Homeताज्या बातम्यासंपादकीय

रशियाचे नरमाईचे सूर

सोव्हिएत रशियाचे विघटन 1990-91 मध्ये झाल्यानंतर रशियाची ताकद खर्‍या अर्थाने क्षीण झाली होती, अन्यथा संपूर्ण जगावर रशियाचे वर्चस्व होते. सोव्हिएत

भारत न्याय यात्रेला होणारा विरोध
वादळापूर्वीची शांतता
माळीणची पुनरावृत्ती

सोव्हिएत रशियाचे विघटन 1990-91 मध्ये झाल्यानंतर रशियाची ताकद खर्‍या अर्थाने क्षीण झाली होती, अन्यथा संपूर्ण जगावर रशियाचे वर्चस्व होते. सोव्हिएत रशियाच्या विघटनानंतर अमेरिका महासत्ता झाली, मात्र तरी देखील रशियाची महत्वाकांक्षा कमी झालेली नाही. रशियाने आतापर्यंत कधीही युरोपीय देशांच्या धोरणासमोर हार पत्करलेली नाही. युरोपीय देश रशियाची आर्थिक कोंडी करण्याचे धोरण राबवित असल्याची कुणकुण लागताच, रशियाने युक्रेनवर हल्ला चढवला. फेबु्रवारी 2022 पासून रशियाने छोटयाशा असलेला युक्रेनवर हल्ले चढवले आणि जेरीस आणले. तर दुसरीकडे युके्रन देशाने देखील विविध पातळयांवर लढाई लढत रशिया सारख्या साम्राज्याला हादरे दिले.

तब्बल 10 महिन्यांपासून रशिया आणि युक्रेन या देशांचे युद्ध सुरू असतांना, त्याचे परिणाम आंतराष्ट्रीय स्तरावर उमटत असल्याचे दिसून येत आहे. विशेष म्हणजे युद्धामुळे आयात-निर्याट ठप्प झाली, कच्च्या तेलाच्या किंमती वाढल्या, परिणामी सर्वंच देशांना महागाईचे मोठा फटका या सहन करावा लागला. 22 फेबु्रवारी 2022 रोजी रशियाने युक्रेनवर हल्ले करण्यास सुरूवात केली. रशियाने आता घेतलेली भूमिका आततायी, आक्रमक वाटत असली तरी प्रत्यक्षात ती एका सुनियोजित रणनीतीचा भाग आहे, हे लक्षात घ्यावे लागेल. केवळ युक्रेनच नव्हे तर सोव्हिएत रशियाच्या विघटनानंतर विभक्त झालेल्या सर्वच देशांच्या अधिग्रहणाबाबत पुतिन यांची असणारी आग्रही भूमिका लपून राहिलेली नाही. सोव्हिएत संघाचे पतन ही इतिहासातील सर्वांत मोठी भूराजकीय समस्या असल्याचे त्यांनी अनेकदा म्हटले आहे.

एका अर्थाने त्यांचे म्हणणे स्वाभाविकही होते; कारण या पतनानंतर रशियाची आर्थिक स्थिती सातत्याने खालावत गेली. मात्र रशियाने युक्रेनसोबतचे युद्ध काही एका दिवसांत करण्याचा निर्णय घेतला नाही. तर, शीतयुद्धाच्या समाप्तीनंतरही अमेरिकेच्या नेतृत्वाखालील पश्‍चिम युरोपियन देशांमध्ये नाटोची व्याप्ती वाढत गेली. यामुळेही रशियाच्या आक्रमकतेला धार येत गेली. किंबहुना, सध्याच्या रशिया-युक्रेन संघर्षाचा मुख्य धागा हा नाटोच्या विस्तारवादातच दडलेला आहे. या विस्तारवादाला रोखणे आणि वैश्‍विक पातळीवर रशियाचे हरवलेले गतवैभव पुन्हा मिळवून देणे या हेतूनेच पुतिन यांनी आपली पावले टाकण्यास सुरुवात केली होती. आपल्या आक्रमकतेमुळे पाश्‍चिमात्त्य जगत नरमाईची भूमिका घेईल आणि त्यांच्याशी सौदेबाजी करेल व त्यातून रशियाची ताकद उंचावल्याचे दर्शवण्यात आपल्याला यश येईल अशी पुतिन यांची अटकळ होती. परंतु पाश्‍चिमात्त्य जगताने पुतिन यांना फारसा भाव दिला नाही. त्यामुळे त्यांच्याकडे आक्रमकता प्रत्यक्षात दाखवण्याशिवाय पर्यायच उरला नव्हता. वास्तविक पाहता गेल्या दोन वर्षांपासून संपूर्ण जग कोरोनासारख्या अभूतपूर्व महामारीच्या विळख्यातून सावरण्याचा, त्यामुळे झालेले प्रचंड वित्तीय नुकसान भरून काढण्याच्या प्रयत्नात असताना रशियाच्या राष्ट्राध्यक्षांनी घेतलेली ही आक्रमक भूमिका जागतिक अस्थिरता आणि अनिश्‍चितता कमालीची वाढवण्यास कारणीभूत ठरणारी होती.

यामुळे निर्माण होणा-या अनावश्यक आणि अंतहीन संघर्षाच्या झळा सबंध जगाला बाधित करतांना वर्षभर दिसून आल्या. जगातील सर्वच देशांतील अर्थव्यवस्था या युद्धामुळे प्रभावित झाल्या. कुठे महागाईचा चटका, आंतरराष्ट्रीय स्तरावरील घडामोडीने सर्वांचे जनजीवन प्रभावित झाले. मात्र ख्रिसमसच्या दिवशीच पोप यांनी केलेल्या आवाहनानंतर रशियाने देखील नरमाईचे सूर दाखवले आहेत. एकीकडे संपूर्ण जगतावर कोरोनाचे संकट पुन्हा एकदा घोंंघावतांना दिसून येत आहे. चीनमध्ये कोटयावधी रुग्ण निघत असल्यामुळे त्यांच्यावर उपचार करतांना प्रशासनाला आणि आरोग्य यंत्रणेचे तीन-तेरा वाजतांना दिसून येत आहे. ही लाट जपान, अमेरिका, चीन, ब्राझील यासारख्या देशांमध्ये मोठया प्रमाणावर पसरतांना दिसून येत आहे. त्यामुळे अशा परिस्थितीत युद्धाचे संकट हानीकारक आणि क्लेशदायी ठरू शकते. त्यामुळे रशिया-युक्रेन युद्धाचा शेवट करणेच संपूर्ण जगासाठी हितावह ठरणारे आहे.

COMMENTS