Homeताज्या बातम्या

उसाटणे परिसरात अवैध ‘मिक्स हायड्रोकार्बन ऑईल’ साठ्यावर धाड; १.२० कोटींचा मुद्देमाल जप्त, तळोजा पोलिसांत गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू

ठाणे : अंबरनाथ तालुक्यातील उसाटणे परिसरात बेकायदेशीररीत्या साठवून ठेवलेल्या 'मिक्स हायड्रोकार्बन ऑईल'च्या मोठ्या साठ्यावर राज्य दक्षता पथकाने रवि

पुणे हातभट्टी दारू प्रकरण: मृतांचा आकडा २२ वर; भिवंडीतील गोदामात ५,९२९ लिटर मेथॅनॉलचा साठा जप्त
उल्हासनगरमध्ये महिलांची अमानुष धिंड; केस कापून, चपलांचा हार घालून अर्धनग्न अवस्थेत फिरवले
कल्याणमध्ये किरकोळ कारणावरून गोळीबार; व्हॉट्सॲप डीपी आणि स्टेटसचा वाद बेतला जीवावर

ठाणे : अंबरनाथ तालुक्यातील उसाटणे परिसरात बेकायदेशीररीत्या साठवून ठेवलेल्या ‘मिक्स हायड्रोकार्बन ऑईल’च्या मोठ्या साठ्यावर राज्य दक्षता पथकाने रविवारी धडक कारवाई केली. या कारवाईत सुमारे १ कोटी २० लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. या प्रकरणी संबंधित आरोपींविरुद्ध तळोजा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असून, अवैध इंधन साठवणूक आणि काळाबाजाराविरोधातील ही एक मोठी कारवाई मानली जात आहे.

रेशनिंग नियंत्रक (Controller of Rationing) चंद्रकांत डांगे (भा.प्र.से.) यांना मिळालेल्या खात्रीशीर गोपनीय माहितीच्या आधारे राज्य दक्षता पथकाने अंबरनाथ येथील उसाटणे भागातील ‘न्यूओ लॉजिस्टिक पार्क’ परिसरात, राज्यस्तरीय प्लॉट क्रमांक २० समोर छापा टाकला. या कारवाईदरम्यान टँकरचे सील तोडून ‘मिक्स हायड्रोकार्बन ऑईल’ची बेकायदेशीर साठवणूक आणि देवाणघेवाण सुरू असल्याचे उघडकीस आले. या काळ्याबाजारात दोन व्यक्ती प्रत्यक्ष सहभागी असल्याचे आढळून आले आहे.

पथकाने घटनास्थळाची पाहणी केली असता, मुख्य टँकरमध्ये सुमारे २९ हजार ७०० किलो मिक्स हायड्रोकार्बन ऑईल मिळून आले. तसेच MH-43 E-190 क्रमांकाचा आणखी एक टँकर घटनास्थळी उभा होता, ज्यामध्ये इलेक्ट्रिक मोटरच्या साहाय्याने इंधन भरण्याचे काम सुरू होते. याशिवाय, एका टेम्पोमध्ये २०० लीटर क्षमतेच्या प्लास्टिक बॅरलमध्ये इंधनाची बेकायदेशीर साठवणूक केली जात होती. या वाहनात २२० लीटर क्षमतेचे २० रिकामे प्लास्टिक बॅरल्सही आढळले. घटनास्थळावरून जमिनीवर ठेवलेले आणखी ८० रिकामे बॅरल्स, एक इलेक्ट्रिक मोटर आणि एक एअर ऑपरेटेड डायफ्राम पंप जप्त करण्यात आला आहे.

हे सर्व साहित्य, वाहने आणि बेकायदेशीर इंधनासह एकूण १ कोटी २० लाख रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी ताब्यात घेतला आहे. संबंधितांकडे कोणताही आवश्यक परवाना किंवा वैध कागदपत्रे नसल्याचे प्राथमिक तपासात समोर आले असून, तळोजा पोलीस या प्रकरणाचा पुढील कायदेशीर तपास करत आहेत.

COMMENTS