिकृत मॅरेथॉन शर्यतीत भाग घेतला नव्हता. पहिल्याच प्रयत्नात राष्ट्रीय विक्रम मोडणे ही अत्यंत दुर्मीळ आणि उल्लेखनीय बाब मानली जाते. त्यामुळे त्याच्या क्षमतेबाबत आणि भविष्यातील कामगिरीबाबत मोठ्या अपेक्षा व्यक्त केल्या जात आहेत. या वर्षाच्या सुरुवातीला अमेरिकेत झालेल्या जागतिक क्रॉस-कंट्री स्पर्धेत सहभाग घेतल्यानंतर ही त्याची हंगामातील दुसरीच स्पर्धा होती. अल्प कालावधीत त्याने स्वतःची क्षमता सिद्ध करत सातत्यपूर्ण कामगिरीचे दर्शन घडवले आहे. मंडी जिल्ह्यातील जोगिंदर नगर परिसरातील एका छोट्याशा गावात वाढलेला 28 वर्षीय सावन बरवाल हा साध्या कुटुंबातून पुढे आलेला खेळाडू आहे. कठोर सराव, चिकाटी आणि जिद्दीच्या जोरावर त्याने लांब पल्ल्याच्या धावण्यामध्ये स्वतःची ओळख निर्माण केली आहे. ग्रामीण पार्श्वभूमीतून आलेल्या या खेळाडूने आंतरराष्ट्रीय स्तरावर पोहोचून अनेक तरुणांसाठी प्रेरणादायी उदाहरण निर्माण केले आहे. बरवालने यापूर्वी दिल्ली अर्ध मॅरेथॉन आणि कोलकाता येथील 25 किलोमीटर धावस्पर्धांमध्ये नियमित सहभाग घेतला आहे. 2024 साली दिल्ली अर्ध मॅरेथॉनमध्ये भारतीय अव्वल गटात सुवर्णपदक मिळवत त्याने आपली गुणवत्ता सिद्ध केली होती. त्या कामगिरीनंतर त्याच्याकडून मोठ्या अपेक्षा व्यक्त होत होत्या, आणि आता त्याने त्या अपेक्षांना साजेसा परफॉर्मन्स देत विक्रमाच्या रूपाने ठोस उत्तर दिले आहे.

COMMENTS