मुंबई : राज्यातील सर्वाधिक चर्चेत राहिलेल्या पवनराजे निंबाळकर दुहेरी हत्याकांड प्रकरणात तब्बल वीस वर्षांनंतर अंतिम निकाल शनिवारी जाहीर झाला आहे.

मुंबई : राज्यातील सर्वाधिक चर्चेत राहिलेल्या पवनराजे निंबाळकर दुहेरी हत्याकांड प्रकरणात तब्बल वीस वर्षांनंतर अंतिम निकाल शनिवारी जाहीर झाला आहे. मुंबई येथील सत्र न्यायालयाने या प्रकरणातील माजी मंत्री पद्मसिंह पाटील यांच्यासह सर्व आरोपींना सबळ पुराव्याअभावी निर्दोष मुक्त केले आहे. या निर्णयामुळे राज्याच्या राजकीय क्षेत्रात मोठी चर्चा सुरू झाली असून निंबाळकर कुटुंबीय आणि समर्थकांमध्ये नाराजीचे वातावरण निर्माण झाले आहे.
या खटल्यात तपास यंत्रणांनी सादर केलेले पुरावे, साक्षीदारांचे जबाब आणि दोन्ही बाजूंचे युक्तिवाद यांचा सखोल विचार न्यायालयाने केला. तपासादरम्यान माजी मंत्री पद्मसिंह पाटील यांच्यावर हत्येचा कट रचल्याचा आणि त्यासाठी आर्थिक व्यवहार झाल्याचा आरोप करण्यात आला होता. मात्र, न्यायालयाच्या मते उपलब्ध पुरावे आरोपींना दोषी ठरविण्यासाठी पुरेसे ठरले नाहीत. त्यामुळे सर्व आरोपींना निर्दोष मुक्त करण्यात आले. 3 जून 2006 रोजी नवी मुंबईतील कळंबोली परिसरात पवनराजे निंबाळकर आणि त्यांचे चालक समद काझी यांची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली होती. या घटनेने राज्यभर मोठी खळबळ उडाली होती. सुरुवातीला स्थानिक पोलिसांकडे असलेला तपास नंतर केंद्रीय तपास यंत्रणेकडे वर्ग करण्यात आला. गेल्या दोन दशकांपासून निंबाळकर कुटुंबीयांनी न्यायासाठी सातत्याने पाठपुरावा केला. मात्र, अखेरीस न्यायालयाच्या निर्णयामुळे ही प्रदीर्घ न्यायालयीन प्रक्रिया संपुष्टात आली आहे. न्यायालयाच्या निकालानंतर विविध राजकीय नेत्यांकडून प्रतिक्रिया उमटू लागल्या आहेत. काही नेत्यांनी या निर्णयाबाबत नाराजी व्यक्त करत न्याय मिळाला नसल्याची भावना व्यक्त केली आहे. विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी या निकालावर तीव्र प्रतिक्रिया देताना, इतक्या गंभीर प्रकरणात आरोपी निर्दोष सुटल्याने सामान्य नागरिकांच्या न्यायव्यवस्थेवरील विश्वासाला धक्का बसू शकतो, असे मत व्यक्त केले.
पवनराजे निंबाळकराची हत्या नेमकी कशी झाली ?
पवनराजे निंबाळकर आणि पद्मसिंह पाटील हे एकेकाळी जवळचे नातेवाईक आणि राजकीय सहकारी मानले जात होते. धाराशिव जिल्ह्यातील राजकारणात दोघांची जोडी प्रभावी म्हणून ओळखली जात होती. पवनराजे यांच्या राजकीय प्रवासाला प्रारंभ करण्यामध्ये पद्मसिंह पाटील यांची महत्त्वाची भूमिका होती. काळाच्या ओघात दोघांमधील राजकीय मतभेद वाढत गेले. स्थानिक राजकारणातील वर्चस्व, निवडणुकीतील स्पर्धा आणि नेतृत्वाच्या प्रश्नांमुळे हा संघर्ष तीव्र झाला. 2004 च्या विधानसभा निवडणुकीनंतर दोघांतील दुरावा अधिक वाढल्याची चर्चा राजकीय वर्तुळात होती. 3 जून 2006 रोजी कळंबोली येथे पवनराजे निंबाळकर आणि त्यांचे चालक समद काझी यांच्यावर अज्ञात हल्लेखोरांनी गोळीबार केला. या हल्ल्यात दोघांचा मृत्यू झाला.
निकाल दुर्दैवी; उच्च न्यायालयात दाद मागणार : ओमराजे निंबाळकर
सर्व आरोपींची निर्दोष मुक्तता झाल्यानंतर खासदार ओमराजे निंबाळकर यांनी नाराजी व्यक्त केली आहे. माध्यमांशी बोलतांना त्यांनी, हा निकाल दुर्दैवी आहे. न्यायालयाचा निर्णय असल्याने तो स्वीकारावाच लागेल, मात्र आम्ही या निर्णयाविरोधात उच्च न्यायालयात दाद मागणार आहोत, असे स्पष्ट केले. तब्बल 20 वर्षांपासून सुरू असलेल्या या खटल्याच्या निकालानंतर ओमराजे निंबाळकर यांनी पुढील न्यायालयीन लढाईचे संकेत दिले आहेत.

COMMENTS