नांदेड : नांदेड जिल्ह्यातील अवैध रेती उत्खनन आणि वाहतुकीविरोधात नांदेड ग्रामीण पोलिसांनी मोठी धडक कारवाई करत रेती माफियांना जबरदस्त दणका दिला आहे

नांदेड : नांदेड जिल्ह्यातील अवैध रेती उत्खनन आणि वाहतुकीविरोधात नांदेड ग्रामीण पोलिसांनी मोठी धडक कारवाई करत रेती माफियांना जबरदस्त दणका दिला आहे. गोदावरी नदीपात्रातील कल्लाळ व पिंपळगाव निमजी परिसरात सुरू असलेल्या अवैध रेती उपशावर छापा टाकून पोलिसांनी तब्बल 1 कोटी 1 लाख 85 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.
या कारवाईत हायवा, जेसीबी, इंजिन, तराफे आणि मोठ्या प्रमाणात रेती हस्तगत करण्यात आली असून सहा जणांविरुद्ध गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. जिल्ह्यातील अवैध गौण खनिज उत्खनन आणि वाहतुकीवर कठोर कारवाई करण्याचे आदेश पोलीस अधीक्षक अबिनाश कुमार यांनी दिल्यानंतर नांदेड ग्रामीण पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक ओमकांत चिंचोळकर यांनी विशेष मोहीम राबवली. त्यांना मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार कल्लाळ टी-पॉईंट परिसरातील गोदावरी नदीपात्रात मोठ्या प्रमाणावर अवैध रेती उपसा सुरू असल्याचे समोर आले. माहितीची खातरजमा केल्यानंतर 20 जून रोजी दुपारी सुमारे 4.10 वाजता पोलीस निरीक्षक ओमकांत चिंचोळकर यांच्या नेतृत्वाखालील पथकाने अचानक छापा टाकला. यावेळी आरोपी हायवा व जेसीबीच्या सहाय्याने नदीपात्रातून रेतीचा उपसा करून तिची वाहतूक करत असल्याचे निदर्शनास आले. पोलिसांनी तत्काळ कारवाई करत यंत्रसामग्री आणि वाहने ताब्यात घेतली. कारवाईदरम्यान नदीपात्रात अवैध उत्खननासाठी वापरण्यात येणारे 26 तराफे, सात इंजिन आणि 52 ब्रास रेती घटनास्थळीच नष्ट करण्यात आली. तर हायवा वाहन जप्त करून नांदेड ग्रामीण पोलीस ठाण्यात जमा करण्यात आले. या प्रकरणी पोलीस कॉन्स्टेबल मधुकर श्रीराम आवातिरक यांच्या फिर्यादीवरून हानमंत चांदु वाघमारे (रा. राहुलनगर, वाघाळा), साईनाथ टरके, दत्ता लवांडे (रा. किवाळा), बाबाराव क्षिरसागर (रा. कल्लाळ), मुरली हिंवत (रा. खरबी) आणि एका अज्ञात जेसीबी चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपींविरुद्ध भारतीय न्याय संहिता, महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम, पर्यावरण संरक्षण अधिनियम तसेच सार्वजनिक संपत्ती नुकसान प्रतिबंधक अधिनियमांतर्गत गुन्हा क्रमांक 740/2026 नोंदविण्यात आला आहे. ही कारवाई पोलीस अधीक्षक अबिनाश कुमार, अपर पोलीस अधीक्षक अर्चना पाटील, अपर पोलीस अधीक्षक सुरज गुरव आणि उपविभागीय पोलीस अधिकारी प्रशांत शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली. कारवाईत पोलीस निरीक्षक ओमकांत चिंचोळकर, पोलीस उपनिरीक्षक व्यंकट कुसमे, गंगाधर भालेराव, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक पांचाळ, तसेच पोलीस अंमलदार आणि होमगार्ड जवानांनी सक्रिय सहभाग घेतला. या धाडसी आणि प्रभावी कारवाईबद्दल पोलीस निरीक्षक ओमकांत चिंचोळकर व त्यांच्या पथकाचे सर्वत्र कौतुक होत आहे.
जप्त मुद्देमाल
टाटा कंपनीचा हायवा (एमएच-26 बीई-5011) व 5 ब्रास रेती – 45.25 लाख रुपये
एक जेसीबी मशीन – 20 लाख रुपये
सात इंजिन – 21 लाख रुपये
26 तराफे व 52 ब्रास रेती – 15.60 लाख रुपये
असा एकूण 1 कोटी 1 लाख 85 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

COMMENTS