Homeताज्या बातम्यासंपादकीय

पाळीव श्वान आणि बंदी! 

माणूस हा निसर्गाचा घटक म्हटला जातो. त्यामुळे, निसर्गाचे घटक असलेले अन्य प्राणीमात्रांशी त्याची मैत्री राहीली. माणसांशी मैत्री होणारा सर्वात प्रभा

अर्थसंकल्पापूर्वीच घोषणांतून लोकप्रियतेवर भर ! 
लोकसभा निवडणूक आणि महाराष्ट्र ! 
उत्पादन करणाऱ्या शेतकरी समाजाला, मराठा सत्ताधाऱ्यांनी याचक बनविले!

माणूस हा निसर्गाचा घटक म्हटला जातो. त्यामुळे, निसर्गाचे घटक असलेले अन्य प्राणीमात्रांशी त्याची मैत्री राहीली. माणसांशी मैत्री होणारा सर्वात प्रभावी प्राणी म्हणून कुत्रा या प्राण्याची गणना केली जाते. प्राचीन काळापासून शिकारीसाठी कुत्रा या प्राण्याचा मानवाकडून उपयोग केला जात आहे. त्याच्या या उपयोगितेनेच कुत्रा हा पाळीव प्राणी बनला. परंतु, जसजसा माणूस शिकारी जीवनापासून विभक्त होत गेला तसा तसा तो भौतिक संपन्नतेच्या वाटेकडे वेगाने जाऊ लागला. औद्योगिक क्रांतीनंतर च्या काळात माणसाचे आर्थिक उत्पन्न वाढायला लागले, तसा सुखवस्तू होणारा माणूस आपला प्रामाणिक सोबती म्हणून नव्हे तर आपल्या भौतिक संपन्न जीवनाचे सार्वजनिक प्रदर्शन करण्यासाठी कुत्रा आणि अन्य प्राणी – पक्षी पाळायला लागले. मात्र, आजच्या तंत्रज्ञानयुक्त असणाऱ्या जगात ठराविक वर्गात भौतिक संपन्नता इतकी प्रचंड वाढली की, त्याचे प्रदर्शन करण्यासाठी विदेशी आणि कृत्रिम रेतन असणारे प्राणी-पक्षी आणि यात विशेष म्हणजे कुत्रे पाळायला लागले. आता हे प्राणीपालन घराच्या चार भिंतीआड होतं तोपर्यंत ठिक होते. परंतु, आता रस्त्यावर चालताना कुत्र्याला घेऊन चालणारा मालक हे वर्गवादाचे वेगळे रूप तर अवतरलेच पण आपल्या श्रीमंतीचा माज दाखवण्याची हौसही त्यात आहे. मात्र, खरी समस्या ही नाही. तर समस्या ही आहे की, अशा प्रकारचे पाळीव प्राणी बेमालूमपणे माणसावर जीवघेणी हल्ला करू लागले आहेत; अन् हीच खरी चिंतेची बाब आहे. लखनौला एका जिम ट्रेनरने पाळलेल्या पिट-बुल प्रजातीच्या श्वानाने जिम ट्रेनर च्या आईलाच हल्ला करून ठार केले. श्वान दंशाच्या अनेक केसेस देशभरातील दवाखान्यात दाखल होतात. परंतु, यांचा मालक वर्ग नेमका सुधारायला तयार नाही! त्यामुळे, गुरूग्राम येथील न्यायालयाने दिलेल्या निर्णयाची दखल घेणे क्रमप्राप्त आहे.

गुरुग्राममधील जिल्हा ग्राहक विवाद निवारण मंचाने गुरुग्राम नगरपालिकेला ११ प्रकारच्या परदेशी जातींच्या पाळीव कुत्र्यांवर तात्काळ बंदी घालण्याचे निर्देश दिले आहेत. फोरम ऑर्डरमध्ये १५ नोव्हेंबर २०२२ पासून अमेरिकन पिट-बुल टेरियर्स, डोगो अर्जेंटिनो, रॉटवेलर, नेपोलिटन मास्टिफ, अमेरिकन बुलडाॅग, वोल्फ डॉग,फिला ब्रासिलिएरो आणि कॅन कार्सो अशा आणखी काही जातींचा समावेश आहे. या आदेशानुसार, गुरूग्राम नगर क्षेत्रातील पाळीव कुत्र्यांना  पाळण्यासाठी श्वान मालकांच्या बाजूने या संदर्भात जारी केलेले सर्व परवाने तात्काळ रद्द करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.फोरमने १५ नोव्हेंबर २०२२ पासून एका महिन्याच्या आत पाळीव कुत्र्यांची नोंदणी अनिवार्य करण्याचे निर्देश दिले आणि त्या संदर्भात दरवर्षी किमान बारा हजार रुपये शुल्क देऊन परवाना जारी करावा. अहवालानुसार, प्रत्येक नोंदणीकृत कुत्र्याला कॉलर घालणे आवश्यक आहे; ज्यामध्ये धातूची साखळीसह धातूचे टोकन जोडलेले असावे.प्रत्येक कुटुंबाने फक्त एक कुत्रा पाळावा आणि जेव्हा जेव्हा नोंदणीकृत कुत्र्याला सार्वजनिक ठिकाणी नेले जाईल तेव्हा त्याचे तोंड नेट टोपीने व्यवस्थित झाकले जावे असे महापालिकेला  निर्देश दिले आहेत. वरील तरतुदींचे उल्लंघन करताना आढळलेल्यांचे पाळीव कुत्रे एमसीजी द्वारे ताबडतोब  ताब्यात घेतले जातील आणि वीस हजार रुपयांपेक्षा कमी नाही आणि दोन लाखापर्यंतचा दंड आकारला जाईल, असेही त्यात नमूद करण्यात आले आहे. आणि तरतुदींचे उल्लंघन केल्यास, त्याला “एक महिन्यापेक्षा कमी नसलेल्या तुरुंगवासाची शिक्षा होईल जी दोन वर्षांपर्यंत वाढू शकते.”

COMMENTS