लोकसभा निवडणुकीनंतर देशासह महाराष्ट्राचे राजकारण नव्या वळणावर येईल, याचे आता संकेत मिळू लागले आहेत. काल तिसऱ्या टप्प्यातील मतदान संपल्यानंतर शरद
लोकसभा निवडणुकीनंतर देशासह महाराष्ट्राचे राजकारण नव्या वळणावर येईल, याचे आता संकेत मिळू लागले आहेत. काल तिसऱ्या टप्प्यातील मतदान संपल्यानंतर शरद पवार यांनी एका इंग्रजी वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत, देशातील लहान पक्ष काँग्रेसमध्ये विलीन होतील, अशा प्रकारचे वक्तव्य केले. अर्थात त्यांच्या या वक्तव्यानंतर त्यांचा स्वतःचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा काँग्रेसमध्ये विलीन होईल का, असा प्रश्न केल्यानंतर त्यांनी त्यावर काँग्रेस आणि आमची विचारसरणी एकच असल्याचे सांगून, थेट उत्तर देण्याचे टाळले. परंतु, त्यांनी दिलेल्या उत्तराचा दुसरा भाग म्हणजे निश्चितपणे लोकसभा निवडणुकीनंतर ते काँग्रेस पक्षात विलीन होण्याची भूमिका घेतील, असे जाणवते आहे. एका बाजूला त्यांची ही भूमिका आणि दुसऱ्या बाजूला हरियाणामध्ये भाजपच्या सैनी सरकारचा तीन अपक्ष आमदारांनी पाठिंबा काढला. यामुळे, बहुमत हरवलेल्या भाजपाचे सरकार अडचणीत आले आहे. या ठिकाणी काँग्रेसच्या तीस जागा आहेत आणि त्यांच्या मित्र पक्षांना तीन जागा अशा ३३ जागा आहेत. परंतु, त्याबरोबरच जेजेपी ला १०, आयएनएलडी ला १ आणि १अपक्ष मिळून एकंदरीत १२ जागा होतात. त्यामुळे ३३ आणि १२ अशा ४५ जागांवर विरोधकांचे बहुमताचे गणित होऊ लागले आहे. यामुळे, हरियाणा सरकार लोकसभा निवडणुकीच्या दरम्यानच कोसळते का, हा भाग देखील लोकसभा निवडणुकीचा निकाल नेमका काय लागेल, याचा संकेत देणारा आहे.
अर्थात, अजूनही भारतीय जनता पक्षाला सध्याच्या लोकसभा निवडणुकीत विरोधी पक्षांच्या विरोधात मुद्दा बनवण्यात अपयश आले आहे. तिसऱ्या टप्प्यातील मतदानापर्यंत भाजपाची पिछाडी, ही स्पष्टपणे जाणवू लागली आहे. अर्थात, अजूनही चार टप्प्यांचे मतदान बाकी असताना, एवढ्यातच कोणताही निष्कर्ष काढणं, हे घाईच ठरणार असलं तरीही, एकंदरीत हवा कोणत्या दिशेने वाहते आहे, याचे या दोन घटना निदर्शक आहेत. त्यातील पहिली म्हणजे महाराष्ट्रातील ज्येष्ठ राजकीय नेते शरद पवार यांनी देशातील लहान पक्ष काँग्रेसमध्ये विलीन होतील हे थेट वक्तव्य करणे आणि त्याचबरोबर हरियाणा सरकार चा पाठिंबा तीन अपक्ष आमदारांनी काढल्यामुळे, अल्पमतात आलेले सरकार. या दोन घटनांवरून एक निष्कर्ष काढता येतो की, आगामी काळात काँग्रेसच्या नेतृत्वातच इंडिया आघाडीचे सरकार कदाचित केंद्रात स्थापन होण्याची शक्यता बळावली आहे. सध्याच्या भाजपाला मोदी यांच्या नेतृत्वामुळे कोणताही दिलासा निवडणुकीदरम्यान मिळताना दिसत नाही. गेली दहा वर्षे निवडणूक मोडवर असणारे मोदी, आपल्या एकेका वाक्याने विरोधकांची हवा काढत असत! परंतु, गेल्या महिनाभरापासून निवडणूक प्रचारात ते सातत्याने भाषण करीत असतानाही, त्यांना कोणताही मुद्दा विरोधकांना अडचणीत आणणारा किंवा विरोधकांना नामकरण करणारा मिळू शकलेला नाही. याचा अर्थ, विरोधकांची तयारी निवडणुकीदरम्यान जेवढी आहे, तेवढाच, वर्तमान केंद्र सरकारचा जनतेच्या दृष्टीने जो लेखाजोखा आहे तो देखील कमकुवत आहे. त्यामुळे कितीही दावे केले तरी, प्रत्यक्षात जी गोष्ट घडते त्यावर बरच काही ठरत असतं. देशातील महागाई, बेरोजगारी, शांतता, धार्मिक ध्रुवीकरण या सगळ्या प्रश्नांचा एक गंभीरपणे विचार देशातील जनता करू पाहते आहे आणि त्यावर आपलं ठोस मत देऊन सरकार परिवर्तनाच्या दिशेने विचार करते आहे. सर्वसामान्य जनता आणि राजकीय विश्लेषकही एकाच सुरात म्हणू लागले आहेत. अर्थात, नरेंद्र मोदी हे सहजच हार मानणारे नेते नाहीत. या निवडणुकीत कोणत्या ना कोणत्या मुद्यावर विरोधकांना पळता भुई थोडी करू, असा इरादा असूनही त्यांना सध्याच्या निवडणुकीत अद्याप काहीही साध्य करता आलेले नाही.
COMMENTS