श्रीगोंदा: दिल्लीतील जंतर-मंतर येथे विद्यार्थी, युवक आणि शिक्षण वाचवा या मागण्यांसाठी सुरू असलेल्या आंदोलनाला श्रीगोंदा तालुक्यातील संघर्ष क्रांत

श्रीगोंदा: दिल्लीतील जंतर-मंतर येथे विद्यार्थी, युवक आणि शिक्षण वाचवा या मागण्यांसाठी सुरू असलेल्या आंदोलनाला श्रीगोंदा तालुक्यातील संघर्ष क्रांती संघासह विविध सामाजिक संघटनांनी जाहीर पाठिंबा दर्शविला. नीटसह विविध राष्ट्रीय स्तरावरील शैक्षणिक परीक्षांमधील कथित पेपरफुटी, परीक्षा व्यवस्थेतील अनियमितता आणि विद्यार्थ्यांच्या भवितव्याशी होत असलेल्या अन्यायाच्या निषेधार्थ श्रीगोंदा तहसील कार्यालयात तहसीलदार मा. डोंगरे यांच्यामार्फत केंद्र सरकारला निवेदन सादर करण्यात आले.
निवेदनात म्हटले आहे की, वारंवार घडणाऱ्या पेपरफुटीच्या घटनांमुळे लाखो विद्यार्थ्यांचे परिश्रम, स्वप्ने आणि भविष्य धोक्यात आले असून देशातील शिक्षण व्यवस्थेवरील विश्वास हादरला आहे. अशा गंभीर प्रकारांची निष्पक्ष आणि उच्चस्तरीय चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करण्यात यावी. तसेच या संपूर्ण प्रकरणाची नैतिक जबाबदारी स्वीकारून केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी तात्काळ राजीनामा द्यावा, अशी मागणी करण्यात आली.
यावेळी आंदोलनकर्त्यांनी दिल्लीतील जंतर-मंतर येथे शैक्षणिक सुधारणा, परीक्षा व्यवस्थेतील पारदर्शकता आणि विद्यार्थ्यांच्या हक्कांसाठी आंदोलन करणारे ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते सोनम वांगचूक यांच्याशी पोलिसांनी केलेल्या कथित वागणुकीचा तीव्र निषेध व्यक्त केला. लोकशाही मार्गाने आंदोलन करणाऱ्या नागरिकांचा आवाज दडपण्याचा कोणताही प्रयत्न हा संविधानिक आणि लोकशाही मूल्यांवर आघात असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले.
संघर्ष क्रांती संघाने स्पष्ट केले की, विद्यार्थ्यांच्या न्याय्य मागण्यांसाठी सुरू असलेल्या देशव्यापी आंदोलनाशी श्रीगोंदा तालुका खंबीरपणे एकजूटीने उभा आहे. विद्यार्थ्यांच्या भविष्याशी संबंधित प्रश्नांवर केंद्र सरकारने तातडीने ठोस निर्णय घ्यावेत. परीक्षा प्रक्रियेत पारदर्शकता, उत्तरदायित्व आणि विश्वासार्हता निर्माण करण्यासाठी प्रभावी उपाययोजना राबविण्याची मागणीही यावेळी करण्यात आली.
या प्रसंगी संघर्ष क्रांतीचे सर्वेसर्वा प्रशांत दरेकर, ऍड. सुनील भोस, भाऊसाहेब नेटके, प्रमोद म्हस्के, अशोक नवले, स्वप्निल लाटे, गंगाराम दरेकर, सुयोग गोसावी, सुनिल दरेकर, पृथ्वीराज भोस, शशिकांत पवार, सचिन रायकर तसेच तालुक्यातील विविध सामाजिक संघटनांचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

COMMENTS