महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री तथा शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि माजी मंत्री आदित्य ठाकरे यांच्या केज शहरातील आगमनावेळी निसर्गानेही जणू स्वा

महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री तथा शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि माजी मंत्री आदित्य ठाकरे यांच्या केज शहरातील आगमनावेळी निसर्गानेही जणू स्वागतासाठी हजेरी लावल्याचे चित्र पाहायला मिळाले. ठाकरेंचे आगमन होण्यापूर्वीच शहरात पावसाला सुरुवात झाली आणि भर पावसात शिवसैनिक व नागरिकांनी मोठ्या उत्साहात त्यांचे स्वागत केले.
पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे केज शहरात प्रथमच येत असल्याने शिवसेनेचे नेते रत्नाकर आप्पा शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली केज तालुका शिवसेनेच्या वतीने स्वागताची जय्यत तयारी करण्यात आली होती. शिवसेनेतील फुटीनंतर पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या दौर्यामुळे शिवसैनिकांमध्ये मोठा उत्साह निर्माण झाला होता. परभणी येथील सभेनंतर उद्धव ठाकरे व आदित्य ठाकरे यांच्यासह शिवसेना नेते संजय राऊत, अनिल देसाई, मिलिंद नार्वेकर, विरोधी पक्षनेते अंबादास दानवे, शिवसेना नेत्या सुषमा अंधारे यांच्यासह पदाधिकारी परळी, आंबेजोगाई मार्गे केज येथून धाराशिवकडे रवाना होत होते. यावेळी केज शहरातील श्री छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे शिवसेना नेते रत्नाकर आप्पा शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली तालुकाप्रमुख अशोक जाधव व सहकारी शिवसैनिकांनी मोठ्या उत्साहात स्वागताची व्यवस्था केली होती. भर पावसात शिवसैनिकांनी घोषणाबाजी करत उद्धव ठाकरे यांचे स्वागत केले. यावेळी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी शिवसैनिकांचा सन्मान स्वीकारत त्यांच्याशी संवाद साधला आणि पुढील कार्यक्रमासाठी धाराशिवच्या दिशेने कळंब मार्गे प्रस्थान केले. ठाकरे यांच्या स्वागतासाठी झालेली गर्दी आणि पावसातही कायम राहिलेला शिवसैनिकांचा उत्साह यामुळे केज शहरात राजकीय वातावरण चांगलेच तापल्याचे दिसून आले.

COMMENTS