रायगड : किल्ले रायगडावर यावर्षीचा शिवराज्याभिषेक सोहळा तारखेनुसार ६ जून आणि तिथीनुसार २६ जून २०२६ या दिवशी साजरा करण्यात येणार आहे. या सोहळ्याकरि

रायगड : किल्ले रायगडावर यावर्षीचा शिवराज्याभिषेक सोहळा तारखेनुसार ६ जून आणि तिथीनुसार २६ जून २०२६ या दिवशी साजरा करण्यात येणार आहे. या सोहळ्याकरिता राज्यातून मोठ्या प्रमाणात शिवभक्त आणि अतिमहत्त्वाच्या व्यक्ती उपस्थित राहण्याची शक्यता आहे. त्याअनुषंगाने आपत्ती व्यवस्थापनाकरिता उपाययोजना करण्यासाठी किल्ले रायगडावर चढण्या-उतरण्यासाठीचा पायरी मार्ग दि. ३० मे आणि ३१ मे २०२६ या दोन दिवसांसाठी पूर्णपणे बंद ठेवण्याचे आदेश रायगड-अलिबागचे जिल्हाधिकारी तथा जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे अध्यक्ष किशन जावळे यांनी जारी केले आहेत.
आपत्ती व्यवस्थापन अधिनियम-२००५ मधील तरतुदींनुसार कोणत्याही आपत्कालीन प्रसंगी प्रतिबंधात्मक कार्य, सौम्यीकरण उपाययोजना, तातडीचा प्रतिसाद आणि समन्वय अशी कामे करावयाची असतात. या शिवराज्याभिषेक सोहळ्यासाठी मोठी गर्दी होणार असल्याने गर्दी व्यवस्थापनाच्या अनुषंगाने खबरदारी घेणे आवश्यक आहे.
मार्ग प्रकल्प विभाग, महाड (विशेष पथक रायगड किल्ला) यांच्या माहितीनुसार, सन २०२३ च्या शिवराज्याभिषेक सोहळ्याच्या वेळी महादरवाजाच्या खालील बाजूला असलेल्या उंच कड्यावरून पडलेल्या दगडांमुळे एका व्यक्तीचा मृत्यू झाला होता. त्यामुळे यावर्षीच्या सोहळ्याच्या अगोदर या ठिकाणचे कड्यावरील मोकळे दगड काढून घेणे अत्यंत आवश्यक आहे. कड्यावरील हे मोकळे दगड/दरड प्रशिक्षित रॅपेलर्सच्या (Rappellers) मदतीने काढण्यासाठी ‘दुर्गवीर प्रतिष्ठान, मुंबई’ यांनी सहमती दर्शविली असून दि. ३० व ३१ मे २०२६ रोजी ही मोहीम राबविण्यात येणार आहे.
या मोहिमेदरम्यान पायरी मार्गाने गड चढ-उतार करणाऱ्या व्यक्तींना कोणतीही हानी पोहोचू नये, म्हणून या कालावधीत पायरी मार्गावरील वाहतूक पूर्णपणे बंद ठेवण्याची विनंती प्रशासनाकडून करण्यात आली आहे.
रोपवे सुरू राहणार मार्ग प्रकल्प विभाग, महाड आणि दुर्गवीर प्रतिष्ठान, मुंबई यांनी आवश्यक ती खबरदारी घेऊन हे काम पूर्ण करावे, अशा सूचना देण्यात आल्या आहेत. तसेच जिल्हा पोलीस अधीक्षक, रायगड यांनी चित्त दरवाजा, नाणे दरवाजा, गडावरील शिरकाई मंदिर (होळीचा माळ) येथे पायरी मार्गावरील प्रवेशद्वारांजवळ आवश्यक पोलीस बंदोबस्त तैनात करावा, असे आदेश देण्यात आले आहेत. दरम्यान, या कालावधीत रायगड रोपवे (Ropeway) सेवा मात्र पूर्ववत सुरू राहणार आहे.

COMMENTS